Tuesday, July 28, 2020

उद्या जाहीर होणार दहावीचा ऑनलाईन निकाल

कोरोना महामारीमुळे बारावीसह दहावीचा सुद्धा निकाल वेळेवर लागू शकला नाही. गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावीचा सुद्धा निकालाची तारीख जाहीर केली आहे.

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.

या वेब साईट वर पाहू शकता दहावीचा निकाल



Monday, July 27, 2020

डहाणू शहरात 14 कोरोना रुग्णबाधित

डहाणू शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज त्यामध्ये 14 जणांची भर पडली आहे. आता शहरातील कोरोना बाधीतांची संख्या 148 झाली आहे. आज निष्पन्न झालेल्या रुग्णांमध्ये रामवाडीतील 7 जण, वृंदावन अपार्टमेंटमधील 2 जण व सरावली, लोणीपाडा, पारनाका, डहाणू गांव, आगर येथील प्रत्येकी 1 जणाचा समावेश आहे. कोरोनाबाधीतांचा वाढता आकडा पहाता लोकांमध्ये भीती पसरली असून कोरोनाच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी लॉक डाऊनची मागणी जोर धरताना दिसते आहे.

पालघर तालुक्यात 57 नवे रुग्ण

पालघर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज, 27 जुलै रोजी 85 नवे कोरोना (कोविड-19) रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 57 रुग्ण केवळ पालघर तालुक्यातील आहेत. त्यामुळे एकट्या पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 वर पोहोचली आहे. समाधानाची बाब म्हणजे या 1100 रुग्णांपैकी 768 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असुन उर्वरित 313 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 19 रुग्ण कोरोना विषाणूला बळी पडले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघरमध्ये सर्वाधिक 57, त्याखालोखाल डहाणूत 17, विक्रमगडमध्ये 5, वसई ग्रामीणमध्ये 4 व वाडा तालुक्यातील 2 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तलासरी, जव्हार व मोखाडा तालुक्यात आज एकही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही.

पालघर तालुक्यातील एकुण रुग्णांची संख्या 1100 वर
पालघर ग्रामीणमधील इतर तालुक्यांच्या तुलनेत पालघर तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील एका आठवड्याची आकडेवारी पाहिल्यास काल, 26 जुलै रोजी 38 रुग्ण, 25 जुलै रोजी 33, 24 जुलै रोजी 54, 23 जुलै रोजी 50, 22 जुलै रोजी 33 अशा संख्येने येथील रुग्णांची संख्या वाढताना दिसली आहे.

बोईसरच ठरतोय मोठा हॉटस्पॉट :
पालघर तालुक्यात आज आढळलेल्या 57 रुग्णांपैकी तब्बल 23 रुग्ण केवळ बोईसर भागातच आढळून आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन बोईसर कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरतोय. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असुन मोठ्या प्रमाणावर नागरीक अफवांना बळी पडताना दिसत आहेत.

भीमनगरमधील सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले!
15 जुलै रोजी बोईसरमधील भीमनगर भागात 27 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हे 27 रुग्ण परिसरातील अनेकांच्या संपर्कात आल्याने येथील 104 जणांना वाडा व पालघर येथील कॉरंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. या 104 जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील आणखी 27 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. परिसरात एकुण 54 रुग्ण निष्पन्न झाल्याने व त्यात विविध अफवा पसरल्याने परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत असून व त्यामुळेच लोकांना मुद्दाम पॉझिटिव्ह दाखवले जात असल्याच्या अफवेमुळे घाबरलेली काही कुटुंबे रातोरात गावी गेल्याचेही प्रकार उघडकीस आले होते. आता या भागातील सर्व रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले असून येथील नागरीकांनी काही अंशी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Sunday, July 26, 2020

पालघर जिल्ह्यात नवे 565 कोरोना +Ve व 9 मृत्यू फक्त 2 दिवसात


पालघर जिल्ह्यात मागील 48 तासांत तब्बल 565 नव्या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती आढळल्या असून त्यातील 385 व्यक्ती वसई महानगर क्षेत्रातील असून 180 व्यक्ती पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात मृत्यूची संख्या 9 ने वाढली असून त्यातील 6 मृत्यू वसई महानगरातील तर 3 मृत्यू पालघर तालुक्यातील आहेत.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात सर्वाधिक 71 कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून त्या खालोखाल डहाणू तालुक्यातील 46 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. वाडा तालुक्यात 35, वसई ग्रामीण तालुक्यात 18, तलासरी तालुक्यात 7, विक्रमगड तालुक्यात 2 व मोखाडा तालुक्यात 1 अशी कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या आहे. जव्हार तालुक्यात नवा एकही रुग्ण निष्पन्न झालेला नाही.

Saturday, July 25, 2020

ई-सीमचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्र सायबरचे आवाहन


मुंबई, दि.२२ :-  ई  सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे.

सध्या बाजारात नवीन प्रकारचे फोन आले आहेत त्यामध्येच e -सिम किंवा embedded सिमकार्ड असते. हे e -सिमवाले फोन जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला physical सिमकार्डची गरज नसते व तुम्ही e -सिम activate करून पाहिजे ते मोबाईल नेटवर्क योग्य शुल्क भरून वापरू शकता. सध्या सायबर गुन्हेगार या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग विशेषतः airtel मोबाईल कंपनीच्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी करत आहेत.

फसवणूक

सायबर गुन्हेगार #१२१ या airtel च्या नंबरवर स्वतःचा ई-मेल id हा ग्राहकांच्या नावाने अपडेट करतात व सदर ग्राहकाच्या नावाने e -सिमकार्ड issue करून घेतात. तसेच QR कोडचा वापर करून ते e -सिम activate करून घेतात. त्यानंतर त्या ग्राहकाला एक sms येतो व लिंक असते ज्यावर क्लिक केल्यास एक फॉर्म उघडतो व त्यात तुमची सर्व आर्थिक माहिती जसे की बँक खात्याचा नंबर क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर पिन नंबर सर्व विचारले जातात. सायबर भामटे त्यांच्या फोन मध्ये तुमच्या नावाचे e -सिम वापरून मग तुमची सर्व बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करून तुमची फसवणूक करतात.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि,

१) कृपया गरज नसल्यास हे e -सिम activate करू नका .

२) कोणताही ई-मेल id तुमचा ई-मेल id म्हणून देऊ नका .

३)शक्यतो सोशल मीडियावर तुमचा मोबाईल फोन नंबर ठेवू नका .

४) जर तुम्हाला असे e -सिम बद्दल काही फोन आले, तर कृपया लगेच कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्याची खातरजमा करून घ्या.

५) इंटरनेटवरील कोणत्याही फॉर्मवर तुमच्या बँक खात्याची माहिती डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर,पिन नंबर देऊ नका . 

केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.                 

असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.