Monday, June 7, 2021

पालघर जिल्हा अनलॉक व जाणून घ्या नवे नियम!


महाराष्ट्र राज्यात बे्रक द चेन अंतर्गत उद्या, 7 जुनपासुन अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. करोनाचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सीजन बेड ऑक्युपन्सीच्या आधारावर पाच स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी करुन ही अनलॉक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 40 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने पालघर जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या स्तरामध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार पालघर जिल्हाधिकार्‍यांमार्फत जिल्ह्यासाठी तसे स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले आहेत.

नवे नियम खालीलप्रमाणे :

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापने सोमवार ते रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. तर शनिवार व रविवार बंद राहतील.
  • मॉल्स, सिनेमागृहे व नाट्यगृहे पुर्णपणे बंद राहतील.
  • रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 4 वाजेनंतर पार्सल, टेक अवे (घेवून जाणे) व होम डिलिव्हरी सेवा सुरु राहील.
  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, चालणे व सायकलिंगसाठी सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी राहिल.
  • खाजगी आस्थापना व कार्यालये कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 
    8) बाह्य मैदानी खेळ सोमवार ते रविवार पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने परवानगी असेल.
  • विवाह समारंभास केवळ 50 व्यक्तींना परवानगी असेल.
  • अंत्यविधीला केवळ 20 व्यक्तींना परवानगी असेल.
  • वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये (स्थानिक संस्था/सहकारी संस्था) 50 टक्के उपस्थिती राहिल.
  • बांधकाम केवळ बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी राहणार्‍या मजुरांवर सुरु राहिल. किंवा कामगारांना संध्याकाळी 4 वाजता सोडणे बंधकारक राहिल.
  • कृषी संबंधित दुकाने सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • ई-कॉमर्स नियमितपणे सुरु राहील.
  • संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी राहील. तर 5 वाजेनंतर संचारबंदी लागू असेल.
  • जिम, सलुन ब्यटी पार्लर स्पा व वेलनेस सेंटर्स सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. ग्राहकांना पुर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच एसीचा वापर करता येणार नाही.
  • आंतरजिल्हा प्रवार नियमितपणे सुरु राहील. परंतू 5 व्या स्तरातील जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असेल.

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना :-
1) अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त नागरिकांना सायंकाळी 05.00 वाजेनंतर मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील.
2) ज्यावेळी ई-पास आवश्यक असेल त्यावेळी वाहनातील सर्व प्रवाशांकडे वैयक्तीक स्वतंत्र ई-पास असणे आवश्यक आहे. प्रवासांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही.
3) कोविड-19 च्या व्यवस्थापनाकरिता आवश्यक शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये उपस्थिती 100 टक्के राहील, इतर सरकारी कार्यालयात 50% जास्त क्षमतेने कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने उपस्थित राहतील.

  • अत्यावश्यक सेवेत खालील बाबी समाविष्ट असतील-
  1. रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा तसेच त्यांना आवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभूत कच्चा माल आणि अनुषंगिक सेवेशी संबंधित उत्पादन व वितरण यांचा देखील समावेश असेल.
  2. शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा/दवाखाने, पशु निवारा व त्यांची खादय दुकाने.
  3. वन विभागाने जाहीर केलेेले वनीकरण संबंधित सर्व कामकाज.
  4. विमानचलन आणि संबंधित सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभाल दुरुस्ती, कार्गो, ग्राऊंड सव्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.)
  5. किराणा सामान, भाजीपाला, फळ विक्रते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटन, मासे, अंडी आणि पेल्ट्री दुकाने)
  6. शितगृहे आणि साठवणकीची गोदाम सेवा.
  7. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे- विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ओटोरिक्षा व सार्वजनिक बसेस.
  8. पावसाळापूर्व तयारी करीता आवश्यक सर्व गतविधी.
  9. स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व सार्वजनिक सेवा.
  10. बॅकींग व वित्तीय सेवा.
  11. सेबी अंतर्गत कार्यालये.
  12. दुरध्वनी व संचार सेवा.
  13. माल वाहतूक सेवा.
  14. पाणी पुरवठा सेवा
  15. शेती संबंधित सर्व कामकाज आणि शेती विषयक कामकाज अखंडीत सुरु राहणेसाठी आवश्यक असणारी शेती पुरक सेवा जसे- बि-बियाणे, खते, उपकरणे याचा पुरवठा आणि दुरुस्ती विषयक कामकाज.
  16. ई-कॉमर्स (फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठ्याशी निगडीत)

पालघर जिल्ह्यात 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा


मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणार्‍या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणार्‍या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, बहृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महापालिकांचे आयुक्त, कोकण विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधिक्षक, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

  • पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी!
    या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणार्‍या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

दरडग्रस्त भागातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे!
दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशा सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे.

  • अनपेक्षिरित्या घडणार्‍या गोष्टी गृहित धरुन तयारी करा!
    अतिवृष्टीच्या काळात काही नैसर्गिक गोष्टी घडणे अपेक्षित असते तर काही गोष्टी या अनपेक्षितपणे घडतात. आपण अपेक्षित गोष्टी गृहित धरून तयारी करतो परंतू ज्या अनपेक्षित गोष्टी घडू शकतात त्या गृहित धरून प्रशासनाने त्याचीही तयारी करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या काळात मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.
  • रुग्णसेवेत अडथळा नको!
    अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजनचा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
  • पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष नको!
    कोविड काळात कोविड आणि पावसाळी आजार एकत्र आले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते याकडे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले तसेच पावसाळी आजार उद्भवू शकणार्‍या परिस्थितीवर विशेषत: मलेरियावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
  • पाणी साचणारी ठिकाणे लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात!
    मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणार्‍या स्थळांचा शोध घ्यावा, पंपींग स्टेशन्स आणि झडपा यांची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी, यातील अडथळे दूर करावेत, लो लाईन एरियात विशेष काळजी घ्यावी, गरज पडल्यास या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात, धोकादायक इमारतींमधील नागरिकांना धोक्याची कल्पना देऊन संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरीत होण्यास सांगावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Thursday, June 3, 2021

जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील आदेश मोजक्याच दुकानदारांना मोकळीक!

जिल्ह्यातील सलुनचालकांना धक्का; दुकान सुरु ठेवण्याची परवानगी रद्द!


पालघर जिल्हाधिकार्‍यांनी काल, 31 मे रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा नसलेली काही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेदरम्यान उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र राज्य शासनाच्या आदेशात सलुन, स्पा व जिम पुर्णपणे बंद ठेवण्याचे नमुद असल्याने पालघर जिल्ह्यातील सलुन उघडण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज याबाबतचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असुन 31 मे रोजीचे सलुन (केश कर्तनालय व दाढी करणे) सुरु ठेवण्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.

Sunday, May 2, 2021

कोविड-19 विशेष मुख्यमंत्री सहायता निधी


कोविड-19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड 19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे

इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

 

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.