Thursday, April 16, 2020

एका दिवसांत 14 वाढले, एकूण कोरोना +ve 69

 पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता पालघर जिल्ह्यातील नवे 8 व डहाणू तालुक्यातून 2 रुग्ण वाढल्यामुळे, 69 झाली आहे. त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जण आजारातून बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यामध्ये डहाणू उप जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 3 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या मुलीची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे तीला घरी सोडण्याची शक्यता आहे.

नव्या 14 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये डहाणूतील बाधीत मुलगी पालघर तालुक्यातील काटाळे येथील ज्या वीटभट्टीवर होती, त्या परिसरातील 5 समावेश झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्य 3 पालघर तालुक्यातील सफाळे परिसरातील आहेत. डहाणू तालुक्यातील कासा ग्रामीण रुग्णालयातील 2 डॉक्टर्सचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यातून डहाणूच्या आकडेवारीत 2 ने वाढ झाली. वसई विरार महानगर क्षेत्राचा आकडा आज 4 ने वाढला आहे.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 69 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

  • विरार वसई महानगर क्षेत्र – 53 (त्यातील 4 मृत्यू)
  • वसई ग्रामीण क्षेत्र – 3
  • पालघर तालुका – 10 (त्यातील 1 मृत्यू)
  • डहाणू तालुका – 3

आतापर्यंत 980 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 596 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 247 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

  • 69 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (11%)
  • 527 अहवाल कोरोना निगेटिव्ह (89%)


सध्या 82 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एमसीजीएम रेस्ट हाऊस (अंधेरी) – 1; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 9; जसलोक (मुंबई) – 5; एमजीआरएम (पवई) – 2; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 0 (1 रुग्ण बरा झाल्याने सुट्टी दिली); बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 19 (6

पॉझिटीव्ह व 13 अहवाल बाकी); डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 5 (1 पॉझिटीव्ह व 4 अहवाल प्राप्त नाही); ग्रामीण रुग्णालय (पालघर) – 2; रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 9 ; सेव्हन हिल्स हॉस्पिटल 8; हॉरिझोन प्राईम हॉस्पिटल (ठाणे) – 4; शताब्दी हॉस्पिटल (कांदिवली) – 1: अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 5; टिमा हॉस्पिटल – 10 ; कोकिलाबेन हॉस्पिटल – 1; कस्तुरबा हॉस्पिटल – 1.

  • 307 जण होम क्वारन्टाईन आहेत.
  • 112 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 82 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 980 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 527 नमुने निगेटिव्ह.
  • 247 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 69 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 5 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

Wednesday, April 15, 2020

'आरोग्य सेतु' हा एप घ्यावा शासनाकडून आवाहन


भारत सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकाना आवाहन करण्यात येते की लोकांनी प्रत्येक मोबाईलमध्ये "आरोग्य सेतु" हा एप द्यावा. या ऐपमध्ये कोरोना विषाणू या रोगाबद्दल भरपूर माहिती देण्यात आले आहे. तसेच मास्क चा वापर कसा करायला पाहिजे. शासकीय सूचना, सल्ला, इ. सरकारी नियमावली देण्यात आले आहे.

या ऐपमध्ये किती रुग्ण corona virus +ve\-ve माहिती देण्यात आली आहे, तसेच self/home quanrtine चे माहिती मार्गदर्शन करण्यात आले आहे.

पालघर जिल्हातील डहाणू व तलासरी तालुक्यात रात्री चोर फिरतात अशी अफवा


गेल्या दोन-तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात एक अशी whatsapp वर text message फ़िरवली जात आहे की रात्री बेरात्री काही अनोळखी लोक चोरी करण्यास फिरत आहे, अशी अफवा फसरवली जात आहे. ग्रामपंचायतातील सदस्यांनी  या अफवाविषयी माहिती सरपंचला देऊन जनतेमधील ज्या गैरसमजाची भीती आहे, त्या अफवा आहेत असे जनतेला सांगण्यात यावे. 

