Thursday, April 2, 2020

आधीच कोरोनाची दहशत त्यात भूकंपाचे धक्के, पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला


कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत चाललं असताना पालघरमध्ये भूकंपाचं सत्र पुन्हा चालू झालं आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आणि परिसरात आजवर अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. बुधवारी रात्री पुन्हा पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यातील बहुतांश भाग सलग दोन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट घोंगावत असताना भूकंपाच्या धक्क्यांनी पालघरकरांचा पिच्छा अजूनही सोडलेला नाही. बुधवारी रात्री 11 वाजून 19 आणि 11 वाजून 39 मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले.

हे धक्के तलासरी, धुंदलवाडी, आंबोली, आशागड, कासा, बोर्डी, बोईसर या भागात जाणवले. त्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीपोटी भूकंप प्रवनक्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामासाठी बाहेर स्थलांतरित झाले होते. मात्र सध्या राज्यात कोरोनाचे मोठे संकट असल्याने या भागातील सर्व नागरिक पुन्हा आपल्या गावात परतलेले आहेत. त्यातच हे काही काळ शमलेले संकट पुन्हा डोकं वर काढायला लागल्यामुळे येथील नागरिकांच्या मनात ह्या दुहेरी संकटामुळे मोठी भीती निर्माण झाली आहे.


सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झालं असल्याने या भागाकडे कसे लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातत्याने एकापाठोपाठ होणाऱ्या भूकंपांनी नागरिकांच्या मनात भीतीचे काहूर उठवले आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या भूकंपाने अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत, तर काही भिंती दुभंगण्याच्या स्थितीत आहेत. अशा जमिनी हादरवून सोडणाऱ्या भूकंपाने डोक्यावरील छत आणि घर कोसळले तर कुठे जायचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भूकंपाने स्थानिक नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018
11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल
24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल,
1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल
4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल
7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल
10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल

2019
20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल
24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल
1 फेब्रुवारी - 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल
7 फेब्रुवारी - 3.3 रिश्टर स्केल
13 फेब्रुवारी - 3.1 रिश्टर स्केल
20 फेब्रुवारी - 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल
1 मार्च - 3.2, 4.3 रिश्टर स्केल
9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल
10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल
31 मार्च - 3.2 रिश्टर स्केल
2 एप्रिल - 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल
9 एप्रिल - 3.0 रिश्टर स्केल
15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल
12 मे - 2.6 रिश्टर स्केल
10 जुलै - 2.6 रिश्टर स्केल
20 जुलै - 3.5 रिश्टर स्केल
24 जुलै - 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल
25 जुलै - 4.8, 3.6 रिश्टर स्केल
31 जुलै - 3.00 रिश्टर स्केल
13 ऑगस्ट - 3.2 रिश्टर स्केल
21 ऑगस्ट - 2.5 रिश्टर स्केल
20 सप्टेंबर - 3.3 रिश्टर स्केल
21 सप्टेंबर - 3.2 रिश्टर स्केल
2 सप्टेंबर - 3.4 रिश्टर स्केल
24 सप्टेंबर - 2.8 रिश्टर स्केल
26 ऑक्टोंबर - 2.7 रिश्टर स्केल
18 नव्हेंबर - 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल
21 नव्हेंबर - 3.5 रिश्टर स्केल
आतापर्यंत भूकंपाचे एकूण 54 धक्के बसल्याची नोंद करण्यात आली आहे.

Wednesday, April 1, 2020

जिल्ह्यात 8 कोरोना पॉझिटीव्ह, 1 मृत्यू;विनाकारण रस्त्यावर फिरणारी 80 वाहने जप्त


पालघर जिल्ह्यात विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 24 तासांत 858 वरुन 964 वर पोचली आहे. काल पालघर तालुक्यात एक पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पालघर तालुक्यात विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 108 वरुन 199 झाली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटवर्ती व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने, तीच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पालघर जिल्ह्यातील पहिला मृत्यू पालघर तालुक्यात झाल्यानंतर, प्रशासनाने खंबीर पावले उचलली असून, स्थानिक, निवासी, अभ्यागत, वारंवार कामानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर नगरपरीषद, सफाळे व बोईसर ग्रामपंचायतींच्या हद्दीचा सतर्क रहाण्याच्या क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला तसेच परदेशातून वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर नगरपरीषद, सफाळे व बोईसर ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये आलेल्या सर्व व्यक्तींना कोणत्याही सार्वजनिक / खाजगी ठिकाणी, परिसरातील रस्ते, हमरस्ते, सार्वजनिक मार्ग या ठिकाणी प्रवेश करणे, फिरणे, उभे राहणे, ताटकळणे, भटकणे तसेच कोणत्याही रस्त्यावर, पारंपारीक व अपारंपारीक इंधनावर चालणाऱ्या वाहनावर बंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जाहीर केले आहे.
आज एका दिवसात पालघर जिल्हा पोलीस दलाकडून
अत्यावश्यक सेवेसाठी दिलेली वाहने सोडून, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 80 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म


check up website: www.covid19india.org
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. 'नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर' ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

