Thursday, May 28, 2020
पिकांचे नुकसान करणाऱ्या टोळधाडी पासून शेतकरी बांधवानी सावध राहावे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
डहाणूत कोरोनाबाधित रुग्णांचे चाचणी होणार
पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधितांसाठी दिलासादायक बातमी हाती आली आहे. डहाणूतील उप जिल्हा रुग्णालयात ” कोव्हीड- 19 ” चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. कालपासून हे केन्द्र कार्यान्वीत झाल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी हिंगणे यांनी दिली आहे. सुरुवातीला येथे दररोज 20 चाचण्या केल्या जाणार आहेत. उप जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आधीच उभ्या राहिलेल्या मॉडर्न रुरल हेल्थ सेंटरच्या सुसज्ज इमारतीमध्ये हे केंद्र स्थापित करण्यात आले.
ह्यापूर्वी पालघर जिल्ह्यातून घशाचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवावे लागत होते. तपासणी अहवाल किमान 3 ते 4 दिवसांत प्राप्त होत असे. हा कालावधी कमी झाल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करणे सोईचे ठरणार आहे. तपासणी केंद्राची सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, आरसीएमआरचे संचालक डॉ. महाले ह्यांचे अभिनंदन केले जात आहे.
वेदान्ताचा डॉक्टर कोरोनाबाधित पॉझिटिव्ह
डहाणू तालुक्यातील वेदान्ता वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. हा डॉक्टर आयसीयू युनीटमध्ये कार्यरत असून वसतीगृहात निवास करीत होता. तो कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने तपासणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर डहाणू तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता 17 झाली आहे.
पालघर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे 25 बळी झाले असून त्यातील 22 मृत्यू वसई महानगर क्षेत्रातील असून 1 जण वसई ग्रामीण तालुक्यातील आहे. 2 मृत्यू पालघर तालुक्यातील आहेत. वसई तालुक्यात आतापर्यंत 633 कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत.
Wednesday, May 27, 2020
भारतीय ‘मित्रों’ची टीक-टॉकला तगडी टक्कर; लाखोंच्या संख्येत झाले डाऊनलोड
शॉर्ट व्हिडीओ अॅप टीक-टॉकचे रेटिंग काही दिवसांपुर्वी युजर्सने खराब रिव्ह्यू देऊन कमी केले होते. या अॅपवर बंदी घालण्याची देखील युजर्सने केली होती. याच पार्श्वभुमीवर आता मित्रों (Mitron) नावाचे एक भारतीय अॅप टिकटॉकला टक्कर देत आहे. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक वेळा हे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. टीक-टॉक सारखेच फीचर्स मिळणाऱ्या या अॅपला आयआयटी रुडकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
आयआयटी रुडकीचा विद्यार्थी शिवांक अग्रवालने तयार केले असून, हे अॅप गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री चार्टच्या टॉप-10 समावेश झाले आहे. पेटीएमचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक यांच्याद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हे अॅप दुसऱ्या स्थानावर दिसत आहे. या अॅपमध्ये टीक-टॉक व्यतिरिक्त दुसरे कोणतेही खास फीचर्स नाहीत. मात्र आपल्या नाव आणि ब्रँडिंगमुळे लोकप्रिय होत आहे.

Image Credited – Forbes
अॅप नवीन असून, यात अनेक बग्स आहेत. असे असले तरी याला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. जवळपास 4.7 रेटिंग्स असणाऱ्या या अॅपमध्ये लॉग इन करताना समस्या येत असल्याचे अनेक युजर्सनी म्हटले आहे. मात्र भारतीय अॅप असल्याने भरपूर सपोर्ट मिळत आहे. 8 एमबीच्या या अॅपला 11 एप्रिल 2020 ला रिलीज करण्यात आले होते. सध्या केवळ गुगल प्लेवरच हे अॅप उपलब्ध आहे.
ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा
मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सूचना
मुंबई, दि २६ : ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाच्या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणावर करुन येत्या शैक्षणिक वर्षातील शिक्षणास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आता आपण पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू. शिक्षणासाठी मोबाईल कंपन्यांचेही सहकार्य घेण्यात यावे. शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्डच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा पर्यायही आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा. टीव्ही चॅनल्सचा यासाठी उपयोग करून घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.
शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून यासंदर्भात लोकप्रतिनिधी व शिक्षण क्षेत्रातील सर्वांशी समन्वय राखावा, सर्वांची मते विचारात घ्यावीत. यानिमित्ताने ऑनलाईन नेटवर्कही बळकट करून घ्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
यावेळी शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, प्रधान सचिव सौरभ विजय यांनी माहिती देतांना सांगितले की, बालभारतीने पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा ॲपचा वापरही वाढला असून व्हायरस वीर पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. गुगल क्लासरूमचा तसेच रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओचा वापर करण्यात येणार आहे.शालेय पोषण आहार यासंदर्भात शाळांना स्वातंत्र्य देण्यात येत असून महाविद्यालये सुरू करण्याबाबतही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
डहाणू शहरात पॉझिटिव्ह पाहुणीच्या संपर्कातील सर्व जण निगेटिव्ह

Friday, May 22, 2020
आजपासून पालघर जिल्ह्यात रिक्षा व बस सेवा सुरु! दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत!
पालघर जिल्ह्याचा वसई विरार महानगर क्षेत्राचा समावेश रेड झोन मध्ये ठेऊन जिल्ह्याचे उर्वरित क्षेत्र नॉन रेड झोन जाहीर करण्यात आले आहे. आजपासून नॉन रेड झोन क्षेत्रात बस सेवा व रिक्षा सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. बस सेवा 50% प्रवासी क्षमतेवर चालेल तर रिक्षासेवा चालक अधिक 2 प्रवासी अशा क्षमतेने चालवली जाईल. बाजारपेठा व दुकाने मात्र आजपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरु राहतील. सायंकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यानची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. ह्या सर्व सवलती, प्रतिबंधीत क्षेत्रासाठी मात्र लागू असणार नाहीत.
Thursday, May 21, 2020
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सढळ हाताने मदत करावी-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
विक्रमगडची अडचण वाढवली; मुंबईतून कोरोना पॉझिटिव्ह महिला विक्रमगड मध्ये आली!
मूळची विक्रमगड येथील डॉक्टर असलेली महिला 2 दिवसांपूर्वी बोरीवली येथून माहेरी आली आणि विक्रमगड करांची अडचण वाढवली आहे. ही महिला कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यामुळे विक्रमगडकरांसाठी धोका उद्भवला आहे. विक्रमगडची बाजरपेठ संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
ह्या महिलेचे 6 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते व पतीपत्नी बोरीवली येथे रहात होते. तेथे ते होम क्वारन्टाईन होते व त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. 2 दिवसांपूर्वी हे दांपत्य विक्रमगड येथे आले व मुलीच्या आई वडीलांकडे राहिले. दरम्यान, महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य पथक त्यांच्या बोरीवली येथील घरी पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बोरीवली जिल्हाधिकारी यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, दांपत्याला ताब्यात घेऊन महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर पतीची रवानगी क्वारन्टाईन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. ह्या महिलेच्या निकट संपर्कात आलेल्यांना क्वारन्टाईन सेंटर मध्ये दाखल करुन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
डहाणू तालुक्यामध्ये 3 नवीन कोरोना पोझिटिव्ह रुग्ण
डहाणू तालुक्यात डहाणू, सारणी आणि वाणगांव कोमपाडा येथे 3 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. डहाणू येथे 18 वर्षीय पुरुष ओरिसा येथून स्थलांतरित झालेला आहे. सारणी येथील 20 वर्षीय पुरुष कोलकाता येथे प्रवास करुन आला होता. तर वाणगाव कोमपाडा येथील 35 वर्षीय स्त्री डहाणू येथे राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम विभागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. तीचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आला होता.
तलासरी 10 जणांचे स्वेब नमुने तपासणीसाठी
Wednesday, May 20, 2020
शासनाचा सुधारित आदेश- बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्यांना सरसकट इन्स्टीट्यूशनल कॉरन्टाईनची आवश्यकता नाही!
वापी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तलासरी नगरपंचायत हद्दीतील दुकाने बंद
Sunday, May 17, 2020
सरपंच व नगरसेवकांच्या समित्या : बाहेरुन आलेल्या लोकांवर देखरेख ठेवण्यास
कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून लॉक डाऊन 4 जाहीर होत असताना, बाहेर गावाहून आलेल्या होम क्वारन्टाईन व्यक्तींवर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात समित्या गठीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक हे प्रभागस्तरीय समितीचे अध्यक्ष असतील. एकाच प्रभागातील उर्वरित नगरसेवक समितीचा सह अध्यक्ष असेल आणि मुख्याधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील. नगराध्यक्ष सर्व समित्यांवर पर्यवेक्षण करतील. ग्रामपंचायत स्तरावर, सरपंच हे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कोतवाल, आशा कार्यकर्ते, शाळेचे मुख्याध्यापक हे समितीचे सदस्य आणि ग्रामसेवक हे सदस्य सचिव असतील.
