Wednesday, August 5, 2020
पालघर जिल्ह्यातील २८१ बोटींना समुद्रात मुसळधार पावसाचा तडाखा
खडतर प्रवास सुरूच... स्थापनेच्या सहाव्या वर्धापनदिनीही पालघर जिल्ह्याच्या अनेक समस्या कायम
करोना संक्रमणाचे सावट असताना जिल्ह्य़ात या आजाराशी मुकाबला करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. प्रशासनामधील विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव हे विकासाची गती मर्यादित ठेवण्यास कारणीभूत ठरत असून विविध योजना अंतर्गत दीडशे कोटींहून अधिक निधी शासनाकडे परत गेला आहे. राजकीय नेतृत्वाचे आपल्या क्षेत्रापुरती दूरदृष्टी, लक्ष व पाठपुरावा असल्याने जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास करण्यासाठी दृष्टी व नेतृत्वाचा अभाव प्रकर्षांने जाणवत आहे.
आरोग्यासोबतच शिक्षण, पाणी, रोजगारावर अधिक भर देणार
पालकमंत्री दादासाहेब भुसे यांचे प्रतिपादन
पालघर : पालघर जिल्ह्य़ात करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा प्रश्न तर उभा असताना त्या बरोबरीने जिल्ह्य़ातील शैक्षणिक सुविधा, पाणीटंचाई, रोजगार निर्मिती व इतर अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. करोनाविरुद्ध लढण्यासोबत जिल्ह्य़ातील इतर समस्यादेखील मार्गी लावायच्या आहेत, असे प्रतिपादन पालघर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.
पालघर जिल्ह्य़ाच्या सहाव्या वर्धापन व महसूल दिनानिमित्त जिल्ह्य़ाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्फत दूर चित्रसंवाद (व्हिडीओ कॉन्फरन्स) चे आयोजन केले होते. पालघर जिल्ह्य़ात चांगला पाऊस पडला नसल्याने भाताची लागवड थांबली आहे, भात पिकांसह जव्हार भागात वरी व नाचणी ही पिके धोक्यात येऊन शेतकरी संकटात येऊ शकतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्य़ात सेमी इंग्रजी शाळा सुरू झालेल्या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी यांनी जि.प.शाळा १० वी पर्यंत करण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. कृषी किंवा महसूल विभागामार्फत जागा उपलब्ध करून महाराष्ट्र व्यापी रोपवाटिका मॉल उभारून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची रोपे तेथून उपलब्ध होतील असा मानस या वेळी पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला.
तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार देतात अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या वेळी त्यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्य़ातील कोविडच्या सद्य:स्थिती चा आढावा या बैठकीत सादर केला. सिडकोचे मुख्य अभियंता यांनी सिडकोअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय इमारतींचा आढावा सादर केला.
प्रश्न कागदावरच
गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तींना या जिल्ह्य़ाला सामोरे जावे लागले असताना भरडलेल्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्यास प्रशासनाच्या मर्यादा दिसून आल्या आहेत. वनपट्टय़ांचे वितरण अंतिम टप्प्यात असल्याचे गेल्या वर्षभरापासून सांगण्यात येत असले तरी लाभार्थींना त्यांना मिळालेल्या क्षेत्रांमध्ये लागवड करण्यास अडचणी येत आहेत. मच्छीमारांच्या समस्या, तरुणांसाठी रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार, कौशल्य विकास इत्यादी प्रश्न कागदावरच आणि केवळ चर्चेत आहेत.
Monday, August 3, 2020
डहाणू शहरात एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू व 4 ऑगस्ट पासून 10 दिवसांचे कडक लॉक डाऊन
डहाणू शहरात आज (3 ऑगस्ट) एकाच दिवसांत 3 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची दुख:द बातमी हाती आली आहे. डहाणूचे माजी नगराध्यक्ष शशिकांत बारी (65), भास्करभाई अमृतलाल मेहता (73) व हेमंत हसमुखलाल बाफना (66) यांचे कोरोना बाधेमुळे निधन झाले आहे. तत्पूर्वी 1 ऑगस्ट रोजी कुमुदबेन मोदी (84) यांचे निधन झाले होते. सोहन कर्णावट (70) व दत्तू धोडी (62) यांचे जुलै महिन्यात निधन झाले होते.
