Friday, April 3, 2020

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या पाठपुराव्याला यश


लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांसाठी विशेष पॅकेज देण्याचे केंद्र शासनाच्या विचाराधीन असून या संदर्भात राज्याकडून माहिती मागविली आहे. केंद्राने याबाबत राज्याच्या मत्स्यविभागाला पत्र लिहून झालेल्या नुकसानीची माहिती मागवली आहे. 


मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले, लॉकडाऊनमुळे अन्य व्यवसायांबरोबरच मत्स्यव्यवसायालाही फार मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. केंद्राने मच्छिमारांना विशेष पॅकेज घोषित करावे ह्यासाठी राज्य शासनाच्या वतीने  सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर केंद्र शासनाने राज्याकडून मच्छिमारांच्या नुकसानीची माहिती मागविली आहे. त्यानुसार राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाला त्याची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. 

केंद्राचे पत्र प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या मत्स्यविभागानेही सर्व जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य आयुक्तांना पत्र पाठवून मच्छिमार संस्थांकडून केंद्र शासनाने सांगितलेल्या नमुन्यात माहिती मागवायला सुरुवात केली आहे.

Thursday, April 2, 2020

कोरोना संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन’ व्हा; स्वत:ला, कुटंबाला वाचवा


‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन’ किंवा‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत.‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन’ व्हावं,स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशाराही  त्यांनी दिला आहे.

‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय. भाजीबाजारातल्या गर्दीमुळे कोरोना तुमच्या घरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.‘कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत. परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत, त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. 

राज्यात अन्नधान्याचा,  खाद्यतेलाचा,दूध, भाजीपाल्याचा, औषधांचा,इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये. त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तिभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही  सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दिली माहिती






दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातीलनागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु


सर्वधर्मीय गुरूंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना पंतप्रधानांनी स्वीकारली
        दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.  सर्व धर्माच्या प्रमुख धर्मगुरू व धार्मिक नेत्यांना  विनंती करून कोणत्याही परिस्थितीत  गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे,या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे असे सांगितले. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.


लॉकडाऊन उठविल्यानंतरचे नियोजन

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी याविषयीहीमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले. यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातीळ स्थितीनुसार टप्प्याटप्प्याने याचे नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे, असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना केल्या.

३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, भोजन


परराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत असून ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी दिली. त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ञ ,डॉक्टर नियुक्त केले आहेत असे सांगितले. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनादेखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.



मोठ्या प्रमाणात आयसोलेशनसाठी तयारी

पुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. महानगरपालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंगमधून एमबीबीएसच्या  विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत. नव्या प्रोटोकॉलप्रमाणे ( मानकाप्रमाणे ) आम्ही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचेदेखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण करीत असून त्यासाठी  पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालये,ताब्यात घेतले आहेत. पुढे गरज पडल्यास तयारी असावी म्हणून एखादी मोठी जागा निश्चित करून याठिकाणी आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारण्याचे नियोजन आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आमचे पूर्ण लक्ष आम्ही कोरोनाचा प्रसार थांबविण्यावर केंद्रित केले असून पूर्वी चाचण्या कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी होती. त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांनादेखील चाचणीची परवानगी दिल्याने आणि त्यांचे दोन तीन दिवसांचे निदान एकदम एकत्रितरीत्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे असे चित्र दिसते. मात्र या रुग्णांना  रुग्णालयांत  दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई शहरातील महानगरपालिका रुग्णालयात आयसोलेशनसाठी केवळ २८ रुग्णशय्या होत्या त्यामध्ये आता २१००  पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कोविड रुग्णालय

सध्या एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात १५०० खाटांची सोय फक्त कोविड १९ साठी निर्माण करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या  निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत असेही ते या कॉन्फरन्समध्ये म्हणाले.

वैद्यकीय उपकरण उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे

पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची तर गरज आहेच. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचना :

१. लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी  करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे.

२. देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे .लॉकडाऊन संपले म्हणजे झाले असे नाही. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर राखणेमहत्त्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचाही उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.
 
३. कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता  राखणे महत्त्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पाहा. त्यासाठी ड्रोन  वगैरे तंत्रज्ञानाचा उपयोग करा.

४.  कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी,स्वयंसेवी संस्थांचे तरुण यांनाही सहभागी करून घ्या.

५. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती , तज्ञ , यांचे टास्क फोर्स तयार करा , त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.

६. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने  संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिध्दी मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

७. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल . पण एकदम सर्व गर्दी होईल ग्रामीण भागात असे करू नका. त्याची विभागणी करा . शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

८. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

९. ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

१०. आयुष मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

११. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे  आढळताहेत . ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.  

कोरोना विषाणूपासून लढण्याची शक्ती


कोरोना’ बस नाम ही काफी है..! अशी सध्याची परिस्थिती झालेली आहे..

बिचारे नेहमीच सर्दी खोकला असलेले लोक सुद्धा तिरक्या, संशयास्पद नजरेचे शिकार होतायत..

जरा कोणी शिंकले की आसपासची लोकं लांब पळून जातायत.. हजारो मेसेज, व्हाट्सएप फॉरवर्ड, न्यूज वरची माहिती सगळ्यानी उच्छाद मांडलाय.. त्यामुळे सगळीकडे कोरोना ह्या नावाची सुद्धा दहशत आहे..

पण मध्येच एखादी सुखद बातमी येतेय की भारतातील, इटलीतील कोरोना बाधित मस्त बरे होऊन घरी गेलेत..

एवढेच काय तर चक्क चायनातील वूहान शहर जे कोरोनाचे जन्मस्थान म्हणता येईल तिथले कोरोना बाधित सुद्धा स्वस्थ झालेत..


एका बातमीमध्ये कोरोना झालेल्या, १०३ वर्षांच्या वृद्ध आज्जी सुद्धा बऱ्या झाल्याचे कळते आहे.. ही सुखाची किनार सगळ्यांनाच हवीहवीशी वाटत आहे..

कोरोनाबद्दल भीती आणि नकारात्मकता एका कारणाने जास्ती वाढली कारण ह्या नवीन विषाणू वर एकही औषध कोणत्याही देशामध्ये नाहीये..

किंबहुना त्यावर लस किंवा औषधी गोळ्या बनलेल्याच नाहीत.. हेच घबराटीचे मुख्य कारण..

सगळ्यांना वाटते आता कोरोना झालाय आणि औषधच नाहीये तर आपल्या जगण्याची शाश्वती संपली.. आयुष्य संपले..

आणि मग कोरोना बाधित बरे झाल्याच्या बातम्या ऐकून फारच आश्चर्य वाटते.. अरेच्चा.!! औषधाविना बरे होणे म्हणजे केवळ अशक्य.. नाही का..??

तर मंडळी असे अजिबात नाहीये.. कोरोना बद्दल तुम्ही रोज खूप काही ऐकले आहे..

तो होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायची तेही तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहेच.. सगळ्या देशात त्यांचे सरकार देखील योग्य त्या खबरदाऱ्या घेत आहेत..

जे कोरोना बाधित आहेत त्यांना वेगळ्या परिस्थितीत ठेवले जाते.. आणि खरे सांगायचे तर कोरोना मुळे बाधा व्हायची टक्केवारी जरी झपाट्याने वाढत असली तरी मृत्यू चा दर फक्त ३% आहे..

म्हणजे गणिती भाषेत सांगायचं झालं तर १०० जणांना बाधा झाली तर त्यातले ३ जणच मारतात.. अर्थात तेही वाचू शकतात.. आणि हो बिना लस किंवा औषधांचे..!! कसे??

जाणून घेऊयात..

व्हायरल इन्फेक्शन होणे हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे.. हे व्हायरल इन्फेक्शन देणारे विषाणू कधी खूप शक्तीवान तर कधी खूप अशक्त असतात..

आपल्याला सर्दी होते, ताप येतो आणि मग आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी लगेच युद्धाला सुरुवात करतात.. ह्या पांढऱ्या पेशी आपले संरक्षक सैनिक असतात जणू..

त्यांना जर कुणकुण लागली की आपल्या शरीरात बाहेरचे, हानिकारक विषाणू घुसले आहेत तर ह्या पांढऱ्या पेशी सज्ज असतात…

जेव्हा आपल्याला ताप येतो.. आजारी असल्यासारखे वाटते.. कधी काही साधी औषधे घेतली की लगेच बरे वाटते तर कधी औषधाशिवाय देखील आपण बरेही होतो..

कोरोना ह्या व्हायरस मुळे आपल्याला जो आजार होतोय त्याचे नाव आहे COVID 19 आणि ह्या विषाणूला टक्कर देईल असे औषध अजून तरी बनवले गेले नाहीये..

