Monday, August 31, 2020

पालघर जिल्ह्यात 14 दिवसांत 86 मृत्यू

पालघर जिल्ह्यात मागील 14 दिवसांत कोरोनामुळे तब्बल 86 मृत्यू झाले असून त्यातील 60 मृत्यू एकट्या वसई (वसई विरार महानगरपालिका क्षेत्र 46 + वसई ग्रामीण क्षेत्र 14) तालुक्यात झाले आहेत. त्या खालोखाल पालघर तालुक्यात 18 व डहाणू तालुक्यात 6 मृत्यू झाले आहेत. वाडा तालुक्यात 2 व विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात प्रत्येकी 1 मृत्यू वाढला आहे. जव्हार व मोखाडा तालुक्यात मृत्यू वाढलेले नाहीत.

जिल्ह्यात आतापर्यंत 23 हजार 879 जणांना कोरोना संसर्ग झाला असून त्यातील 20 हजार 213 (84.65%) जण पूर्णत: बरे झाले आहेत. 3 हजार 181 रुग्णांवर उपचार चालू असून 485 (2%) जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूचा दर: वसई तालुक्याचा मृत्यूदर सर्वाधिक ठरला आहे. येथे निष्पन्न झालेल्या 17 हजार 119 जणांपैकी 380 (2.22%) जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यात निष्पन्न झालेल्या 4 हजार 171 रुग्णांपैकी 69 (1.65%) जणांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यात निष्पन्न झालेल्या 1070 जणांपैकी 21 (1.96%) जणांचा मृत्यू झाला आहे. वाडा तालुक्यात निष्पन्न झालेल्या 759 रुग्णांपैकी 6 (0.79%) जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य तालुक्यांचा मृत्यू दर पुढीलप्रमाणे आहे. विक्रमगड 5/250 (2%); जव्हार 2/236 (0.85%); तलासरी 2/165 (1.21%); मोखाडा तालुका 0/109 (0%)

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 36 हजार 393 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 23 हजार 879 जणांचे (17.51%) कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून 1 हजार 195 जणांचे अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे.

कोरोना संसर्ग झालेल्यां 23 हजार 879 जणांपैकी 17 हजार 119 रुग्ण (71.69%) वसई तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल 4 हजार 171 (17.47%) रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. डहाणू तालुक्यात 1070 (4.48%) रुग्ण तर वाडा तालुक्यात 759 (3.18%) रुग्ण निष्पन्न झाले आहेत. विक्रमगड 250, जव्हार 236, तलासरी 165 व मोखाडा 109 अशी उर्वरीत 4 तालुक्यांची एकूण रुग्णसंख्या 760 (3.18%) इतकी आहे.

Sunday, August 30, 2020

3 गुण नक्की पहा - फक्त कमी बोलणाऱ्या लोकांमध्येच असतात

मित्रांनो तुम्ही जर खूप कमी बोलत असाल, जास्त बोलायला तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्यामध्ये खूप साऱ्या विशेषता दडल्या आहेत. त्या आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत. पहिली विशेषता, जे लोकं कमी बोलतात ते समोरच्या व्यक्तीला खुप चांगल्या पद्धतीने ओळखून घेतात, चांगल्या पद्धतीने समजून घेतात, समोरच्या व्यक्तीचे इंटेनश कसे आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे फक्त ते त्याच्या बोलण्यावरून आणि हवभावावरून ओळखून घेतात.

एक साधी सरळ आणि सोप्पी गोष्ट आहे, जर तुम्ही कमी बोलणार तेंव्हाच तर तुम्ही समोरच्याच जास्त ऐकणार, तेंव्हाच तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला चांगलं समजू शकणार. समजा तुम्ही तुमच्या मित्र परिवरामध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये बसले आहात आणि फक्त बोलतच आहात, कदाचित यावरून तुमच्याजवळ खूप ज्ञान आहे, तुम्ही खूप हुशार आहात, तुमचं बोलणं खूप फनी असतं असं दिसेल पण यात तुमचा तोटाच आहे.

कारण जेंव्हा तुम्ही शांत बसून कमी बोलून लोकांना ऐकायला शिकाल तेंव्हाच तर तुम्ही लोकांना जास्त समजू शकाल. आता हे पूर्णपणे तुमच्यावर आहे, तुम्हाला आयुष्यभर लोकांना समजवायचं आहे की लोकांना समजून घ्यायचं आहे. आणि तुमचा फायदा लोकांना समजून घेण्यातच आहे. कारण आपण जेंव्हा लोकांना चांगल्या पद्धतीने समजून घेतो तेंव्हाच आपल्याला चांगल्या आणि वाईट लोकांमधला फरक समजतो, तेंव्हाच आपल्याला आपले कोण आणि परके कोण यामधला फरक समजतो.

