Monday, June 7, 2021

पालघर जिल्ह्यात 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा


मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणार्‍या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणार्‍या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, बहृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महापालिकांचे आयुक्त, कोकण विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधिक्षक, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

  • पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी!
    या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणार्‍या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

दरडग्रस्त भागातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे!
दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशा सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे.

  • अनपेक्षिरित्या घडणार्‍या गोष्टी गृहित धरुन तयारी करा!
    अतिवृष्टीच्या काळात काही नैसर्गिक गोष्टी घडणे अपेक्षित असते तर काही गोष्टी या अनपेक्षितपणे घडतात. आपण अपेक्षित गोष्टी गृहित धरून तयारी करतो परंतू ज्या अनपेक्षित गोष्टी घडू शकतात त्या गृहित धरून प्रशासनाने त्याचीही तयारी करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या काळात मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.
  • रुग्णसेवेत अडथळा नको!
    अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजनचा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
  • पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष नको!
    कोविड काळात कोविड आणि पावसाळी आजार एकत्र आले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते याकडे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले तसेच पावसाळी आजार उद्भवू शकणार्‍या परिस्थितीवर विशेषत: मलेरियावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
  • पाणी साचणारी ठिकाणे लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात!
    मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणार्‍या स्थळांचा शोध घ्यावा, पंपींग स्टेशन्स आणि झडपा यांची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी, यातील अडथळे दूर करावेत, लो लाईन एरियात विशेष काळजी घ्यावी, गरज पडल्यास या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात, धोकादायक इमारतींमधील नागरिकांना धोक्याची कल्पना देऊन संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरीत होण्यास सांगावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Thursday, June 3, 2021

जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील आदेश मोजक्याच दुकानदारांना मोकळीक!

जिल्ह्यातील सलुनचालकांना धक्का; दुकान सुरु ठेवण्याची परवानगी रद्द!


पालघर जिल्हाधिकार्‍यांनी काल, 31 मे रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा नसलेली काही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेदरम्यान उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र राज्य शासनाच्या आदेशात सलुन, स्पा व जिम पुर्णपणे बंद ठेवण्याचे नमुद असल्याने पालघर जिल्ह्यातील सलुन उघडण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज याबाबतचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असुन 31 मे रोजीचे सलुन (केश कर्तनालय व दाढी करणे) सुरु ठेवण्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.

Sunday, May 2, 2021

कोविड-19 विशेष मुख्यमंत्री सहायता निधी


कोविड-19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे

इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

 

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

आद्यक्रांतिवीर शहीद राघोजी भांगरे यांचा जीवन प्रवास

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावले. अनेकांच्या छोट्या मोठ्या लढाया यावेळी महत्त्वाच्या होत्या. इतिहासाने त्याची दखल घेतली असली तरी अनेक क्रांतिकारकांची दखल घेतली गेली नाही. ते समाजापर्यंत पोहोचलेच नाही. आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची दखल इतिहासाला घ्यावी लागली. परंतु अजूनही ते जनसमाजात पोहोचलेले नाहीत.
राघोजी भांगरेंचा जन्म ८ नोव्हेंबर १८०५ रोजी देवगाव येथे आदिवासी महादेव कोळी जमातीतील आई रमाबाई व वडील रामजी यांच्या पोटी जन्म झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेले देवगाव हे छोटेसे खेडे होते. वडील रामजी ब्रिटिश सरकारच्या दरबारी सुभेदार म्हणून नोकरी करत होते. परंतु इ. स. १८१८ साली ब्रिटिशांनी मराठा सैन्यास हरवल्यानंतर महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्यांच्या शिलेदाऱ्या, वतनदाऱ्या काढल्या. परंपरागत अधिकार काढल्याने इंग्रजांविरुद्ध महादेव कोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.
कोकणात एक दरोडा पडला होता, या दरोड्याचा आरोप राघोजीचे वडील बंडखोर असल्यामुळे त्यांच्यावर करण्यात आला. राघोजींच्या घरच्यांचा पोलिसांनी मोठा छळ केला. राजूर प्रांताचा पोलिस अधिकारी अमृतराव कुलकर्णी यांची भेट घेऊन छळ थांबविण्यासंदर्भात दोघांमध्ये बोलणे चालू असताना बाचाबाचीत अनर्थ झाला. धिप्पाड राघोजीने मुंडकं तोडून एका कोपऱ्यात ठेवले. धिप्पाड राघोजीला अडविण्यास कोणी धाजवले नाही. १८२६ चे ते साल त्यांनी आपल्या सुखी जीवनावर तुळशीपत्र ठेवले. राघोजी भांगरे आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाने क्रांतीची मशाल अधिक तेजस्वी होऊ लागली. १८२७ साली हिवाळ्या घाटाच्या दरीमध्ये प्रचंड काळोखात एक सभा घेतली. येथील सभेत देवजी आव्हाड सहाय्यक सल्लागार, तर राया ठाकर राघोजींचा अंगरक्षक बनला. मायभूमीला मुक्त करण्याची शपथ यावेळी घेतली गेली. राघोजींच्या टोळ्यांनी गोऱ्यांना सळो की पळो करून सोडले.
इ. स. १८२८ ला शेतसारा वाढविण्यात आला. सारावसुलीमुळे गोर गरीबांना पैशाची गरज भासू लागली. त्यामुळे गोरगरीब सावकर-वाण्याकडून भरमसाठ कर्ज घेऊ लागले. त्यामुळे कर्जाच्या बदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. राघोजीने सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंड तीव्र केले. इंग्रज सत्तेच्या विरोधात नगर, पुणे, नाशिक, ठाणे या भागात बंडकऱ्यांच्या टोळ्या उभ्या केल्या.
इ. स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरूंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटले होते. परंतु ते प्रत्यक्षात आले नाही. इंग्रजांंविरोधातील असंतोष वाढत होता. भिल्ल जमातीच्या टोळ्या उभ्या राहिल्या, राघोजीना त्यांची साथ मिळाली. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजार रूपये बक्षीस जाहीर केले. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्यांने बंड उभारले. कॅप्टन मँकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घखट, रस्ते, जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळविली परंतु बंडखोर वरमले नाहीत. बंड तीव्र झाले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली, मार्ग रोखून धरले. ८० जणांना कैद केले. दहशतीमुळे लोक उलटले. फितुरीमुळे राघोजीचा खंबीर साथीदार बापूजी भांगरे मारला गेला.
साताऱ्याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते, त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणाऱ्या सावकारांना धडा शिकवणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करीत असे. १८४४ साली साताराचे राजे प्रतापसिंह छत्रपति यांची भेट झाल्याची अभ्यासकांचे मत आहे.
नोव्हेंबर इ. स. १८४४ ते मार्च इ. स. १८४६ या काळात राघोजींचे बंड शिगेला पोहोचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने ‘आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रजांचे वैरी आहोत’, अशी भूमिका जाहीर केली होती. कुटुंबातील समाजातील स्रियांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य, प्रामाणिकपणा व नितिमत्ता याला त्याने उच्चतम मानले. इ.स. १८४५ ला जुन्नरचा उठाव ठरला. कॅप्टन मँकिंटॉशने २० हजाराची फौज घेऊन वेढा टाकला. यावेळी मोठी हार पत्कारावी लागली. भागोजी नाईक, खंडू साबळे आदी निष्ठावंत साथीदार धारातीर्थी पडले. राघोजी तुरी देऊन निसटला. राघोजीला कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला. इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना वकील मिळू दिला नाही. त्याने कोर्टात स्वतः च बाजू मांडली. २ मे १८४८ रोजी ठाणे सेंंट्रल जेल येथे राघोजी भांगरेंना फाशी देण्यात आली. परंतु राघोजींचे स्मरण करण्यासाठी २ मे २०१४ उजाडावे लागले. यादिवशी १६६ व्या स्मृतीदिनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे सेंट्रल जेल व जिल्हाधिकारी कार्यालाजवळील मुख्य चौकास आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे असे नावे देण्यात आले.