ह्याला झुनॉटिक व्हायरस असेही म्हणतात.. सोप्या भाषेत सांगायचे तर हा विषाणू प्राण्यांकडून माणसांकडे आलेला आहे.. आणि एकदम ब्रॅण्ड न्यू आहे..

म्हणूनच माणसांना होणाऱ्या इतर व्हायरल विष्णूंसारखा नसल्याने कदाचित आपल्या पांढऱ्या सैनिक पेशींनाही ह्यांच्याशी युद्ध कसे करावे समजत नसावे..

त्या पेशी ह्या व्हायरस समोर कमजोर पडत आहेत.. म्हणूनच हा कोरोना कोणत्याही माणसाला पटकन पकडतो आणि पार आजारी पाडतो..

कोणत्याही आजाराशी लढायला आपल्या शरीराला लागते रोग प्रतिकारक शक्ती.. ज्याला इंग्रजीमध्ये ‘इम्युनिटी’ असेही म्हणतात..

इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आपल्या सगळ्यांकडे असते.. रोजच्या होण्याच्या वेगवेगळ्या विषाणूंच्या हल्ल्यांशी लढणे हे तिचे काम..

आणि वर वाचल्याप्रमाणे पांढऱ्या पेशी हे तिचे खंदे सैनिक..!! ही रोग प्रतिकारक शक्ती ज्यांची भन्नाट आहे तेच, कोरोनाची लागण होऊन सुद्धा ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत..

थोडक्यात काय तर कोरोनावर स्पेशल कोणते औषध असे नसतानाही इतर औषधांच्या मदतीने, चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीने आणि मनात असलेल्या सकारात्मकतेचा, इच्छाशक्तीच्या साहाय्याने हे रोगी, मोठ्या रोगाशी सामना करून, जिंकून, पुन्हा आपल्या स्वस्थ निरोगी जीवनशैलीत परतले आहेत..

म्हणजे बघा या आपत्तीला इष्टापत्ती समजून आपल्या सवयी बदलून निरोगी जीवन शैली जर आपण आत्मसात केली तर हा कोरोनाच काय यापुढे आणखी कुठलाही महाभयंकर विषाणू आपल्यावर चाल करून आला तरी आपले काहीही वाकडे करू शकणार नाही.

म्हणून सगळ्या प्रकारची काळजी घेत, शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्याकडेही आपण लक्ष देऊ..

कारण अशक्त व्यक्ती, लठ्ठ व्यक्ती, मधुमेही, इतर आजार असणारे, वयोवृद्ध ज्यांची शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वयामुळे कमी होत जाते ह्या सगळ्यांना कोरोनाची लागण होण्याचे जास्त चान्सेस आहेत..

तसेच सगळ्यात भेसळ आणि प्रदूषण हे रोजचेच शत्रू.. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच इम्युनिटी वाढवणे हे सुदृढ आयुष्य जगण्यासाठी कायमच महत्वाचे आहे..

जर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढली तर आपल्या पांढऱ्या पेशींना देखील बळ मिळेल.. आणि कोणत्याही रोगाचा सामना करायला त्या सज्ज होतील..

इम्युनिटी कशी वाढवाची ते खाली दिलेल्या काही मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल:

१. फळे रोज खा.
२. सगळ्या प्रकारच्या भाज्या खाणे उत्तम.. हिरव्या भाज्या अगदी मस्ट..!!
३. संतुलित आहार घ्या
४. मांसाहार वर्ज्य करणे शक्य नसल्यास ते पूर्णतः शिजवूनच खाणे योग्य
५. व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.. योग करणे त्यातल्यात्यात अनुलोम विलोम, प्राणायाम, कपालभाती हे अतिशय उपयोगी आसनं आहेत. फिरायला जाणे आणि जिम करून फिट राहणे हे इम्युनिटी बूस्टर आहेतच..
६. पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची. झोप पूर्ण न झाल्याने शरीर थकते आणि त्यावर विषाणूंना हल्ला करणे अतिशय सोप्पे जाते..
७. ताण तणावांपासून दूर राहा.

हे सध्याच्या फास्ट युगात सांगणे अगदीच बेसिक झाले आहे.. कारण झपाट्याने प्रगतीकडे जाताना मानसिक आणि शारीरिक आरोग्य दुर्लक्षिले जात आहे..

ताण असलेली माणसे बऱ्याच रोगांना बळी पडताना आपण पहात आहोत.. म्हणून ताण बाजूला ठेवणे हे कोरोना पासून लांब राहण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे..