ह्या समित्या बाहेरून आलेल्या व्यक्तीची नोंद करतील व तहसिलदार/गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करतील. अशा व्यक्तींना स्थानिक पातळीवर इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन करतील व त्यांची आरोग्य तपासणी केली जाते आहे किंवा नाही हे तपासतील. प्रतिबंधीत क्षेत्रातून कोणी व्यक्ती येणार नाही व प्रतिबंधीत क्षेत्रात कोणी जाणार नाही, याची दक्षता घेतील.
Saturday, May 16, 2020
पालघर जिल्ह्यात 346 कोरोना बाधीत 16 मृत्यू व 184 बरे झाले!
पालघर जिल्ह्यामध्ये 346 जण कोरोना +Ve निष्पन्न झाले असून त्यातील 184 जण पूर्णत: बरे झाले आहेत, तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 146 जणांवर उपचार चालू आहेत.
विरार वसई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना +Ve रुग्णांची संख्या आता 307 वर पोचली असून त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. वसई ग्रामीण क्षेत्रात 5 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या 21 असून त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यात 10 कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. वाडा तालुक्यात देखील 3 जणांना कोरोना बाधा झाली आहे.
Sunday, May 10, 2020
पालघर जिल्ह्यात कोरोनाचा 11 वा बळी
पालघर जिल्ह्यातील कोरोना +ve रुग्णांची एकूण संख्या आता 235 झाली असून वसई महानगर क्षेत्रातील एका कोरोनाबाधीत 75 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या आता 11 झाली आहे. ही व्यक्ती रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल होती. सध्या विविध रुग्णालयांमधून 100 रुग्ण उपचार घेत असून, 124 रुग्ण बरे झाले आहेत.
आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 235 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:–
विरार वसई महानगर क्षेत्र – 206 (त्यातील 9 मृत्यू)
वसई ग्रामीण क्षेत्र – 2 (1 मृत्यू)
पालघर तालुका – 18 (त्यातील 1 मृत्यू)
डहाणू तालुका – 9
Wednesday, May 6, 2020
यंदा पावसाळ्यातील २० दिवस महत्त्वाचे!
करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा मग्न असतानाच आता महिन्याभरावर पाऊस येऊन ठेपला आहे.
दिवस वेळ पाण्याची उंची
१) गुरुवार ४ जून सकाळी १०-५७ पाण्याची उंची ४.५६ मीटर
२) शुक्रवार ५ जून सकाळी ११-४५ पाण्याची उंची ४.७५ मीटर
३) शनिवार ६ जून दुपारी १२-३३ पाण्याची उंची ४.८२ मीटर
४) रविवार ७ जून दुपारी १-१९ पाण्याची उंची ४.७८ मीटर
५) सोमवार ८ जून दुपारी २-०४ पाण्याची उंची ४.६७ मीटर
६) मंगळवार ९ जून दुपारी २-४८ पाण्याची उंची ४.५० मीटर
७) मंगळवार २३ जून दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.५२ मीटर
८) बुधवार २४ जून दुपारी २-२५ पाण्याची उंची ४.५१ मीटर
९) शनिवार ४ जुलै सकाळी ११-३८ पाण्याची उंची ४.५७ मीटर
१०) रविवार ५ जुलै दुपारी १२-२३ पाण्याची उंची ४.६३ मीटर
११) सोमवार ६ जुलै दुपारी १-०६ पाण्याची उंची ४.६२ मीटर
१२) मंगळवार ७ जुलै दुपारी १-४६ पाण्याची उंची ४.५४ मीटर
१३) मंगळवार २१ जुलै दुपारी १२-४३ पाण्याची उंची ४.५४ मीटर
१४) बुधवार २२ जुलै दुपारी १-२२ पाण्याची उंची ४.६३ मीटर
१५) गुरुवार २३ जुलै दुपारी २-०३ पाण्याची उंची ४.६६ मीटर
१६) शुक्रवार २४ जुलै दुपारी २-४५ पाण्याची उंची ४.६१ मीटर
१८) गुरुवार २० ऑगस्ट दुपारी १२-५५ पाण्याची उंची ४.७३ मीटर
१९) शुक्रवार २१ ऑगस्ट दुपारी १-३३ पाण्याची उंची ४.७५ मीटर
२०) शनिवार २२ ऑगस्ट दुपारी २-१४ पाण्याची उंची ४.६७ मीटर
Tuesday, May 5, 2020
पालघर जिल्ह्यात लॉक डाऊनबाबत धोरण शिथील (वसई महानगर वगळून)
अखेर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या Lock Down च्या नव्या धोरणाशी सुसंगत असे नवे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी जाहीर केले आहेत. आता सोशल डिस्टन्सींग व जमावबंदीसह मास्क वापरण्याचे बंधन कायम ठेवून जिल्ह्यातील कोरोना संक्रमित क्षेत्र व वसई महापालिका क्षेत्राबाहेरील दुकाने सुरु करणे अनुज्ञेय असेल. जीवनावश्यक व अन्य दुकानांमध्ये भेदभाव होणार नसला तरी अटी व शर्तीस अधीन राहून दुकाने सुरु करता येणार आहेत. सायंकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांसाठी रहदारी पूर्णपणे बंद रहाणार आहे.