महाकवच अॅप
या डिजिटल प्लॅटफॉर्मची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि दुसरे- क्वारंटाइन ट्रॅकिंग

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचे ट्रेसिंग. अशा व्यक्तीने स्मार्टफोन बाळगला असल्यास त्याच्याआधारे ती व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याचे ट्रेसिंग करणे या ॲपमुळे शक्य होणार आहे. शिवाय, अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती याचे ट्रेसिंगही महाकवच अॅपमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे. सध्या ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना पाठवून करावी लागते. यात वेळही खूप जातो. पण आता 'महाकवच'मुळे प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित दिशेने प्रयत्न करता येतील आणि तेही कमीत कमी वेळेत.

महाकवच प्लॅटफॉर्मचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे क्वारंटाइन ट्रॅकिंग जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा संशयित रुग्ण यांनी किमान 14 दिवस स्वतःचे विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणे अतिशय आवश्यक असते. पण, बऱ्याचदा लोक निष्काळजीपणा दाखवतात व नियमांचे उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत जातो.  पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच ॲप इनस्टॉल केले जाईल तेव्हा अशा व्यक्तींचे क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे जिओ फेन्सिंग व  सेल्फी अटेंडन्स होय. अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा ॲपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजेल. यानंतर योग्य ती कार्यवाही प्रशासनातर्फे होणार आहे. या ॲपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेल्फी अटेंडन्स. प्रशासनाकडून जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो ॲपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागेल.

 महाकवच ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते केवळ कोरोना लक्षणीत व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी आहे. फक्त अशाच व्यक्ती हे ॲप वापरू शकतात. इतर लोकांना मात्र हे ॲप वापरण्याची परवानगी नसेल

याचबरोबर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून 'सेल्फ असेसमेंट टूल'चीही निर्मिती करण्यात आली असून ते लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.

या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी - भारत सरकार, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी - महाराष्ट्र शासन, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक महापालिका, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस फाऊंडेशनचा उपक्रम), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन या संस्थांचा महत्त्वाचा सहभाग राहिला.

सध्या हा प्लॅटफॉर्म तयार झाला असून नाशिक प्रशासनात त्याचा वापर सुरू आहे. लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्रभरात लॉन्च करण्यात येईल. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय व्यवस्था, पोलीस आणि समाजातील अनेक मंडळी कोरोनाविरुद्धची ही लढाई लढत आहेत. आता या व्यापक लढ्याला या प्लॅटफॉर्ममुळे एक अत्यंत वेगळा असा डिजिटल प्रयत्नही जोडला जात आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यात याची महत्त्वाची भूमिका असेल.

लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप केले जाणार - अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जुन महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि. 19 मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्रशासनाकडून दि.30 मार्च 2020 रोजी एप्रिल ते जुन 2020 दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती 5 किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत  सूचना प्राप्त झाली आहे. 

तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदुळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणुक करणे जिकीरीचे होईल ही बाब शिधा वाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली तसेच केंद्रसरकारने 30 मार्च रोजी मोफत तांदुळ देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या-त्या महिन्यामध्ये, त्या महिन्याचे धान्य वितर‍ित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्रसरकारची  सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर,प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ त्या-त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कालच राज्यभरातील 400 व्हाटसअॅप ग्रुप च्या माध्यमातून सर्व रेशन धान्य दुकानदारांना याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. व सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे आज राज्यातील 2 लाखाहून अधिक शिधापत्रिका धारकांनी नियमित धान्य घेतले आहे. तसेच सर्व रेशन धान्य दुकानांमध्ये आवश्यक धान्य पुरवठा करण्यात येत असून नियमित धान्य खरेदीनंतर शिधापत्रिका धारकांना लवकरच मोफत तांदळाचे वाटप केले जाईल.

सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्यादराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे श्री.छगन भुजबळ यांनी सांगितले.

कोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

● सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार
● इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घेण्याचे आवाहन
  
मुंबई, दि. 1 :-  इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’ विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, या सर्वांचं उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. 

बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.