Pages

Pages

Pages

Sunday, April 5, 2020

दोन दिवसात भूकंपाचे 13 धक्के झाले पालघर जिल्ह्यात!


पालघर – गेल्या दोन दिवसांत भूकंपाचे 13 धक्के बसल्याने पालघर जिल्हा हादरून गेला आहे. आजही पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाचे चार धक्के बसले. हे भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी वारंवार भूकंप होत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरीत सोमवारी आणि आज भूकंपाचे जोरदार धक्के बसले. साधारणपणे या भूकंपाची रिश्टर स्केलवर 2.8 एवढी तीव्रता नोंदवली गेली. कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवत असले तरी स्थानिकांमध्ये मात्र त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल सोमवारी पहाटे 4 वाजता भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्याची रिश्टर स्केलवर 2.0 एवढी तीव्रता नोंदवली गेली. त्यानंतर अवघ्या सव्वा तासातच म्हणजे 5 वाजून 18 मिनिटांनी 2.3 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. त्यानंतर रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी 2.4 तीव्रतेचा भूकंपचा धक्का बसला. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटातच पुन्हा दुसरा धक्का जाणवला. 8 वाजून 47 मिनिटांनी हा धक्का जाणवला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 2 एवढी नोंदवली गेली.

काल सुरू झालेली भूकंपाची ही मालिका आजही सुरूच होती. आज मध्यरात्री 1 वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्याची तीव्रता 2.8 एवढी होती. त्यानंतर पहाटे 5 वाजून 47 मिनिटांनी 2.7, सकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी 2.0 आणि सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी 1.9 एवढ्या तीव्रतेचे धक्के जाणवले. एकामागून एक आणि सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने येथील ग्रामस्थ घरात जाण्यासही घाबरत आहेत.

आज मध्यरात्री 1 वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवल्यानंतर अनेकांना तर डोळाही लागला नाही.. कालच्या भूकंपाचा अनुभव ताजा असल्याने अनेकांनी अख्खी रात्र जागून काढली असून वारंवार होणार्‍या भूकंपामुळे पालघरवासियांच्या मनात भीतीने घर निर्माण केले आहे.

No comments:

Post a Comment