Monday, June 1, 2020

चीनची भारताला धमकी; आर्थिक परिणाम भोगायचे नसतील तर दूर रहा



नवी दिल्ली – चीन आणि अमेरिकेत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोप-प्रत्यारोपांचे शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे याचा फायदा भारताला होत असून अमेरिकेशी असलेले भारताचे संबंध अजूनही घट्ट होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे चीनने अमेरिका आणि आमच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धापासून भारताने दूर रहावे असा इशाराच दिला आहे. भारताला अशा प्रकारचा सल्ला देत सांगण्यात आले आहे की, अमेरिका आणि चीनमधील वादात भारत दूर राहिला तर बरे होईल, असे वृत्त चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये छापण्यात आले आहे.

यावेळी अमेरिकेचा सहकारी होऊन भारताने जर चीनविरोधात काहाही कारवाई केली तर कोरोना महामारीच्या या परिस्थितीत आर्थिक परिणाम वाईट होतील, असे चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी देत म्हटले आहे. अमेरिका आणि चीनमधील शीतयुद्धापासून भारताने दूर राहावे जेणेकरुन दोन्ही देशांमधील व्यावहारिक संबंध पुढेही सुरु राहतील, असे चीनने म्हटले आहे. भारतासोबतचे व्यावहारिक संबंध चांगले ठेवणे हे आपले लक्ष्य असल्याचेही चीनने सांगितले आहे. यामुळे यापुढेदेखील भारतात गुंतवणूक कऱण्यासाठी चीन दोन्ही देशांमधील संबंध चांगले ठेवण्यास उत्सुक असल्याचेही चीनने सांगितले आहे.

यावेळी भारताला इशारा देताना चीनने म्हटले आहे की, भारताला कोणत्याही परिस्थितीत राजकीय कारणांमुळे आर्थिक परिणाम सहन करावे लागू नयेत यासाठी चीन प्रयत्न करत असल्यामुळे भारत-चीन संबंधांबद्दल सकारात्मक विचार करत मोदी सरकारने पुढील वाटचाल केली पाहिजे. भारताला फक्त आर्थिक परिणाम भोगण्याची धमकी दिलेली नाही तर चीनने कोरोनासंबंधी वाढत्या प्रकरणांमध्ये लॉकडाउन हटवण्यावरुन टीकाही केली आहे.

Thursday, May 28, 2020

पिकांचे नुकसान करणाऱ्या टोळधाडी पासून शेतकरी बांधवानी सावध राहावे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

पालघर दि. 28 : गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश राज्यात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या कीडीचे थवे ताशी 12 ते 16 किमी इतक्या वेगाने उडतात. ही टोळधाड दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका निर्माण होऊ शकतो. ही कीड तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदिंचा फडशा पाडत असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वरील राज्यांच्या सिमेलगत पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणु व जव्हार तालुक्यांना टोळधाडीच्या प्रादुर्भावाबाबत शेतकरी बांधवानी सावध राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
या किडीपासून नुकसान टाळण्याच्या दृष्टीने प्रादुर्भावापुर्वीच खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषि विद्यापीठाकडून तांत्रिक माहिती प्राप्त झालेली आहे. सदर माहिती अन्वये नियंत्रणाबाबत कार्यवाही व्हावी व शेतकऱ्यांमध्ये टोळधाड नियंत्रणाबाबत जनजागृती व्हावी व कीडीपासून होणारे आर्थिक नुकसान टाळावे म्हणून शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून किडीने आपल्या शेतात प्रवेश करु नये याकरीता वाळवंटी टोळ सर्वेक्षण संस्था यांनी वेगवेगळया उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले. 
शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना- 
• शेतकऱ्यांचे गट बनवून रात्री शेतात देखरेख व पाहाणी करावी. संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीत हे किटक लाखोंच्या संख्यने विश्रांतीसाठी शेतात उतरू शकतात. 
• शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे, तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करावा. 
 • संध्याकाळी/ रात्रीच्या वेळी झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते. 
• प्रतिबाधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारीत किटकनाशक आझाडिरेक्टीन 1500 पिपिएम 30 मि.ली. किंवा 5 ऽ निंबोळी अर्काची प्रती 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
• आमिषाचा वापर 20 किलो गहू किंवा भाताच्या तूसामध्ये फिप्रोनिल 5 एससी, 3 मि.ली. मिसळावे व त्याचे ढिग शेतात ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व सदर आमिषामूळे हि किड मरण पावते. 
• टोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस 20 ईसी 24 मि.ली किंवा क्लोरपायरीफॉस 50 ईसी 10 मि.ली किंवा डेल्टा मिथ्रिन 2.8 ईसी 10 मि.ली किंवा फिप्रोनील 5 एससी 2.5 मि.ली किंवा ल्यांब्डा सायहेलोथ्रिल 5 ईसी 10 मि.ली किंवा मॅल्याथिऑन 50 ईसी 37 मि.ली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
• फवारणी शक्यतोवर रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. अशावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपावर जमा झालेले असतात. त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळणे शक्य होते. असेही जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले.
टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास संबंधित कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी तसेच कृषि विदयापीठ/कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा.असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकरी,काशिनाथ तरकसे, यांनी आवाहन केले आहे.

डहाणूत कोरोनाबाधित रुग्णांचे चाचणी होणार


 पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधितांसाठी दिलासादायक बातमी हाती आली आहे. डहाणूतील उप जिल्हा रुग्णालयात ” कोव्हीड- 19 ” चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. कालपासून हे केन्द्र कार्यान्वीत झाल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी हिंगणे यांनी दिली आहे. सुरुवातीला येथे दररोज 20 चाचण्या केल्या जाणार आहेत. उप जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आधीच उभ्या राहिलेल्या मॉडर्न रुरल हेल्थ सेंटरच्या सुसज्ज इमारतीमध्ये हे केंद्र स्थापित करण्यात आले.

ह्यापूर्वी पालघर जिल्ह्यातून घशाचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवावे लागत होते. तपासणी अहवाल किमान 3 ते 4 दिवसांत प्राप्त होत असे. हा कालावधी कमी झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करणे सोईचे ठरणार आहे. तपासणी केंद्राची सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, आरसीएमआरचे संचालक डॉ. महाले ह्यांचे अभिनंदन केले जात आहे.

वेदान्ताचा डॉक्टर कोरोनाबाधित पॉझिटिव्ह


 डहाणू तालुक्यातील वेदान्ता वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. हा डॉक्टर आयसीयू युनीटमध्ये कार्यरत असून वसतीगृहात निवास करीत होता. तो कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने तपासणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर डहाणू तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता 17 झाली आहे.

पालघर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे 25 बळी झाले असून त्यातील 22 मृत्यू वसई महानगर क्षेत्रातील असून 1 जण वसई ग्रामीण तालुक्यातील आहे. 2 मृत्यू पालघर तालुक्यातील आहेत. वसई तालुक्यात आतापर्यंत 633 कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील जिल्हानिहाय कोरोना स्थिती!!!