आता बघूया दुसरी विशेषता, जे लोकं कमी बोलतात ते खूप चांगला आणि योग्य सल्ला देतात. सोप्पी गोष्ट आहे, जर तुम्ही कमी बोलाल तेंव्हाच तुम्ही समोरच्या व्यक्तीचा प्रॉब्लेम स्पष्टपणे समजू शकाल. आणि तेंव्हाच तुम्ही समोरच्याला योग्य तो सल्ला देऊ शकाल. काहीजण विचार करतील की, हे लोकं पहिलेच दुःखी असतात आपल्याला काय सल्ला देतील? लोकं कमी बोलतात म्हणजे ते दुःखी आहेत याचा काही संबंध नसतो. जसं काहीजणांना जास्त बोलणं आवडतं तसं या लोकांना कमी बोलणं आवडतं.

तुम्ही फक्त एकदा त्यांच्याजवळ जाऊन तर बघा, त्यांच्याशी बोलून तर बघा, त्यांचा सल्ला घेऊन तर बघा, जर आयुष्यात तुम्हाला कोणाशी घट्ट मैत्री करायची असेल, प्रेम करायचं असेल तर या लोकांपेक्षा चांगला व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. वर वर बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की हे लोक किती कमी बोलतात, किती बोअर असतात पण जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार कराल ना तर हेच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम समजून त्यांना दूर करतील. तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकतील. आणि असही प्रत्येक व्यक्तीला आपली बडबड ऐकणारा कोणीतरी असावा असं वाटत असतं. तर या कमी बोलणाऱ्या आणि फक्त ऐकणाऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला व्यक्ती तुम्हाला कोण मिळेल तुम्हीच सांगा.

शेवटचा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कमी बोलणाऱ्या लोकांवर लोकांच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. लोक अश्या लोकांची खूप चिंता करतात की हा काही बोलत नाही. लोकांमध्ये मिसळत नाही. असाच जर स्वभाव राहिला तर हा व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकणार नाही. एवढं सगळं ऐकूनही ते शांत राहतात, मनातल्या मनात हसतात कारण त्यांना माहीत असतं की त्यांचा स्वभाव हाच त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. त्यांचा स्वभावच त्यांना आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार आहे. आणि जर तुम्हीही अशा लोकांची चिंता करत असाल तर काहीच गरज नाही चिंता करण्याची. आणि ते व्यक्ती जर तुम्हीच असाल तर अभिनंदन खूप विशेषता आहेत तुमच्यामध्ये. मित्रांनो लेख आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि शेअर करा.

स्विफ्ट, डिझायर, वॅगनआर मिळवा फक्त दोन लाखांत; मारूती सुझुकी कंपनीने दिला स्वस्त पर्याय

मारुतीमध्ये जर तुम्ही बघितले तर तुम्हाला एक से बढकर एक गाड्या पाहायला मिळतील. पण या सगळ्या कारमधील फक्त काहीच कार आपल्या बजेटमध्ये बसतात. मध्यमवर्गीय माणसाला या कार घेणे परवडत नाही. 

पण जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये स्विफ्ट किंवा वॅगनआर घ्यायची असेल तर तुम्हाला मोठी संधी आहे. वास्तविक पाहता मारुतीकडे truevalue नावाचा सेकंड हॅन्ड गाड्यांचा प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्हाला जुन्या मोटारी चांगल्या स्थितीत असलेल्या फार कमी किमतीत मिळत आहे.

 या प्लॅटफॉर्मवर सध्या तीन कार्सची विक्री सर्वात जास्त आहे. यात स्विफ्ट डिझायरझ, स्विफ्ट, वॅगनआरचा समावेश आहे. या गाड्या तुम्हाला नवीन मारुती अल्टोपेक्षाही कमी किमतीत मिळतील.

मारुती डिझायर कार ही मारुतीची सर्वात शानदार आणि सर्वाधिक विक्री होणारी गाडी आहे. truevalue वर मिळणारे हे मॉडेल १.२४ लाख किमी चाललेले आहे. जे तुम्हाला ३.१५ लाख रुपयांपर्यंत मिळून जाईल. नवीन गाडीची किंमत ८.८१ लाख रुपयांपासून सुरू आहे.

दुसरी गाडी म्हणजे वॅगनआर. या गाडीची पहिली आवृत्ती lxi वृत्तीसाठी ठेवण्यात आली आहे. जरी मॉडेल २०१२ चे असले तरी फक्त ६६ हजार किमी चालले आहे. कार चांगल्या कंडिशनमध्ये आहे. कारची किंमत २.२५ लाख रुपये आहे. तसेच नवीन गाडीची किंमत ४.४५ लाख ते ५.९४ लाख आहे. ही कार प्रति लिटर ३२ किमी एव्हरेज देते व इंजिन ११९७ सीसी आहे.

विक्रीसाठी उपलब्ध असलेली तिसरी कार म्हणजे स्विफ्ट. truevalue वर स्विफ्टचे २०११ चे मॉडेल आहे. तुम्हाला ही गाडी १.९४ लाख रुपयांना मिळून जाईल. ही कार फक्त ५५ हजार किमी चाललेली आहे. ही कार थर्ड हॅन्ड आहे. नवीन गाडीची किंमत ५.१९ लाख ते ८.०२ लाख इतकी आहे. या कारचेही ११९७ सीसी इंजिन आहे.

पेपरवर्क ची काहीही काळजी करू नका कारण truevalue वर खूप सोपे पेपरवर्क आहे. जर तुम्ही सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर एकदा नक्की www.marutisuzukitruevalue.com या संकेतस्थळावर भेट द्या.

जेथे आपल्याला आपल्या आवडीची कार अगदी कमी किंमतीत जास्त पेपरवर्क न करता भेटून जाईल. truevalue चे शोरूमसुद्धा आहेत. जर तुमच्या जवळच्या भागात truevalue चे शोरूम असले तर भेटू न पाहावे.

Saturday, August 29, 2020

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच : सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्ष वगळता परीक्षा रद्द करण्यात आल्या. तर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशासह अन्य काही राज्यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचे देखील जाहीर केले होते. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग(UGC) ने या राज्यांच्या विसंगत नियमावली जाहीर केली. आता, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचे समर्थन केले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत साथीच्या आजाराच्या दृष्टीने राज्यं परीक्षा पुढे ढकलू शकतात तसेच युजीसीच्या सोबत चर्चा करून तारीख ठरवू शकतात असा निकाल दिला आहे.

UGCने जाहीर केलेल्या नियमानुसार ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्रासह देशातील वाढती रुग्ण संख्या बघता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून या परीक्षा घेणे शक्य नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती.

राज्याचे मंत्री व युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात UGC च्या या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, यासह देशातील अन्य १३ राज्यांनी परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. मागील सुनावणीमध्ये राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला असून देशासह वाढत्या रुग्णसंख्येची सद्यस्थिती व धोका यादरम्यान मांडण्यात आला होता.

अखेर, आज सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांबाबत निर्णय जाहीर केला असून परीक्षा रद्द करता येणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. परीक्षा घेतल्याशिवाय या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. युजीसीने ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले होता, आता परीक्षा कधी घ्यायच्या हे निश्चित करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

Friday, August 28, 2020

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ पदासाठी २ सप्टेंबरपासून मूळ कागदपत्रे तपासणी

उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणार

  • महानिर्मितीच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी तपशीलवार माहिती

  • उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेल आणि एसएमएसद्वारे माहिती

नागपूर, दि. २७ : महानिर्मिती सरळसेवा जाहिरात क्र.०४/२०१९ अंतर्गत तंत्रज्ञ-३ या पदाच्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे रिक्त पदांची उपलब्ध संख्या, समांतर आणि सामाजिक आरक्षण विचारात घेवून कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून निवड झालेल्या उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे.

 

सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा विचार करता, महानिर्मितीच्या मुंबई, पोफळी, पुणे, भुसावळ, चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी, नाशिक, पारस आणि परळी वीज केंद्राच्या संबंधित कार्यालयात २ सप्टेंबर २०२० पासून ह्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे. उमेदवारांनी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाऊन आपली कागदपत्रे तपासणी नेमकी कोणत्या कार्यालयात, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळात होणार आहे याची खातरजमा करून घ्यावी. महानिर्मितीकडून उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आय.डी.वर तसेच एस.एम.एस.द्वारे ह्याबाबतची सूचना देखील  देण्यात आली आहे.  तंत्रज्ञ-३ पदाच्या सुमारे ७१६ उमेदवारांची कोविड-१९ नियमांचे पालन करून कागदपत्रे तपासणी करण्यात यावी असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश आहेत.

 

कोविड काळात सर्वत्र आर्थिक संकट,आरोग्य समस्या, बेरोजगारीची समस्या असतांना महानिर्मिती कंपनी या माध्यमातून ७१६ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देत आहे ही निश्चितच अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बाब असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

 

कागदपत्रे तपासणीकरिता उपस्थित राहताना उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भरलेला अर्ज, त्यांची मूळ कागदपत्रे तसेच कागदपत्रांचा स्वसाक्षांकित (Self Attested) केलेला एक छायांकित संच (One Zerox copy set) कागदपत्रे पडताळणी अनुषंगाने जमा करणेकरिता स्वत:जवळ बाळगावा. तसेच आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे घेऊनच उमेदवाराने कागदपत्रे तपासणी करण्याकरिता त्यांच्या नावासमोर नमूद कार्यालयात, नेमून दिलेल्या दिवशी व वेळेवर उपस्थित रहावे. सोबत शारीरिक तथा वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे एम.बी.बी.एस. डॉक्टरकडून प्रमाणित केल्याचे मूळ फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.  कागदपत्रे जमा केल्यानंतर उमेदवारास संबंधित कार्यालयामार्फत पोच देण्यात येईल. नमूद दिनांक व वेळेत कागदपत्रे जमा करण्याकरीता उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही परिस्थितीत पुन्हा दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. उमेदवाराने अर्जात नमूद केलेली कागदपत्रे सादर न केल्यास, उमेदवाराची निवड ताबडतोब रद्द करण्यात येईल.

 

तंत्रज्ञ-३ या पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीअंती पात्र/अपात्र उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या www.mahagenco.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे महानिर्मितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.