Saturday, August 8, 2020

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्टदरम्यान


शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण ( पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया दिनांक १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Maha Info Corona Website

श्री. सामंत म्हणाले,विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे.  कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरीलपैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धतीसोबतच  ई-स्क्रूटिनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही.  अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील. प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी  आणि e-Scrutiny  पद्धतीची माहिती ,अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती , हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.असेही श्री. सामंत यांनी संगितले.

आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस International Day of the World’s Indigenous Peoples


9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघा ने 1993 ला घेतला आहे.13 सप्टेंबर 2007 रोजी “अदिवासी अधिकार जहिरनामा" यूनोच्या आमसभेत मंजुर झाला आहे. 9 ऑगस्ट 2020 रोजी अधिकार जाहिरनाम्यास 13 वर्षे पूर्ण होत आहेत . परंतु सरकार आदिवासी दिवस व अधिकार जहिरनामा या बाबतीत उदासीन दिसून येत आहे. 

आजही अदिवासी समाज आपल्या अधिकारापासुन वंचित केला जात आहे व उपेक्षितांचे जीवन जगत आहे. अज्ञानामुळे त्यांना अन्याय ,अत्याचार सहन करावा लागत आहे. आदिवासीवर होणारे जुलुम व दडपशाही याविरुध्द अखेरचा उपाय म्हणून त्यांना बंड करणे भाग पडू नये यासाठी घोषणा पत्रातील खालील तरतुदिंचे काटेकोर पालन करणे हे राज्याचे दायित्व आहे ही जाणीव सरकारला करुण देण्याची जबाबदारी पार पाडुया.

1. राज्य आदिवासीं लोकांचा इतिहास, भाषा, मौखिक परंपरा तत्वज्ञान, लेखन प्रणाली व साहित्य संरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय करील. राजकीय, कायदेशीर आणि शासकीय कार्यवाही योग्य सुविधामर्फ़त ऐकण्यासाठी व समजून घेण्यासाठी राज्य प्रभावी उपाय केल्याची खात्री करेल.[अनुच्छेद 13(2)]

2. राज्य सरकारी मालकीच्या प्रसारमाध्यमांमध्ये आदिवासी लोकांच्या संस्कृतीक विविधतेचे सर्वोतोपरी प्रतिबिंब दिसेल यासाठी प्रभावी उपाय करेल. तसेच खाजगी प्रसार माध्यमांना आदिवासींच्या सांस्कृतिक विविधतेचे सर्व प्रकारे प्रचार करण्यासाठी प्रोत्साहन देईल [अनुच्छेद 16(2)]

3.राज्य, ज्या कायद्यामुळे किंवा प्रशासनिक निर्णयाद्वारे आदिवासी व्यक्तींवर परिणाम होतो, ते लागू करण्यापूर्वी ,संबधीत आदिवासी प्रतिनिधी संस्थांसी विचार विनिमय करून लेखी सहमति घेईल.[अनुच्छेद 19]

4. राज्य, आदिवासी व्यक्तिच्या परंपरागत मालकीच्या, कबज़्यातील किंवा कसत असलेल्या व नियंत्रणातील जमिनींना, भू-भागांना व संसाधनाना कायदेशीर मान्यता व संरक्षण देईल. अशा प्रकारचे सरक्षण, मान्यता देताना राज्य संबधित आदिवासी लोकांचे रितीरिवाज, परंपरा व जमीनपटा पद्धतीचा सन्मानपूर्वक विचार करील.[अनुच्छेद 26(3)]

5. आदिवासी लोकांचा प्रदेश/भाग सैनिकी गतिविधि करीता वापरण्यापूर्वी राज्य संबधित आदीवासीं लोकांच्या प्रातिनिधिक संस्था द्वारे परिणामकारक विचार विनिमय करेल.[अनुच्छेद 30(2)]

6. या घोषणा पत्रातील अधिकाराना मान्यता देण्यासाठी व त्या अधिकाराचा सुरक्षितपणे प्रयोग करण्यासाठी राज्य आदिवासी लोकांच्या सहमतीने प्रभावी उपाय करील.[अनुच्छेद 31(2)]

7. कोणत्याही प्रकल्पामुळें विशेषतः खनिजे, जल व इतर संसाधने या संबधी विकास, उपभोग किंवा वापर करताना आदिवसिंच्या जमिनी, भू भाग आणि संसाधने यावर परिणाम होत असेल तर प्रकल्पाला मंजुरी देण्यापुर्वी आदिवासी लोकांची स्वतंत्र व सूचित सहमती प्राप्त करण्यासाठी त्याच्या प्रातिनिधिक संस्थाशी राज्य विचार विनिनाय व सहकार्य करेल. [अनुछेद 32(2)]

8.या घोषणा पत्रातील हक्क बाजावण्याच्या द्दृष्टीने राज्य आदिवासी लोकाबरोबर योग्य विचारविनिमय करुण उपाय योजना करील.[अनुच्छेद 36(2)]

