Saturday, January 2, 2021

ग्रामपंचायत निवडणूक कोणाला लढवता येणार नाही

पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री आदी मान्यवरांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची ई-शपथ

मुंबई, दि. १ : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहीजे. ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा व त्यातून याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘माझी वसुंधरा ई-शपथ (ई-प्लेज)’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाईन कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी या उपक्रमात सहभागी होत राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटीबद्ध राहीन, अशी ई-शपथ घेतली.

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्यासह राज्याच्या विविध भागातून मंत्री, राज्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, नव्या वर्षाची सुरुवात कशी करावी याची एक नवीन वाट पर्यावरणाच्या रक्षणासाठी शपथ घेऊन या कार्यक्रमातून दिली गेली आहे. या अभियानातून फक्त देशालाच नव्हे तर जगालाही पर्यावरण संवर्धनाची एक नवीन दिशा मिळेल. कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या. लॉकडाऊनच्या काळात सर्वच ठिकाणी प्रदुषणामध्ये मोठी घट झाली होती. आपण विकास करताना झाडांची कत्तल करतो आणि तोच विकास झाल्यानंतर रस्त्यांवर ऑक्सीजन मिळविण्यासाठी यंत्राचा वापर करतो. विकासातील हा असमतोल दूर करुन पर्यावरणपुरक अशा शाश्वत विकासाची कास आपल्याला धरावी लागेल. यासाठी राज्यात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाला संपूर्ण पाठबळ देऊ, असे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

दोन इमारतींच्या मधून उगवणारा सूर्य’

पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाबद्दल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी काही उदाहरणे दिली. ते म्हणाले की, पुर्वी आम्ही चित्रकला स्पर्धा घेत असू, तेंव्हा उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढत असताना अनेक मुले दोन डोंगरांमधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढत असत. पण आता मुले हेच चित्र दोन इमारतींच्या मधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढतात. ही परिस्थिती धोकादायक असून नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण या सर्वांची भावी पिढीसाठी जपणूक करण्याची आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे, असे श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंचतत्वांना केंद्रस्थानी ठेवून पर्यावरणाच्या जतन आणि  संवर्धनासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने मोठा पुढाकार घेतला आहे. माझी वसुंधरा अभियानातून याला निश्चितच चालना मिळेल. राज्यात यापुर्वी यशस्वी झालेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान याप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानालाही लोकचळवळीचे स्वरुप द्यावे, त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही श्री.पवार त्यांनी यावेळी दिली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, वातावरणातील विविध बदलांना सामोरे जात त्यावर मात करुन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानातून मोठी चालना मिळेल. वातावरणातील बदल हे मानवतेसमोरील मोठे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी पर्यावरण विभागाने सुरु केलेल्या ई-शपथ उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. सर्वांनी या नव्या वर्षात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने किमान एक तरी संकल्प करुन त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्री.थोरात यांनी केले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, वातावरणातील बदलांमुळे विविध वादळे, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशी विविध संकटे येत आहेत. याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. राज्यात मागील वर्षभरात अशा विविध आपत्तीग्रस्तांना सुमारे साडेतेरा हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. पण अशी संकटे रोखण्यासाठी आता आपल्याला व्यापक प्रयत्न करावे लागतील. यासाठीच विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधत पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचा ध्यास राज्याने घेतला आहे.  आरेची जमीन संरक्षीत करणे, १० संरक्षीत वनांची घोषणा, हजारो एकर क्षेत्राचे कांदळवन जाहीर करणे असे विविध निर्णय घेतले जात आहेत. समृद्धी महामार्गाचा पर्यावरणपूरक विकास करण्याला चालना देण्यात येत आहे. आता या चळवळीत सर्वांनी सहभागी होत ई-शपथेच्या माध्यमातून योगदान द्यावे आणि पर्यावरण रक्षणाचा किमान एक संकल्प करुन तो कायम आचरणात आणावा, असे आवाहन श्री.ठाकरे यांनी केले.

पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आजच्या कार्यक्रमात सर्वांनी संकल्प केल्यानुसार माझी वसुंधरा अभियानाला सर्वांच्या सहभागातून लोकचळवळीचे स्वरुप देऊ. पर्यावरण रक्षणाच्या कामात राज्याला आघाडीवर ठेवू. पर्यावरण रक्षण ही सर्वांची हरीत जीवनशैली होईल यासाठी प्रयत्न करताना येत्या 5 जूनपर्यंत अभियानाची गतिमान अंमलबजावणी करु, अशी ग्वाही श्रीमती म्हैसकर यांनी दिली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष  सुधीरकुमार श्रीवास्तव यांनी या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सर्वांनी ई-शपथ घेऊन पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसूल मंत्री श्री. थोरात, पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांच्यासह ऑनलाईन उपस्थित सर्व मंत्री, अधिकारी आदींनी यावेळी ऑनलाईन लॉगीन करुन पर्यावरण संवर्धनासाठी कटीबद्ध असल्याची ई-शपथ (ई-प्लेज) घेतली. या सर्वांना लगेच ऑनलाईन ई-प्रमाणपत्रे प्राप्त झाली. राज्यातील सर्व लोकांनी www.majhivasundhara.in या संकेतस्थळाला भेट देऊन #EPledge या मेनुवर क्लिक करुन ई-शपथ (ई-प्लेज) घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Monday, December 7, 2020

बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी


 दि. 7 : राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये पालघर जिल्ह्यासह राज्यातील विविध खाजगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरणार आहेत.

अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग व व्यवसायांना नववी उत्तीर्ण पासून दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा तसेच बी. ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक युवक-युवतींनी दिनांक 13 डिसेंबर 2020 पर्यत पसंतीक्रम नोंदवुन या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

  • अशी करा ऑनलाईन नोंदणी :
    हा रोजगार मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणार्‍या उमेदवारांसाठीच आहे. पालघर जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in होमपेजवरील जॉब सीकर (गेल डशशज्ञरी) लॉगिनमधून युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्लिक करून प्रथम मुंबई विभाग व त्यानंतर पालघर जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी. आवश्यक पात्रतेनुसार ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम नोंदवून मेळाव्यात सहभागी होता येईल.

मुलाखतीबाबत कळविणार :
उमेदवारांना पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दुरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.

Saturday, December 5, 2020

COVID दरम्यान कलाकारांना कामाचा पर्याय म्हणून आयूश च्या वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम च्या प्रयोगा बद्दल लेख

माहितीसाठी: 
COVID दरम्यान कलाकारांना कामाचा पर्याय म्हणून आयूश च्या वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम च्या प्रयोगा बद्दल लेख 
कॅनडा येथील 'The Thuderbird' या विद्यार्थी संचलीत वृत्त पोर्टलवर प्रसारित 
करण्यात आला आहे... जोहार! https://thethunderbird.ca/2020/12/03/indigenous-artists-in-india-adapt-traditional-practices-and-attract-new-customers/

डिसेंबर 2020 मध्ये मालमत्तेचे खरेदीखत नोंदणी करा आणि मुद्रांक शुल्कात 3 टक्के सूट मिळवा!

ज्यांना मालमत्ता खरेदीचे व्यवहार करायचे आहेत, त्यांच्यासाठी डिसेंबर महिना बचतीची संधी देणारा आहे. महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2020 मध्ये मालमत्तेचे खरेदी – विक्री व्यवहार करणाऱ्यांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 3% इतकी घसघशीत सूट देण्याची घोषणा केली आहे. यामुळे पक्षकारांच्या मुद्रांकशुल्कासाठी येणाऱ्या खर्चात 50% बचत होणार आहे. या सवलीताचा अधिकाधिक लोकांना फायदा व्हावा यासाठी पालघर, बोईसर, डहाणू व वाडा यांसह वसई तालुक्यातील सर्व 6 नोंदणी कार्यालये डिसेंबर महिन्यातील दर शनिवारी खूली रहाणार असल्याची माहिती पालघरचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नितीन पिंपळे यांनी दिली आहे.