Saturday, April 11, 2020

वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे ; पालकमंत्री अस्लम शेख यांच्या निर्देशानुसार पालिकेची मार्गदर्शक तत्वे जारी




 मुंबई शहरातील खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना देण्याचे निर्देश पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते,त्यानुसार महापालिकेने खाजगी रुग्णालयासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांना आवश्यक पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शेख यांनी दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.

खासगी रुग्णालयासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.

1) रुग्णालयात काम करणाऱ्या व प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णांना हाताळणाऱ्या सर्व अधिकारी,कर्मचारी, कामगारांना पीपीई किट,एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर आवश्यक साधने उपलब्ध करुन द्यावीत.

2) रुग्णालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घेण्यात यावी.

3) रुग्णालयात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना त्यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करावे.

4) रुग्णालयांत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना कर्तव्यावर उपस्थित होण्याकर‍िता वाहतुकीची पुरेशी साधने उपलब्ध नसल्यास त्यांच्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करणे.

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या व रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी,परिचारिका, आरोग्य सेवक यांना संसर्ग होऊ नये व त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी वरील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे

Thursday, April 9, 2020

महाराष्ट्र – गुजरात सीमेवर खलाशांमध्ये पुन्हा तणाव



गुजरातच्या नारगोळ बंदरात उतरू न दिल्याने पालघर जिल्ह्यातील खलाशी संतप्त

गुजरातच्या वेरावळ भागत कार्यरत असणारे सुमारे दोन हजार खलाशी 4 एप्रिल रोजी आपल्या घरी परतण्यासाठी गुजरातमधील भागत आले होते. या प्रवाशांना प्रथम गुजरातमधील स्थानिकांनी उतरण्यास मज्जाव केला, नंतर 5 एप्रिल रोजी गुजरातमधील 1125 खलाशांना उतरवून घेतल्यानंतर महाराष्ट्रामधील खालाशाना उतरवण्यास गुजरात प्रशासकीय विभागाने नकार दिला. पुढे रात्रीच्या वेळी बंदरांमध्ये नांगरलेल्या बोटींचे दोर कापून तसेच गोळीबार करण्याची धमकावणी दिल्यानंतर पालघर जिल्ह्यातील 800 खलाशी असणाऱ्या बोटीला नाईलाजाने वेरावळ येथे परतावे लागले.

या खलाशांनी आपल्या नातेवाईकांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये वेरावळमध्ये आपली व्यवस्थित सोय होत नसल्याची तक्रार नोंदवली आहे. त्याचप्रमाणे नारगोळ बंदरापासून आपली गाव अवघे दोन-तीन किलोमीटरवर असताना आपल्याला तेथे उतरून न दिल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे गुजरात सरकारने राज्यातील खलाशांशी दुजाभवाने वागवले तसेच तलासरी व डहाणू तालुक्यातील आणि पालघर जिल्हा प्रशासनाने याबाबत आवश्यक पाठपुरावा केला नसल्याची खंत तलासरी तालुक्यातील मंडळी करीत आहेत. आगामी काळात गुजरातमधील नागरिकांना आपल्या भागातील बाजारपेठेमध्ये येण्यास मज्जाव करू अशा स्वरूपाचा इशारा वेरावळ येथे अडकून पडलेल्या खलाशांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील सीमा भागात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजपासून अत्यावश्यक सेवांना सूट, खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझेलची विक्री नाही!


दि. 09.04.2020: पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी आजपासून खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझेल विक्री करण्यास मनाई केली आहे. तसे आदेश पेट्रोलपंप चालकांना देण्यात आलेले आहेत. आज सकाळी 9 वाजतापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Lock Down च्या काळात, लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, यासाठी करण्यात आलेली ही उपाययोजना आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मात्र वगळण्यात आलेले आहे

Wednesday, April 8, 2020

तलासरी पोलिस ठाणे हद्दितील जनतेला आवाहन

तलासरी पोलिस ठाणे हद्दितील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की. राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या अनुषंघाने कोणीही व्यक्ती भाजीपाला, किराणा, मेडीकल औषध साठी मोटार सायकल तसेच इतर वाहनाचा वापर करणार नाही. जर कोणी असा व्यक्ती सदर कारणास्तव वाहनाचा वापर करताना मिळुन आल्यास सदरचे वाहन जप्त करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल 

                

उद्यापासून डहाणू शहरात वेळेचे निर्बंध; स. 7 ते दु. 12 या वेळेतच दुकाने उघडी


डहाणू शहरातील भाजी बाजारातील गर्दी कमी करुन सोशल डिस्टन्सींग राखण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या सर्वच दुकानदारांना सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. दुपारी 12 नंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी दुपारी 12 पर्यंत करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डहाणूतील रेल्वे स्थानक परिसरात नाशिक येथून येणाऱ्या भाजीपाल्याचा घाऊक बाजार भरतो. याच परिसरात किरकोळ भाजी विक्रेत्यांची देखील दुकाने आहेत. लोक भाजीपाला खरेदी करण्याच्या सबबीखाली या परिसरात येतात. तारपा चौक येथे पोलिसांतर्फे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही भाजी बाजारात सोशल डिस्टन्सींग पाळले जात नाही. भाजी बाजार सोमवार बाजार जेथे भरतो, त्या ठिकाणी भरवण्याचा निर्णय झाला होता. मात्र भाजीपाला विक्रेते तयार झाले नाहीत. अखेर आज अचानक डहाणू नगरपालिकेतर्फे रेल्वे स्थानक परिसरातील दुकाने 12 वाजेनंतर बंद करण्यात आली. इतर भागातील दुकाने खुली आणि रेल्वे स्थानक परिसरातील दुकाने बंद, अशा धोरणातून व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. अखेर डहाणू शहरातील सर्वच जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर लोकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.