डहाणू शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज सरासरी 15 जणांची भर पडत आहे. 2 जुलै पर्यंत कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 222 वर पोहोचला असून प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 28 झाली आहे. 980 जणांना होम क्वारन्टाईन करण्यात आले आहे. 103 कोरोनाबाधीत पूर्णपणे बरे झाले असून 119 जणांवर उपचार चालू आहेत. त्यातील 32 लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना पॉझिटीव्हना स्वतःच्या घरी क्वारन्टाईन करुन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गातून मृतांची संख्या आता 6 झाली आहे.
उर्वरीत डहाणू तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 381 वर पोचला असून त्यातील 291 जण पूर्णपणे बरे झाले आहेत व 90 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 3 मृत्यू झाले आहेत. या आकडेवारीच्या तुलनेत डहाणू शहर तालुक्यातील मोठा हॉटस्पॉट ठरला आहे.
मुख्याधिकारी विरूध्द नगराध्यक्ष वादात अडकलेले लॉकडाऊन 4 ऑगस्ट पासून!
डहाणू शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 पेक्षा कमी व मृतांची संख्या 0 असताना एका दिवसांत 7 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाल्यानंतर डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी 14 जुलै रोजी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे 7 दिवसांच्या लॉक डाऊनचा प्रस्ताव ठेवला होता. 16 ते 23 जुलै दरम्यान लॉक डाऊनला तत्वत: मान्यता मिळाली होती. परंतु नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी लॉक डाऊनला विरोध केला होता असे समजते. राजपूत यांनी मुख्याधिकारी पिंपळेंवर कुरघोडी करण्याच्या भुमीकेतून विरोध केल्याचे मानले जाते.
त्यानंतर कोरोनाबाधीतांचा आकडा झपाट्याने वाढत गेला. अखेर भाजपचेच आरोग्य सभापती भाविक सोरठी (21 जुलै रोजी अर्ज) यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (विरोधी पक्ष) गटनेत्या किर्ती मेहता यांनी (22 जुलै रोजी अर्ज) लॉकडाऊनची मागणी केली. लोकांकडूनच लॉक डाऊनची मागणी जोर धरु लागली.
नागरिकांची भावना लक्षात घेता 30 जुलै रोजी प्रभारी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजीत नायर हे तातडीने डहाणूला आले व लॉक डाऊनवर शिक्का मारुन गेले. बकरी ईद व रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन 4 ऑगस्टपासून होत आहे.
लॉक डाऊनचा निर्णय घेण्यास झालेल्या विलंब कालावधीत कोरोनाबाधीतांचा आकडा चौपटीपेक्षा जास्तीने वाढून तो 222 झाला आहे व 6 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉक डाऊनवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मात्र नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी मागणी केल्यामुळे लॉक डाऊन होणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर फिरु लागल्या आहेत. तथापि अधिकृत सुत्रांकडून त्यास दुजोरा मिळालेला नाही किंवा तसे पत्र रेकॉर्डला आढळून येत नाही. लॉक डाऊनवरुन आता राजकारण व श्रेयवाद सुरु झाला आहे.
- असे असेल लॉक डाऊन
4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत डहाणू शहरातील सर्व दुकाने, आस्थापना, व्यवसाय व कारखाने बंद ठेवले जाणार आहेत. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेस दुधविक्रीस मात्र परवानगी असेल. शहरातील शासकीय कार्यालये, दवाखाने व रुग्णालये, बँका व औषधांची दुकाने नियमित वेळेत चालू राहतील.
Sunday, August 2, 2020
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ८ अ‘ सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन शुभारंभ केल्यानंतर सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
श्री. थोरात यावेळी म्हणाले, शासकीय कामात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणूनच या विभागाला प्रशासनाचा कणा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले असून यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील असा विश्वास आहे. गेला ४ महिन्यापेक्षा अधिकचा काळ आपण सर्व कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करीत आहोत, या काळात राज्यातील महसूल यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती याचा मला अभिमान वाटतो.
सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल ७/१२‘ घेतला आहे त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल ८ अ‘ ला सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असेही आवाहन श्री. थोरात यांनी केले.