महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांत ५० हजार शेतकऱ्यांतर्फे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ
मुंबई : आज २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यांत ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलने वा उग्र निदर्शने करून भाजपच्या केंद्र सरकारच्या तिन्ही शेतकरीविरोधी कायद्यांची होळी केली. या आंदोलनात अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआय यांच्या नेतृत्वाखाली महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहा महिन्यांपूर्वी कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात झालेले हे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.
पालघर, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी रस्ता रोकोचे जोरदार आंदोलन झाले व या चार जिल्ह्यांतील आंदोलकांचीच संख्या ३५ हजारांहून अधिक होती. पालघर जिल्ह्यात चारोटी, ता. डहाणू, आणि बोईसर फाटा, ता. पालघर या दोन्ही ठिकाणी मुंबई - बडोदा- जयपूर - दिल्लीचा राष्ट्रीय महामार्ग १० हजार शेतकऱ्यांनी रोखून धरला. इतर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी राज्य महामार्ग रोखून धरण्यात आले.
त्याशिवाय अनेक जिल्ह्यांत प्रभावी कृती झाल्या. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे, विदर्भात बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा व नागपूर, मराठवाड्यात नांदेड, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद व उस्मानाबाद, आणि उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार या जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत शेतकऱ्यांची जोरदार आंदोलने झाली. मुंबईच्या काही भागांत सीटू आणि डीवायएफआय या संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांचे कार्यकर्तेही या निदर्शनांत सहभागी झाले, असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.
या आंदोलनांचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, सीटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, कोषाध्यक्ष उमेश देशमुख आणि राज्य पदाधिकारी बारक्या मांगात, रतन बुधर, रडका कलांगडा, सुनील मालुसरे, सावळीराम पवार, उदय नारकर, शंकर सिडाम, उद्धव पौळ, सिद्धप्पा कलशेट्टी, माणिक अवघडे, यशवंत झाडे इत्यादींनी केले.


No comments:
Post a Comment