Wednesday, July 29, 2020

पालघर तालुक्यात 75 रुग्ण पॉझिटिव्ह वाढले



  पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रोजच वाढताना दिसत असून आज पुन्हा तालुक्यात नव्या 75 रुग्णांची भर पडली आहे. तर बोईसरमध्ये रुग्णसंख्या अधिकच वेगाने वाढत असून आज येथे तब्बल 42 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पालघर जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज, 28 जुलै रोजी जिल्ह्यात (ग्रामीण) एकूण 114 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. यात निम्म्याहून अधिक रुग्ण पालघर तालुक्यातील (75) आहेत. तर त्याखालोखाल वाड्यात 26 रुग्ण, डहाणूत 8, विक्रमगडमध्ये 3, तलासरीत 1 व जव्हारमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.

बोईसरमध्ये सर्वाधिक 42 रुग्ण!
पालघर ग्रामीणमध्ये मोठा कोरोना हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेल्या बोईसरमध्ये आज तब्बल 42 रुग्ण आढळून आले आहे.

Tuesday, July 28, 2020

शाळा बंद, पण शिक्षण आहे


राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शिक्षकांना कोरोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रसिद्धी माध्यमातून सरकारी शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. या वृत्तामध्ये तथ्य नसून यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक सविस्तर खुलासा शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत करण्यात आला आहे.
शाळा बंद पण शिक्षण आहे…

• शाळा बंद .. पण शिक्षण आहे .. या अभ्यासमालेच्या सहाय्याने दीक्षा APP आधारित विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठीचा उपक्रम गेले ३ महिने सलग सुरु आहे.

• विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आली आहे.

• जिओ टी.व्ही वर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इ. ३ री ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• जिओ सावन या रेडीओ वाहिनीवर देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• पाठ्यपुस्तके १००% विद्यार्थ्यांना पोहोच करण्यात आली आहेत.

• यु ट्यूब वाहिनीवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चे Channel सुरु करून त्यावर व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

• DD सह्याद्री वाहिनीवर टीलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम इ.१ ली ते इ.८ वी साठी सुरु करण्यात आला आहे.

शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गूगल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

• स्वयंसेवक, शिक्षक वाडी वस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत.

शाळा बंद…पण शिक्षण सुरु रहावे यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

उद्या जाहीर होणार दहावीचा ऑनलाईन निकाल

कोरोना महामारीमुळे बारावीसह दहावीचा सुद्धा निकाल वेळेवर लागू शकला नाही. गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावीचा सुद्धा निकालाची तारीख जाहीर केली आहे.

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.

या वेब साईट वर पाहू शकता दहावीचा निकाल



Monday, July 27, 2020

डहाणू शहरात 14 कोरोना रुग्णबाधित

डहाणू शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज त्यामध्ये 14 जणांची भर पडली आहे. आता शहरातील कोरोना बाधीतांची संख्या 148 झाली आहे. आज निष्पन्न झालेल्या रुग्णांमध्ये रामवाडीतील 7 जण, वृंदावन अपार्टमेंटमधील 2 जण व सरावली, लोणीपाडा, पारनाका, डहाणू गांव, आगर येथील प्रत्येकी 1 जणाचा समावेश आहे. कोरोनाबाधीतांचा वाढता आकडा पहाता लोकांमध्ये भीती पसरली असून कोरोनाच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी लॉक डाऊनची मागणी जोर धरताना दिसते आहे.

पालघर तालुक्यात 57 नवे रुग्ण

पालघर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज, 27 जुलै रोजी 85 नवे कोरोना (कोविड-19) रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 57 रुग्ण केवळ पालघर तालुक्यातील आहेत. त्यामुळे एकट्या पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 वर पोहोचली आहे. समाधानाची बाब म्हणजे या 1100 रुग्णांपैकी 768 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असुन उर्वरित 313 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 19 रुग्ण कोरोना विषाणूला बळी पडले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघरमध्ये सर्वाधिक 57, त्याखालोखाल डहाणूत 17, विक्रमगडमध्ये 5, वसई ग्रामीणमध्ये 4 व वाडा तालुक्यातील 2 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तलासरी, जव्हार व मोखाडा तालुक्यात आज एकही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही.

पालघर तालुक्यातील एकुण रुग्णांची संख्या 1100 वर
पालघर ग्रामीणमधील इतर तालुक्यांच्या तुलनेत पालघर तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील एका आठवड्याची आकडेवारी पाहिल्यास काल, 26 जुलै रोजी 38 रुग्ण, 25 जुलै रोजी 33, 24 जुलै रोजी 54, 23 जुलै रोजी 50, 22 जुलै रोजी 33 अशा संख्येने येथील रुग्णांची संख्या वाढताना दिसली आहे.

बोईसरच ठरतोय मोठा हॉटस्पॉट :
पालघर तालुक्यात आज आढळलेल्या 57 रुग्णांपैकी तब्बल 23 रुग्ण केवळ बोईसर भागातच आढळून आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन बोईसर कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरतोय. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असुन मोठ्या प्रमाणावर नागरीक अफवांना बळी पडताना दिसत आहेत.

भीमनगरमधील सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले!
15 जुलै रोजी बोईसरमधील भीमनगर भागात 27 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हे 27 रुग्ण परिसरातील अनेकांच्या संपर्कात आल्याने येथील 104 जणांना वाडा व पालघर येथील कॉरंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. या 104 जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील आणखी 27 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. परिसरात एकुण 54 रुग्ण निष्पन्न झाल्याने व त्यात विविध अफवा पसरल्याने परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत असून व त्यामुळेच लोकांना मुद्दाम पॉझिटिव्ह दाखवले जात असल्याच्या अफवेमुळे घाबरलेली काही कुटुंबे रातोरात गावी गेल्याचेही प्रकार उघडकीस आले होते. आता या भागातील सर्व रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले असून येथील नागरीकांनी काही अंशी सुटकेचा निश्वास सोडला आहे.