Monday, May 4, 2020
नोकरभरती नाही, सगळी कामं स्थगित; कोरोनामुळे सरकारचे कठोर आर्थिक निर्बंध
फक्त आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
या निर्बंधांमध्ये सर्व विभागाला कळविण्यात आलं की त्यांनी कुठलीही नवी नोकरभरती करू नये. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या प्रकल्पांची गरज नाही ते प्रकल्प रद्द करण्यास आणि जे पुढे ढकलता येणं शक्य आहे असे प्रकल्प पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आर्थिक स्थिती नीट ठेवण्यासाठी ही कडक पावलं उचलण्यात आली आहेत. प्रत्येक विभागाला फक्त 33 टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार
सध्याची सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश, नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सर्व कार्यक्रम, त्यावरील खर्च रद्द. आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची तुर्तास बदली होणार नाही असेही आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील यात कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
पालघर जिल्ह्यात 48 तासांत 3 +Ve वाढले व 12 बरे झाले
पालघर, दि. 4 मे: पालघर जिल्ह्यातील कोरोना +ve रुग्णांची एकूण संख्या 48 तासांत 3 ने वाढून 176 वर पोहोचली आहे. त्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 12 ने वाढली असून कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यात पालघर जिल्हा यशस्वी होताना दिसत आहे. नवे 3 +Ve हे वसई महानगर क्षेत्रातील आहेत.
आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 179 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:–
विरार वसई महानगर क्षेत्र – 152 (त्यातील 8 मृत्यू)
वसई ग्रामीण क्षेत्र – 2 (1 मृत्यू)
पालघर तालुका – 16 (त्यातील 1 मृत्यू)
डहाणू तालुका – 9
आतापर्यंत 3302 जणांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्यातील 179 +Ve व 2779 +Ve निघाले आहेत. 344 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
179 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (6 %)
2779 अहवाल कोरोना निगेटिव्ह (94 %)
• 1477 जण होम क्वारन्टाईन आहेत.
• 212 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
• 84 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
• 84 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
• 3302 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
• 2779 नमुने निगेटिव्ह.
• 344 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
• 179 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 84 रुग्ण बरे झाले आणि 10 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
सध्या 84 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 3
बोळींज हॉस्पिटल – 9
रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) – 24
सेव्हन हिल हॉस्पिटल – 4
टिमा (बोईसर) – 9
अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 10
कौल सिटी आयसोलेशन – 1
रिलायन्स (मुंबई) – 2
भक्ती वेदांत (मीरा रोड) – 1
नायर हॉस्पिटल (मुंबई) – 2
नवनीत हॉस्पिटल (दहिसर) – 1
फोर्टीस हॉस्पिटल (मुंबई) – 1
भाभा हॉस्पिटल – 1
केईएम – 1
सायन हॉस्पिटल – 5
बीएमसी हॉस्पिटल गोरेगांव – 7
हॉरीझॉन (ठाणे) – 1
रहेजा हॉस्पिटल – 1
पालघर ग्रामीण रुग्णालय – 1
पेट्रोल व डिझेल विक्रीवरील निर्बंध हटले
दि. 4 मे: पालघर जिल्हाधिकारी यांनी पेट्रोल व डिझेल विक्रीवरील निर्बंध आजपासून उठवले आहेत. दिनांक 8 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये अत्यावश्यक सेवांच्या पुरवठा करणाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांना पेट्रोल व डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. हे मनाई आदेश आजपासून मागे घेण्यात आलेले असून आता सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेलची विक्री खूली करण्यात आली आहे.
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींची मदत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द
मुंबई, दि. 4 : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून ‘दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19’साठी एक कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला.
महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यशासनाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या लढ्यासाठी मदत म्हणून ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19’ साठी 1 कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला. यावेळी आमदार राजेश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे उपस्थित होते.
‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’चे संचालक, अधिकारी-कर्मचारी, सभासद यांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.



