Friday, April 2, 2021

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन बंद!

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा एकदा नविन आदेश काढून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. तर 10 व 12 वीचे वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय ऐच्छिक असुन शाळा व्यवस्थापनाने याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.

राज्य शासनाने यापुर्वी राज्यातील 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देताना शिक्षकांनी स्वत:ची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच करावी असे निर्देश दिले होते. मात्र काही शिक्षक बाहेर गावातून शाळेत ये-जा करीत असल्याचे तसेच यामुळे काही शिक्षक कोविड-19 ने बाधित झाल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. असा प्रकार जिल्ह्यात घडू नये तसेच जिल्ह्यातील कोविड-19 चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित/विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवणे आवश्यक असुन येत्या 5 एप्रिलपासुन पुढील आदेशापर्यंत बंदीचा आदेश लागू होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

तर 10 व 12 वी चे वर्ग सुरु ठेवणे शाळा व्यवस्थापनांना ऐच्छिक असणार आहे. मात्र आजारी विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी शाळेत प्रवेश करणार नाहीत तसेच आजारी असलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51(ब), भारतीय दंड संहिते (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी 26 मार्च रोजी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र 31 मार्च रोजी हा निर्णय मागे घेण्यात आला होता.

Saturday, March 27, 2021

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

मुंबई, दि. 26 : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारपासून (दि. 28 मार्च 2021) रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्‍हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

  • धोका टळला नाही उलट वाढला!
    ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.
  • कडक निर्बंधांचे संकेत!
    जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Friday, March 26, 2021

पालघर जिल्ह्यात 5 एप्रिलपासुन पुन्हा निर्बंध; शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुर्णपणे बंद!


दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार

पालघर, दि. 26 : पालघर जिल्ह्यात (वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून) मागील काही दिवसांपासुन करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली मोठी वाढ लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असुन येत्या पाच एप्रिलपासुन जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने, मॉल्स, हातगाडी व ठेल्यांवरील खाद्य पदार्थ विके्रत्यांसह अनेक बाबींवर वेळेचे व नागरीक क्षमतेचे बंधन लादण्यात आले आहे.

आज, 26 मार्च रोजी पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चर्चा होऊन याबाबत रुपरेषा निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार येत्या 5 एप्रिलपासुन विविध बाबींवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाच एप्रिलपासुन जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजेस व कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील 10 वी व 12 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील. तसेच या संस्थांद्वारे ऑनलाईन स्वरुपात कामकाज सूरु ठेवता येईल. तर राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन किंवा शिक्षण मंडळ स्तरावरील यापुर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व दुकाने 5 एप्रिलपासुन सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. मात्र हे निर्बंध अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रांसाठी जिवनावश्यक वस्तू, दूध, पेट्रोल पंप व औषधांच्या दुकानांना लागू राहणार नाही. 15 एप्रिलपर्यंत पुर्वनियोजित असलेल्या लग्न व इतर समारंभांच्या बाबतीत स्थानिक प्रशासन व संबंधित पोलीस स्टेशनकडून परवानगी घेऊन कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यास परवानगी असणार आहे. 15 एप्रिलनंतर मात्र लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स व तत्सम ठिकाणी लग्न व इतर समारंभ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अत्यंविधी कार्यक्रमामध्ये देखील 20 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.

खाद्यगृहे व बारमध्ये ग्राहकांचे आगमन व निर्गमन नियंत्रित करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ सेवन करण्यासाठी टेबलाची व्यवस्था असते, अशीच खाद्यगृहे व बार सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सूरु राहतील. होम डिलिव्हरीचे किचन रात्री 10 वाजेपर्यंत सूरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर हातगाडी, ठेले व स्टॉल ज्यावर खाद्य पदार्थ सेवन केले जाते व वितरण केले जाते अशी ठिकाणे सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या कालावधीतच कोविडचे सर्व नियम पाळून सुरु राहतील.

दरम्यान, जिम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक हे वैयक्तीक सरावासाठी सूरु राहतील. तर सामूहिक स्पर्धा व इतर कार्यक्रम बंद राहतील. सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे देखील संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूरु राहतील.

भाजी मंडई 50% क्षमतेने सूरु राहतील आणि एका-आड-एक या प्रमाणे ओटे सूरु राहतील. सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये क्षमतेच्या 50% व्यक्तींनाच उपस्थिती बंधनकारक राहील. प्रवेश देतांना प्रत्येक व्यक्तीस विना मास्क प्रवेश देण्यास मनाई असेल. अशा ठिकाणी प्रवेश द्वारावर थर्मल स्क्रिनिंग घेण बंधनकारक राहील. ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तापमान मोजण्याचे उपकरण वापरावे लागले.

या निर्बंधाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाजगी आस्थापना केंद्र शासन जो पर्यंत कोविड-19 च्या आजारास आपत्ती म्हणून घोषित ठेवत आहे, त्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येतील व संबंधित धारकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात येईल. शॉपिंग मॉल्सना देखील करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहे.

ज्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे त्यांनी चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत गृह अलगीकरणमध्ये राहणे आवश्यक राहील. अशा व्यक्ती घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. होम आयोसोलेशनमध्ये असल्यास याबाबतची माहिती स्थानिक अधिकार्‍यांना तसेच वैद्यकीय अधिकारी यांना द्यावी लागेल. रुग्ण बाधित झाल्याच्या दिवसापासून दरवाज्यावर होम आयोसोलेशन सुस्पष्ट ठिकाणी बोर्ड लावण्यात येईल. बाधित रुग्णावर होम क्वांरटाईनचा शिक्का मारुन कुटुंबातील व्यक्तींनी देखील बाधित रुग्णाच्या हालचालीवर लक्ष देणे तसेच त्यांनी नियमित मास्क वापरणे बंधनकारक राहील. अलगीकरणाचे कोणतेही उल्लंघन केल्यास नियुक्त केलेले स्थानिक अधिकारी संबंधित इसमाला जवळच्या कोविड सेंटरमध्ये तात्काळ दाखल करतील.

दरम्यान, या निर्बंधाचे उल्लघंन करणार्‍या संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध कलमां

Wednesday, March 17, 2021

जिल्ह्यातील शासकिय आश्रमशाळा व वसतीगृहे बंद ठेवण्याचे आदेश!

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता जिल्ह्यातील सर्व शासकिय व अनुदानित आश्रमशाळा तसेच इतर शासकीय विभागांची वसतीगृहे व खाजगी वसतीगृहे 22 मार्चपासुन पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना मात्र वसतीगृहात राहणे ऐच्छिक करण्यात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज, बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

Wednesday, March 10, 2021

‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या

खोबरेल तेल – एक चमचा खोबरेल तेलात 2-3 लसनाच्या पाकळ्या टाकून, गरम करावे आणि झोपताना त्या तेलाने पाठीचा मसाज करावा.


मीठ – 3 चमचे मीठ भाजून घ्या आणि एका कॉटनच्या कपड्यात ते मीठ बांधून त्याचा हळूहळू शेक घेतल्याने पाठ दुखणे कमी होते.


गूळ आणि जीरा – एक कप पाण्यात गुळ आणि जीरा टाकून शिजवून तो काडा पिल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.


गरम पाणी – गरम पाणी करुन त्यात एक टॉवेल भिजवा आणि पिळून तो टॉवेल दुखत असलेल्या भागावर ठेवा पाठदुखीचा त्रास कमी होईल.

चहा – चहात दोन काळी मीरी आणि थोडं आलं टाकून चहा बनवा. हा चहा दररोज दिवसातून दोन वेळा पिल्याने पाठदुखीपासून तुमची सुटका होईल.