9. या घोषणा पत्रातील उद्दिष्ठे प्राप्त करण्यासाठी आदिवासी लोकांबरोबर विचार विनिमय करून त्याच्या सहयोगाने राज्य कायदेशीर उपाय करण्याचा प्रयास करील. [अनुच्छेद 38]

10. या घोषनापत्रातील अधिकाराचा उपयोग करण्याच्या उद्देशाने आदिवासी राज्याकडून आर्थिक तसेच तांत्रिक सहायता घेण्याचा अधिकार आहे. [अनुच्छेद 39]

UNDRIP बद्दल सविस्तर माहिती साठी - 
I. Hindi And English Version (PDF, 65 Pages) : click on
II. Marathi Version (PDF, 4 Pages) : click on

या निमित्ताने वाढत असलेली हि जागरूकता आणि ऊर्जा समाज हिताचे उपक्रम मजबूत आणि निरंतर सुरु ठेवण्यासाठी  कामी आणूया.
Lets do it together ! 

जोहार !

Friday, August 7, 2020

डहाणू शहरात मृत्यूंची संख्या 1 ने वाढून 7


डहाणू शहरात प्रथमच कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचार चालू असलेल्या रुग्णांपेक्षा वाढली आहे. 6 ऑगस्ट पर्यंत निष्पन्न झालेल्या 248 रुग्णांपैकी 134 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यामध्ये अतिज्येष्ठ नागरिक जयंतीलाल नागशेठ (89) यांचाही समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्या 114 रुग्णांपैकी 92 जण कोव्हिड उपचार केंद्रात उपचार घेत असून 22 जण घरीच राहून उपचार घेत आहेत. रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरण केलेल्यांची संख्या 980 वर स्थिर आहे. घरीच उपचार घेण्याची व विलगीकरणाची अनुमती देण्याचे धोरण जाहीर झाल्यानंतर तपासणी करुन घेण्यासाठी लोकांकडून तुलनेने अधिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

डहाणू शहरात 4 ऑगस्ट पासून लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर सतत 3 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने लॉक डाऊनला हातभार लागला आहे. डहाणू नगरपरिषद क्षेत्राबाहेरील बाजारात मात्र गर्दी झालेली पहायला मिळाली.

औषधी रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासी बांधवांची समृद्धी

रानभाज्या महोत्सवाचा मंत्रालयात शुभारंभ

९ ऑगस्टला राज्यात रानभाज्या महोत्सव – कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई, दि. ५ : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री व्यवस्था बळकट करून हा ठेवा सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतानाच रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासी बांधवांची समृद्धी ही संकल्पना कृषी विभागामार्फत अवलंबविण्यात येईल. यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि. ९ ऑगस्ट रोजी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे सांगितले.


कृषीमंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाची सुरूवात मंत्रालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली. कृषीमंत्री श्री.भुसे, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, सचिव एकनाथ डवले आणि शहापूर व वाडा येथील आदिवासी भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, जंगलात आढळणाऱ्या या रानभाज्या, फळं विविध आजारांवर गुणकारी असून त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी या रानभाज्या उपयुक्त ठरू शकतात मात्र शहरी भागातील नागरिकांपर्यंत त्या पोहोचण्यासाठी त्या केवळ प्रदर्शनात न राहता त्यांची विक्री व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत राज्यभर रानभाज्या महोत्सवाची संकल्पना सुचली आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही  संकल्पना प्रत्यक्षात आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून आदिवासी भागातील बाधवांना त्यामुळे रोजगार निर्माण होऊ शकेल.

रानभाज्या महोत्सव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले. या रानभाज्या नागरिकांना कायमस्वरूपी कशा उपलब्ध होतील यांचेही नियोजन करण्यात येत असून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हा रानभाज्यांचा औषधी ठेवा शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी शहापूर आणि वाडा येथून आलेल्या महिलांनी रानभाज्यांची ओळख सांगितली. त्याचबरोबर त्यांचे औषधी गुणधर्मही त्यांनी सांगितले.


ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना कृषीमंत्र्यांकडून रानभाज्यांची भेट

दरम्यान, कृषीमंत्री श्री.भुसे यांनी आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना रानभाज्या महोत्सवाविषयी माहिती दिली. यावेळी विविध रानभाज्या एकत्रित असलेली पेटी श्री.पवार यांना भेट देण्यात आली. उपमुख्यमंत्री‍ अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील कृषीमंत्री श्री.भुसे व राज्यमंत्री डॉ.कदम यांनी रानभाज्यांची पेटी दिली. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना सचिव श्री.डवले यांच्या हस्ते रानभाज्यांची पेटी देण्यात आले.


चित्रफित दालन

व्हिडिओ प्लेयर

Wednesday, August 5, 2020

5 व 6 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्हयात 5 व 6 ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यसह मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. ही शक्यता विचारात घेऊन पालघर जिल्हयातील नागरिकांनी ह्या कालावधीत अनावश्यक प्रवास करणे, नदी, नाला, ओढा, धबधबा व समुद्र किनारी जाणे टाळावे. तसेच मच्छिमारांनी या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये व जिल्हयातील नागरिकांनी मुसळधार पावसाची शक्यता विचारात घेता, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले