Saturday, April 4, 2020

आणखी 4 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले पालघर जिल्ह्यात


 जिल्ह्यातून आज 4 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले असून, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 15 झाली आहे. त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आज निष्पन्न झालेल्या 4 रुग्णांपैकी 3 जण हे वसई ग्रामीण भागातील राजोडी येथील असून परदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे. अन्य 1 जण नालासोपारा येथील परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नसलेला रुग्ण आहे.

105 तपासणी अहवाल निगेटिव्ह: एकूण 226 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, आज रोजी पर्यंत, 105 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 106 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

होम क्वारन्टाईन चा भंग करणाऱ्या 106 लोकांना सक्तीचे क्वारन्टाईन: वसई तालुक्यात होम क्वारन्टाईन केलेल्या 106 जणांनी आदेश न पाळल्यामुळे त्यांना सक्तीने इंस्टीट्यूशनल क्वारन्टाईन करण्यात आले. 53 जणांना हॉटेल रॉयल गार्डन, 26 जणांना हॉटेल सुवी पॅलेस, 26 जणांना हॉटेल रुद्र शेल्टर, व एकास हॉटेल लेक सिटी येथे देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

सध्या 14 रुग्ण पुढीलप्रमाणे दाखल आहेत.कस्तुरबा रुग्णालय (मुंबई) – 3; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 1; जसलोक (मुंबई) – 1; एमजीआरएम (पवई) – 3; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 1; बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 4; डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 1

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात संस्था आणि नागरिक यांना शासनाचे मदतीचे आवाहन


 कोविड  19 विषाणू प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये संस्था आणि नागरिक यांना सहभागी होता येणार आहे. जे नागरिक, उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19″ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

खात्याची सविस्तर माहिती:
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank A/C no. 39239591720
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
State Bank of India, Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023

Friday, April 3, 2020

दिल्लीच्या मरकज मधून 8 जण जव्हार मध्ये परतले; सर्वांना केले क्वारन्टाईन! परिसरातील लोक चिंतेत


 दिल्लीतील निजामुद्दीन येथे तब्लीकी समाजाच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले जव्हार मधील 8 जण जव्हारला परतले त्यांना शहराच्या मध्यवस्तीतील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. 8 जणांमध्ये 9 व 16 वर्षांच्या मुलांचा देखील समावेश आहे.

वादग्रस्त ठरलेल्या कार्यक्रमातून हे 8 जण भिवंडी मार्गे जव्हारला परतले आहेत. कोरोना विषयी लोकांमध्ये भय पसरले असल्यामुळे लोकांचा मध्य वस्तीतील वसतीगृह क्वारन्टाईन करण्यासाठी वापरण्यास आक्षेप आहे. या सर्वांच्या घशाचे नमुने मुंबईतील जे. जे. रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जव्हार कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. रामदास मराड यांनी दिली आहे. 

लोकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक ॲड. प्रसन्ना भोईर यांनी सर्व क्वारन्टाईन व्यक्तींना जव्हार शहराबाहेरील भारती विद्यापीठाची इमारत अथवा नगरपरिषदेच्या सनसेट रिसॉर्ट मध्ये हलविण्याची मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजित नायर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्या कडे केली आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे जव्हारकरांचे लक्ष लागले आहे.

7 तासांत 9 कोरोना संशयीत वाढले, सर्व 9 जणांची कोरोना तपासणी


पालघर जिल्ह्यात, सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या दरम्यान 9 नवे कोरोना बाधेची शंका असलेल्या व्यक्ती निष्पन्न झाल्या असून त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करुन देखरेखीखाली ठेवले आहे. त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

आतापर्यंत पडताळणी झालेल्यांची संख्या 1005 इतकी असून 817 लोक होम क्वारन्टाईन आहेत. त्यातील 422 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. क्वारन्टाईन केलेल्या लोकांनी उल्लंघन केल्याची एकही घटना घडलेली नाही असे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेले असले तरी पोलिसांनी 2 जणांवर होम क्वारन्टाईन असताना बाहेर फिरल्याने गुन्हे दाखल केल्याची प्रेस नोट प्रसारित केली आहे

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या ; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी


 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने यासाठी एक कार्यपद्धती निश्चित केली असून त्यानुसार अशा व्यक्तींना सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ही घरपोच सेवा मिळणार आहे.
           
वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गरजू व्यक्तींने हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर ही सेवा त्यांना उपलब्ध होऊ शकेल.
          
यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून संपर्क अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहे. अत्यावश्यक वस्तू जसे- अन्नधान्य,औषधे अशा बाबींचा पुरवठा करणाऱ्या संस्था या स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यात आल्या आहेत.
पोलीस यंत्रणेच्यावतीनेही यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती,स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था, सेवा पुरवठादार, औषध विक्रेते, घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्ती यांना  पोलीस यंत्रणेच्यावतीने प्रवेशपत्र देण्यात आलेले आहेत.

स्वयंसेवी संस्था हेल्पलाईनवर प्राप्त झाल्याप्रमाणे वयोवृद्ध, अपंग व्यक्तींना आवश्यक ते सहाय्य करतील तसेच या व्यक्तींची यादी संबंधीत नोडल अधिकाऱ्यांना सोपवून पोलिस यंत्रणेशी समन्वय राखण्याचे काम करणार आहे. सहाय्यासाठी गरजूंना संबंधित महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागेल. मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी 1800 221 292 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील.  या मोहिमेसाठी राज्य समन्वयक म्हणून शासनाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे या काम पाहत आहे.