वरच्या टिप्स ह्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाच्या आहेत.. नैसर्गिक रित्या आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर ह्याला पर्याय नाही.. हे सगळेच मुद्दे आचरणात आणावे लागतील..

मुलांनाही त्याचे महत्व सांगा म्हणजे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आत्तापासूनच नवनवीन विषाणूंना तोंड द्यायला सज्ज होईल.. घरातल्या वृद्धांना जपा.. त्यांना खास आहार द्या..

स्वतःची देखील काळजी घ्या.. नुसते कोरोनाचे टेन्शन घेऊन काहीही साध्य होणार नाही.. सगळे मिळून त्याला हरवून टाकूयात..

स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सगळ्याच विषाणूंना मात देऊयात.. मग औषध असो व नसो..!!

स्वस्थ खा, स्वस्थ जगा..!!

कलिंगड खाण्याचे जबरदस्त फायदे

आपल्या सर्वानाच माहिती आहे की कलिंगडा मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण हे असते. आणि म्हणून तर उन्हाळ्याच्या ऋतूत कलिंगड खाल्ल्याने आपल्या शरीरात केवळ पाण्याची मात्राच वाढत नाही तर आपले शरीर, पोट थंड राहण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. तुम्हाला माहितीही नसेल की कलिंगड खाल्ल्याने आपल्याला अनेक आजारांमध्येही फायदा होतो.

कलिंगड खाल्ल्याने आपले वजन कमी होण्याचा फायदा मिळतो. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की काही आजारांमध्ये हे फळ अजिबात खाऊ नये यामुळे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या कलिंगड खाण्याचे काय काय फायदे आहेत आणि साईड इफेक्ट…
तुम्हाला जर किडनी स्टोनचा त्रास असल्यास जरूर खा कलिंगड – ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशा लोकांनी तर हौसेने कलिंगड खायला हवे. कारण कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे कि डनी साफ होण्याड कलिंगडाची मोठी मदत होते. त्यामुळे कलिंगड हे खाणे फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यासाठी – वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅल रीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. १०० ग्रॅम कलिंगडामध्ये केवळ ३० ग्रॅम कॅलरीज असतात. यात १ मिलिग्रॅम सोडियम, कार्बोहायड्रेट ८ ग्रॅम, फायबर ०.४ ग्रॅम, साखर ६ ग्रॅम, व्हिटामिन ए ११ टक्के, व्हिटामिन सी १३ टक्के, प्रोटीन ०.६ ग्रॅम असते.
इम्युनिटी सिस्टीम मजबूत करण्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी – कलिंगडामध्ये व्हिटामिन सी आणि ए आढळते. या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.
डोके थंड राहण्यास मदत – कलिंगडाची प्रवृत्ती ही थंड असते. कलिंगड खाल्ल्याने केवळ पोटच नाही तर डोकेही थंड राहण्यास मदत होते. याच्या बिया वाटून डोक्यावर लावल्या तर डोकेदुखी बरी होते.
उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास – ज्या लोकांना उच्च र क्तदा बाचा त्रास आहे त्या लोकांनी तर कलिंगड जरूर खावे. कलिंगडामध्ये फार कमी प्रमाणात सोडियम असते तसेच हे थंड असते.
या लोकांनी खाऊ नये कलिंगड
अस्थमा अथवा ऍ लर्जीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कलिंगड खाऊ नये आहे. कारण कलिंगडची प्रवृत्ती थंड असते. यामुळे नलिकेत सूज निर्माण होते. यासोबतच शिंका येण्याची समस्याही वाढू शकते.
जर तुम्ही भात आणि दही खाल्ले असेल तर त्यावर कलिंगड खाऊ नये. कारण कलिंगड खाल्ल्याने फायदे होण्याच्या जागी नुकसानच होऊ शकते.

रिकाम्या पोटी कधीही कलिंगड खाऊ नये.सकाळी उठून जर तुम्ही रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर ती सवय बदला. रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर उलटी तसेच पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
कलिंगड खाल्ल्याने कधीही पाणी पिऊ नये. लगेच पाणी प्यायल्याने उलटी होऊ शकते. रात्रीच्या वेळेस कलिंगड खाऊ नये. कारण यामुळे कफ वाढू शकतो आणि समस्या अधिक वाढू शकते.
टीप: प्रस्तुत लेखात सुचविण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले हे केवळ प्राथमिक माहितीसाठी देण्यात आलेलं आहे. या टिप्स काही व्यावसायिक चिकित्सकाचा सल्ला नाही.