Monday, February 22, 2021
भव्य रोजगार व स्वयंरोजगार मेळावा
Sunday, February 21, 2021
पालघरकरांनो सावधान; करोना नियमांचे पालन न केल्यास होणार दंडात्मक कारवाई
दि. 21 : मागील काही दिवसांपासुन राज्यभरासह पालघर जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असुन शासनाने घालून दिलेल्या करोना नियमांचे पालन न करणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पालघर जिल्हाधिकार्यांनी देखील नियमांचे पालन न करणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असुन आतापर्यंत 190 हून अधिक जणांवर जिल्ह्यातील विविध भागात कारवाई करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासुन पालघर जिल्ह्यातील दररोज करोना रुग्ण आढळून येण्याची संख्या एक अंकी असतानाच 19 फेबु्रवारी रोजी पालघर तालुक्यात 10, डहाणू तालुक्यात 1 व तलासरी तालुक्यात 1 असे 12 रुग्ण आढळून आले. तर त्यापुर्वी 18 फेबु्रवारी रोजी डहाणूत 11, पालघरमध्ये 3 व विक्रमगडमध्ये 1 असे 15 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या विचाराता घेता जिल्ह्यात सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन करोना नियमांचा भंग होणार्या सार्वजनिक ठिकाणांवर कारवाया करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत 66 सार्वजनिक ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुकानदार, रिक्षाचालकांसह विनामास्क असलेल्या 189 हून अधिक लोकांवरती कारवाया करुन 42 हजार 750 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, नागरीकांनी करोना नियमांचे पालन करावे आणि करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे.
Wednesday, February 17, 2021
Maharashtra Board Exam Date 2021 : दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा बदलल्या; शिक्षण मंडळाची घोषणा
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालये अनेक महिने बंद ठेवण्यात आली. मात्र याच महिन्यामध्ये राज्यातील काही शहरांमधील महाविद्यालये आणि शाळा सुरु करण्यात आल्या. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे परिक्षांचा काळ जवळ येऊन लागल्याने त्यासंदर्भातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
करोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता सालाबादप्रमाणे यंदा नियोजित महिन्यामध्ये परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक बदललं आहे. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान होणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही आजपासून म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२१ पासून हे नवीन वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठीही एप्रिल आणि मे महिन्यामधील लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले आहे. करोनासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतच परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.
दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र यंदा करोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे वर्षा गायकवाड यांनी जानेवारी महिन्यामध्ये स्पष्ट केलं होतं. या पूर्वी बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१दरम्यान घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. यामध्ये बदल करत आता नवीन वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षेचा कालावधी आठ दिवसांनी कमी करण्यात आला असून दहावीच्या परीक्षांचा कालावधी ११ दिवसांनी वाढवण्यात आलाय.
जिल्ह्यातील 30 ग्रामंपाचायतींना सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण
दि . 16 : राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणार्या एकुण 30 ग्रामपंचायतींना जिल्हा व तालुकास्तरिय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने गौरविण्यात आले.
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर वेवजी, बोर्डी, हिरवे, जांबुगाव व कुर्झे या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय तर अन्य 25 ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर सदर ग्रामपंचायतीना हे पुरस्कार देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना, कामडी म्हणाल्या की, पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायतींनी चांगले कार्य केले असून तालुका स्तरावरील पुरस्कार घेतलेल्या ग्रामपंचायतींनी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच इतर ग्राम पंचायतींनी पुरस्कार प्राप्त असे काम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये करावे. तर गाव सुंदर आणि स्मार्ट करण्यासाठी अनेक कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात राबवण्यात आल्या पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नसुन गावात सरपंचांचे प्रशिक्षण, योग्य कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त गाव असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असे मत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी तालुका व जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त विजेते हे कधीतरी महाराष्ट्र व देश पातळीवरचा पुरस्कार मिळवतील, असा विश्वास व्यक्त करतानाच शासनाची प्रत्येक योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
पशु संवर्धन व कृषी समिती सभापती सुशील चुरी, बांधकाम व वित्त समिती सभापती काशिनाथ चौधरी, समाजकल्याण समिती सभापती विष्णू कडव, वाडा पंचायत समिती सभापती योगेश गवा, वसई पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी व सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) टी. ओ. चव्हाण यांनी प्रास्ताविक सादर केले.