दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील. त्याअनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
Tuesday, April 13, 2021
अखेर दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली; मे-जुनमध्ये होणार परीक्षा
Sunday, April 11, 2021
Friday, April 9, 2021
कोविडसाठी घ्यावयाची काळजी .
Friday, April 2, 2021
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन बंद!
जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकार्यांनी पुन्हा एकदा नविन आदेश काढून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. तर 10 व 12 वीचे वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय ऐच्छिक असुन शाळा व्यवस्थापनाने याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.
राज्य शासनाने यापुर्वी राज्यातील 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देताना शिक्षकांनी स्वत:ची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच करावी असे निर्देश दिले होते. मात्र काही शिक्षक बाहेर गावातून शाळेत ये-जा करीत असल्याचे तसेच यामुळे काही शिक्षक कोविड-19 ने बाधित झाल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. असा प्रकार जिल्ह्यात घडू नये तसेच जिल्ह्यातील कोविड-19 चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित/विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवणे आवश्यक असुन येत्या 5 एप्रिलपासुन पुढील आदेशापर्यंत बंदीचा आदेश लागू होणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
तर 10 व 12 वी चे वर्ग सुरु ठेवणे शाळा व्यवस्थापनांना ऐच्छिक असणार आहे. मात्र आजारी विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी शाळेत प्रवेश करणार नाहीत तसेच आजारी असलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51(ब), भारतीय दंड संहिते (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी 26 मार्च रोजी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र 31 मार्च रोजी हा निर्णय मागे घेण्यात आला होता.
Saturday, March 27, 2021
राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
मुंबई, दि. 26 : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारपासून (दि. 28 मार्च 2021) रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.
लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
- धोका टळला नाही उलट वाढला!
ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्या.
- कडक निर्बंधांचे संकेत!
जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचार्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.