Monday, December 7, 2020

बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी


 दि. 7 : राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये पालघर जिल्ह्यासह राज्यातील विविध खाजगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरणार आहेत.

अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग व व्यवसायांना नववी उत्तीर्ण पासून दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा तसेच बी. ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक युवक-युवतींनी दिनांक 13 डिसेंबर 2020 पर्यत पसंतीक्रम नोंदवुन या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

  • अशी करा ऑनलाईन नोंदणी :
    हा रोजगार मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणार्‍या उमेदवारांसाठीच आहे. पालघर जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in होमपेजवरील जॉब सीकर (गेल डशशज्ञरी) लॉगिनमधून युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्लिक करून प्रथम मुंबई विभाग व त्यानंतर पालघर जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी. आवश्यक पात्रतेनुसार ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम नोंदवून मेळाव्यात सहभागी होता येईल.

मुलाखतीबाबत कळविणार :
उमेदवारांना पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दुरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.

Saturday, December 5, 2020

COVID दरम्यान कलाकारांना कामाचा पर्याय म्हणून आयूश च्या वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम च्या प्रयोगा बद्दल लेख

माहितीसाठी: 
COVID दरम्यान कलाकारांना कामाचा पर्याय म्हणून आयूश च्या वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम च्या प्रयोगा बद्दल लेख 
कॅनडा येथील 'The Thuderbird' या विद्यार्थी संचलीत वृत्त पोर्टलवर प्रसारित 
करण्यात आला आहे... जोहार! https://thethunderbird.ca/2020/12/03/indigenous-artists-in-india-adapt-traditional-practices-and-attract-new-customers/

डिसेंबर 2020 मध्ये मालमत्तेचे खरेदीखत नोंदणी करा आणि मुद्रांक शुल्कात 3 टक्के सूट मिळवा!

ज्यांना मालमत्ता खरेदीचे व्यवहार करायचे आहेत, त्यांच्यासाठी डिसेंबर महिना बचतीची संधी देणारा आहे. महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये मालमत्तेचे खरेदी – विक्री व्यवहार करणाऱ्यांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 3% इतकी घसघशीत सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे पक्षकारांच्या मुद्रांकशुल्कासाठी येणाऱ्या खर्चात 50% बचत होणार आहे. या सवलीताचा अधिकाधिक लोकांना फायदा व्हावा यासाठी पालघर, बोईसर, डहाणू व वाडा यांसह वसई तालुक्यातील सर्व 6 नोंदणी कार्यालये डिसेंबर महिन्यातील दर शनिवारी खूली रहाणार असल्याची माहिती पालघरचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नितीन पिंपळे यांनी दिली आहे.

Thursday, November 26, 2020

दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य


मुंबई, दि. 23 :- ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत राज्य शासनामार्फत नवीन कार्यप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ही नियमावली 25 नोव्हेंबर 2020 पासून अंमलात येणार आहे.

 

देशांतर्गत हवाई प्रवास

दिल्लीच्या नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर), त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून हवाई मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांजवळ आरटीपीसीआर अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल विमानतळावरील अधिकाऱ्यांना दाखवावा लागेल.

 

आरटीपीसीआर चाचणीसाठी दिलेला नमुना महाराष्ट्रामध्ये हे विमान दाखल होण्याच्या बहात्तर तास अगोदर घेतलेला असावा.ज्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर  चाचणी अहवाल अटींची पूर्तता करणारा नसेल त्यांना त्याच विमानतळावर स्वखर्चाने आरटीपीसीआर  चाचणी करून घ्यावी लागेल. यासाठी विमानतळ प्रशासन प्रवाशांच्या चाचणीसाठी विमानतळावरच ही सुविधा उपलब्ध करून देतील. ही चाचणी करून घेतल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. अशा सर्व प्रवाशांच्या संपर्काची माहिती व पत्ता विमानतळ प्रशासन प्राप्त करेल जेणेकरून जर कोणी यात्रेकरू पॉझिटिव्ह असेल तर नियमाप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करून पुढील कारवाई करणे सोपे होईल. नियमानुसार सर्व पॉझिटिव्ह प्रवाशांवर उपचार करण्यात येईल. या कारवाईत स्थानिक महानगरपालिका आयुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील आणि सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे याची खबरदारी घेतील.

 

रेल्वेसंबंधी एसओपी

उपरोक्त राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या सर्व यात्रेकरूंनाही आपल्यासोबत आरटीपीसीआर  निगेटिव्ह अहवाल महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी सोबत ठेवावा लागेल. जर रेल्वे गाडी या राज्यांतून निघाली असेल किंवा तेथे थांबली असेल तरीही तेथील प्रवाशांना आरटी-पीसीआर  निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असेल. महाराष्ट्रात दाखल होण्याच्या 96 तास अगोदर कोविड-१९ चाचणीसाठी नमुना दिलेला असावा.ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल नसेल त्यांची कोविड-१९ लक्षणाची तपासणी आणि शरीराचे तापमान नोंदविले जाईल. यात्रेकरूंना कोविड-१९ ची लक्षणे नसतील तर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. कोविड-१९ लक्षणे असलेल्या प्रवाशांना वेगळे करून त्यांची एंटीजन टेस्ट घेतली जाईल. ही चाचणी जर निगेटिव्ह आली तर त्यांना घरी जाण्याची परवानगी असेल.जे प्रवासी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळतील किंवा चाचणी केलेले नसतील त्यांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) ला पाठविले जाईल आणि तेथील सर्व उपचारावर त्यांना स्वतः खर्च करावा लागेल. संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यासाठी नोडल अधिकारी असतील आणि वरील सगळे नियम काटेकोरपणे पाळले जातील याची खबरदारी घेतील.

 

रस्ता मार्गाने येणारे प्रवासी

सीमावर्ती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे दिल्ली एनसीआर त्याचप्रमाणे राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या चाचणीची आणि शारीरिक तपासणीची खात्री करण्याची व्यवस्था करतील. ज्या प्रवाशांना कोविड-१९ लक्षणे नसतील त्यांना दाखल होण्याची परवानगी असेल. जर एखाद्या प्रवाशामध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास त्यांना परत त्यांच्या घरी जाऊन उपचार करण्याची संधी दिली जाईल. अथवा त्यांना वेगळे करून एंटीजन टेस्ट घेतल्या जातील. जर ते निगेटिव्ह आले, तर त्यांना पुढे प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल. ज्या प्रवाशांनी कोविड-१९  चाचणी केलेली नसेल किंवा जे पॉझिटिव्ह असतील, त्यांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये दाखल करण्यात येईल आणि संपूर्ण उपचाराचा खर्च त्यांना स्वतःला करावा लागेल.

 

याशिवाय कोविड-19 प्रतिबंध करण्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेली नियमावली यापुढेही लागू राहणार आहे.

Wednesday, November 25, 2020

आदिवासी जमातींचे कौशल्य वाढविण्यास आणि प्रोत्साहन देण्यासाठी

Tribal Entrepreneurship Development Programme

या नावाची योजना भारत सरकारने सुरु केली आहे. सदर योजनेंतर्गत भारतीय आदिवासी जमातींचे कौशल्य वाढविण्यास आणि प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आदिवासी जमातींच्या समर्थनासाठी प्रयत्न सुरू केले गेले आहेत. 

सदर कार्यक्रम अंतर्गत आदिवासी कलाकारांना स्वावलंबन करणार्‍या घटकास सक्षम करणे आणि त्यासाठी येणारा अडथळे व अडचणी दूर करण्याचे लक्ष्य ठेवून आदिवासी उपयोजकांना आत्म-टिकाव सक्षम करणे आहे. त्याअनुषंगाने सदर योजनेत भाग घेण्याकरता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून Google form भरणे आवश्यक आहे.  
https://forms.gle/6JLw16Y1cViVZmbv8
 
- आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे


आपल्या संपर्कात कळवावे. जोहार! 
...................................................................
द्वारा प्रसारित: आयुश वारली चित्रकला क्लस्टर