प्रशासन सुस्त, शासकीय प्रेस नोट मध्ये पॉझिटीव्ह उल्लेख व 3 वर्षीय मुलीचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह


 डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 3 वर्षीय मुलीचा नव्याने केलेल्या तपासणीचा अहवाल कोरोना निगेटीव्ह आला आहे. या मुलीचा 13 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आला होता. मात्र मुलीची प्रकृती पूर्णपणे बरी असताना आणि परदेश प्रवास केलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात आलेली नसताना तीचा अहवाल पॉझिटीव्ह कसा आला, याबाबत आरोग्य विभागाला प्रश्न पडला होता. आता नवी टेस्ट निगेटीव्ह आल्याचे सुत्रांकडून समजते. मात्र याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांना विचारले असता अजून रिपोर्ट हाती आला नसल्याचे सांगितले आहे. सकारात्मक व आशादायक बातमी असताना प्रशासन अजून सुस्त आहे. आता उशीरा आलेल्या शासकीय प्रेस नोट मध्ये अजून डहाणूमध्ये 1 पॉझिटीव्ह नोंद कायम दाखवली आहे.

रुग्ण मुलीचे आई व वडील पालघर तालुक्यातील, काटोळे गावाच्या हद्दीत वीटभट्टीवर कामाला होते. तेथे मुलीला खोकला व ताप आल्यामुळे मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीला दाखवण्यात आले. तेथून मुलीचे आई वडील डहाणू तालुक्यातील गंजाड येथील गावी परतले. तेथून मुलीला 9 एप्रिल रोजी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व 13 तारखेला तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. या बातमी नंतर एकच खळबळ उडाली होती. मुलीच्या आई वडीलांच्या व मुलीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना मोठ्या प्रमाणावर कॉरन्टाईन करण्यात आले होते. अखेर आज या सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. आधीचा रिपोर्ट सदोष होता की मुलीवर उपचार केल्यानंतर रिपोर्ट निगेटीव्ह आला, याविषयी आरोग्य विभागाने अजूनही मौन बाळगले आहे.

सोशल मिडीया सबसे तेज: सकारात्मक बातमी असताना, जिल्हा प्रशासनाने अजूनही प्रेस नोट जारी करुन तपशील जाहीर केलेला नाही. सोशल मिडीयावर बातम्या व्हायरल होईपर्यंत प्रशासनाकडे अहवाल पोचलेला नव्हता. पत्रकारांना मात्र जबाबदारीचे काम असल्याने खातरजमा केल्याशिवाय व अधिकृत पुष्टी झाल्याशिवाय वृत्त प्रसारित करता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. 3 वर्षांच्या चिमुकलीसाठी सर्वजण प्रार्थना करीत असल्यामुळे व सकारात्मक बातमी असल्यामुळे अधिकृत घोषणा झालेली नसताना दैनिक राजतंत्रतर्फे हे वृत्त प्रसारित केले जात आहे.

Tuesday, April 14, 2020

शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत - उद्योगमंत्री सुभाष देसाई



राज्यातील औद्योगिक स्थितीचा उद्योगमंत्र्यांनी घेतला आढावा

 शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू व्हावेत म्हणजे शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकेल, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक स्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कृतिदलाची आज मंत्रालयात त्यांनी आढावा बैठक घेतली.

या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन व विकास आयुक्त (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे तसेच प्रधान सचिव भूषण गगराणी व आरोग्य संचालक तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य मिशन अनुपकुमार व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

मुंबई-पुणे यांसारख्या तीव्र करोनाबाधित क्षेत्रांना वगळून इतर जिल्ह्यातील उद्योगांना काही नियंत्रणांसह उत्पादन सुरू करता येईल, यावर प्रस्ताव तयार करण्याची सूचना श्री. देसाई यांनी केली.  विशेषत: शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत म्हणजे शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकेल. कायमस्वरुपी तसेच कंत्राटी कामगारांना काही प्रमाणात उत्पन्न मिळावे, हा दृष्टीकोन प्राधान्याने पुढे ठेवण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

यावेळी केंद्राकडे करावयाच्या मागण्यांवरही चर्चा झाली. लघुउद्योगांना त्यांच्या कामगारांना किमान दोन महिने पगार देता यावा, यासाठी बँकांनी कर्जांची मर्यादा वाढवून दिली पाहिजे, याबाबत केंद्र शासनाने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. राज्यातील यंत्रणांनी वीज व पाण्याच्या प्रत्यक्ष वापराचीच देयके आकारावीत.  एमआयडीसीने विकास कालावधी किमान तीन महिने विनाशुल्क वाढवून द्यावा आदी मुद्दे विचारात घेण्यात आले. वरील सर्व मुद्यांवरील धोरणात्मक बाबीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंजुरीनंतरच मान्यता देण्यात येईल, असे श्री.देसाई यांनी स्पष्ट केले.