Wednesday, September 30, 2020

डहाणूतील वैद्यकीय व्यावसाईकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका! – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेचे आवाहन


दि. 30 सप्टेंबर 2020:- कोरोना साथरोगाच्या काळात डहाणूतील खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांचे कर्मचारी जीवाची बाजी लावून लढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने एखादे नर्सिंग होम सील झाल्यामुळे बंद केल्याचा अपवाद वगळला तर नर्सिंग होम्स पूर्वीप्रमाणे निरंतर रुग्णसेवा देतच आहेत. त्यामुळे डहाणूतील वैद्यकीय व्यावसाईकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका व गैरसमज पसरवू नका असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेतर्फे करण्यात आले आहे. शाखेच्या मानद सचिव डॉ. ज्योती बापट यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

लॉकडाऊनच्या काळापासून डहाणूतील सर्व खाजगी डॉक्टर आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडत आहेत. आजच्या घडीला सुद्धा २-३ रुग्णालये वगळता बाकी सर्व रुग्णालये खुली आहेत व डॉक्टर रुग्ण तपासत आहेत. जी रुग्णालये बंद आहेत, त्या रुग्णालयांचे डॉक्टर, स्वतः कोरोना बाधित झाले आहेत व ह्यातील काही डॉक्टर तर आजच्या घडीला मुंबईच्या रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहेत. डहाणूतील निदान १५ डॉक्टरांना कोरोनाची बाधा ही रुग्णसेवा करतांनाच झाली आहे. अशा डॉक्टरांचे कुटुंबीय देखील संक्रमित झाल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली असून 55 वर्षा वरील डॉक्टर व हेल्थ केअर वर्कर्स नी कोरोना काळात काम करू नये अशा सरकारची सूचना असताना डहाणूतील बहुतांश ज्येष्ठ डॉक्टर, सतत रुग्णसेवा करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

प्रसिद्धीपत्रकातील अन्य ठळक मुद्दे:

 • काही प्रकारचे रुग्ण ( उदा. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया ठरविलेले रुग्ण, गर्भारपणातील शेवटच्या आठवड्यातील स्त्रिया ) दाखल करताना कोरोना चाचणी करून दाखल केले जाणे ICMR GUIDELINES प्रमाणे आवश्यक असते. ह्या मार्गदर्शक तत्वांचेच पालन आम्ही रुग्णालयात सेवा देताना करीत आहोत.

 • आम्हाला उप जिल्हा रुग्णालय, डहाणू येथून सूचना मिळाल्यानुसार, दाखवायला आलेल्या रुग्णाला जर ताप, खोकला, श्वासाला त्रास, अर्थात कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास, त्यांना RT-PCR अथवा रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करायला पाठवणे व अशा रुग्णांची पूर्ण माहिती, सरकारी अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे.

 • कोरोनासंदर्भात सुचनांचे उल्लंघन केल्यास, आम्हा खाजगी डॉक्टरांविरुद्ध, सध्या लागू असलेल्या साथरोग प्रतिबंधक कायदा (Pandemic Act) अंतर्गत, गुन्हा दाखल होऊ शकतो.

 • डहाणू परिसरातल्या खाजगी रुग्णालयांमधे कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करून घेणे व उपचार करणे ह्याला मनाई आहे. जर कधी कोरोनाचा रुग्ण आढळला, तर तो दवाखाना अथवा रुग्णालय सील केले जाते. अश्याने कोरोनाची बाधा नसलेले सर्वसाधारण रुग्णांना उपचार देता येत नाही व त्यांचे हाल होतात.

 • कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी, सरकारी यंत्रणेस आम्ही खाजगी डॉक्टर्स आमच्या परीने हातभार लावित आहोत. या दरम्यान काही रुग्ण दिलेला सल्ला मानत नाहीत व ‘त्यांना उपचार दिले जात नाही’ असा गैरसमज करून घेतात.

 • कोरोनाच्या विळख्यातून जनतेस वाचविण्यासाठी लोकांमधील आजाराबद्दलच्या गैरसमजांचे निरसन करणे व लोकांना चाचण्यांसाठी अधिक प्रवृत्त करणे याची नितांत गरज आहे. या बाबी आम्ही खाजगी डॉक्टर समजून आहोत व रुग्णांना समजाऊन देत आहोत.

कोरोनासोबत आता क्रायमिन विषाणूचेही संकट; नागरीकांनी सतर्क राहण्याचे पालघर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 दि. 29 : महाराष्ट्र राज्य सध्या कोरोनाचा सामना करत असतानाच आता नविन संकट राज्यासमोर उभे राहिले आहे. गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (सीसीएचएफ) या साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या सीमा भागातील पशुपालक व मांस विक्रेत्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

शात सध्या कोरोना रोगाचे सावट असतांनाच आता क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (सीसीएचएफ) या नव्या विषाणूजन्य रोगाचे आगमन महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पशुपालक, मांस विक्रेते व पशुसंवर्धन अधिकार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रोग गुजरातमधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणार्‍या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत या रोग संबंधी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या रोगामुळे बाधित जनावरांचे संक्रमण मनुष्यामध्ये होत असल्याने गुजरात-महाराष्ट्र सीमा भागातील पशुपालकांना या रोगाबाबत जास्त सतर्क व जागरूक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या रोगाचा प्रसार गुजरातमधील काही जिल्ह्यात आढळून आला असून काँगो, इराण, द. आफ्रिका, चीन, हंगेरी या देशात सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्याने पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

सीसीएचएफ हा रोग एका विशिष्ट प्रकारच्या गोचीडाद्वारे एका जनावरांमधून दुसर्‍या जनावरांना होतो. ऑस्ट्रीच, शहामृग या पक्षाद्वारे देखील या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व बाधित जनावरांचे मांस खाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये दिसून येतो. या रोगाची लागण झाल्यास वेळीच निदान व उपचार न झाल्यास 30% मनुष्यामध्ये मृत्यू होतो. या रोगावर हमखास व उपयुक्त असे उपचार नसल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ. प्रशांत कांबळे यांनी दिली.

रोगाची लक्षणे :-

  • या रोगाने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला डोके दुखणे, जास्त ताप येणे, सांधे दुखी, पोटदुखी, उलटी होणे.
  • डोळे लाल होणे, घश्यात तसेच तोंडाच्या वरच्या भागात फोडी येणे.
  • आजार बळावल्यास त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाकातून रक्त येणे.
  • मृत्यूचे प्रमाण 9 ते 30% असते.

प्रतिबंधक उपाय योजना :-

  • पालघर जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने या रोगाचा प्रसार सदर जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वेळीच सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे व या रोगाबाबत तसेच गोचीड निर्मूलनाबाबत योग्य ती काळजी घेऊन सदर आजाराबाबत पशुपालकांनी जागरूक व सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी सांगितले.
  • शेतकरी, पशुपालक,प शुवैद्यक यांनी गोठ्याची स्वच्छता राखणे, मुख पट्टी, हॅन्ड ग्लोव्हस, गमबूटचा वापर करणे.
  • सदर रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी जण माणसात याबाबत माहिती प्रसिद्ध करणे, गोचीड निर्मूलन कार्यक्रम राबविणे, जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील किटकांचे व गोचिडांचे संपूर्णतः उच्चाटन करणे, बाह्य कीटकांचा व गोचिडांचा नाश करणार्‍या किटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक.
  • गुजरात राज्यातून पालघर जिल्ह्यात रोज विविध जनावरांची वाहतूक होत असल्याने दोन राज्याच्या सीमेवर असणार्‍या पशुधन तपासणी नाक्यावर सर्व जनावरांची तपासणी करून आवश्यक त्या उपाय योजना राबविणे. बाधित जनावरे वेगळी काढून त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपचार करणे. गोचिडे हाताने काढणे, मारणे कटाक्षाने टाळावे.

सदर रोग पशूंचे कच्चे मांस खाल्याने देखील होऊ शकतो त्यामुळे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खावे. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोचीड निर्मूलनाचा कार्यक्रम प्राधान्याने घेण्याबाबत व सर्व ती आवश्यक खबरदारी घेण्याचे व पशुपालकांनी या आजाराबाबत जास्तीत जास्त जागरूक राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी सांगितले.


Saturday, September 26, 2020

रस्ता रोको आंदोलन, कायद्यांची होळी - किसान सभा

महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांत ५० हजार शेतकऱ्यांतर्फे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ 

मुंबई : आज २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यांत ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलने वा उग्र निदर्शने करून भाजपच्या केंद्र सरकारच्या तिन्ही शेतकरीविरोधी कायद्यांची होळी केली. या आंदोलनात अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआय यांच्या नेतृत्वाखाली महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहा महिन्यांपूर्वी कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात झालेले हे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

पालघर, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी रस्ता रोकोचे जोरदार आंदोलन झाले व या चार जिल्ह्यांतील आंदोलकांचीच संख्या ३५ हजारांहून अधिक होती. पालघर जिल्ह्यात चारोटी, ता. डहाणू, आणि बोईसर फाटा, ता. पालघर या दोन्ही ठिकाणी मुंबई - बडोदा- जयपूर - दिल्लीचा राष्ट्रीय महामार्ग १० हजार शेतकऱ्यांनी रोखून धरला. इतर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी राज्य महामार्ग रोखून धरण्यात आले. 

त्याशिवाय अनेक जिल्ह्यांत प्रभावी कृती झाल्या. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे, विदर्भात बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा व नागपूर, मराठवाड्यात नांदेड, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद व उस्मानाबाद, आणि उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार या जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत शेतकऱ्यांची जोरदार आंदोलने झाली. मुंबईच्या काही भागांत सीटू आणि डीवायएफआय या संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांचे कार्यकर्तेही या निदर्शनांत सहभागी झाले, असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

या आंदोलनांचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, सीटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, कोषाध्यक्ष उमेश देशमुख आणि राज्य पदाधिकारी बारक्या मांगात, रतन बुधर, रडका कलांगडा, सुनील मालुसरे, सावळीराम पवार, उदय नारकर, शंकर सिडाम, उद्धव पौळ, सिद्धप्पा कलशेट्टी, माणिक अवघडे, यशवंत झाडे इत्यादींनी केले. 

Tuesday, September 15, 2020

डहाणू व तलासरी: आज स. 11.39 वाजता व काल दु. 4.16 वाजता भूकंपाचे धक्के

दि. 15.09.2020): डहाणू व तलासरी तालुक्याला आज सकाळी 11.39 वाजता 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. काल (सोमवारी) देखील दुपारी 4.16 वाजता 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला होता. 11 सप्टेंबर रोजी भूकंपाचे सलग 6 धक्के बसल्यानंतर 2 दिवस शांततेत गेले होते. 11 सप्टेंबरच्या धक्क्यांमध्ये 3.5 व 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांचा समावेश होता.