Saturday, April 11, 2020

सोशल डिस्टन्सींगची ऐसीतैसी: डहाणूरोड भाजी मार्केट


पहाटे 4 ते 6 दरम्यान येथे पाय ठेवायला जागा नसते.

डहाणू : हे आहे डहाणूरोड रेल्वे स्थानक परिसरातील सोशल डिस्टन्सींग! वेळ आहे सकाळी 8 वाजताची. पेट्रोल व डीझेल विक्री बंद केल्यानंतरच्या तिसऱ्या दिवसाचे चित्र. पहाटे 4 ते सकाळी 6 अधिक गंभीर चित्र असते. अनेक लोक वाहने घेऊन फिरताहेत. जे घाबरतात त्यांनी, सागर नाक्यावर वाहने थांबवून ठेवलेली. रस्त्यावर पोलिस नाहीत. या भागात प्रवेश करण्यासाठी असलेल्या 3 रस्त्यांवर पोलिसांनी दोऱ्या बांधून अडथळे केलेले आहेत. पण तेथे एकही पोलिस नाही. नगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत, पण त्यांना मर्यादा येताहेत. या भागात जो पर्यंत भाजीपाला घाऊक बाजार भरेल, तो पर्यंत सोशल डिस्टन्सींग शक्य नाहीच. या भागात संपूर्ण तालुक्यातून लहान भाजी विक्रेते व घरगुती वापरासाठी स्थानिक लोक भाजीपाला खरेदीसाठी येत असतात. हे असेच चालले, तर कोरोनाचा प्रतिबंध केवळ नशीबावर अवलंबून राहील, असे चित्र आहे. हा भाजीचा बाजार तात्पुरत्या स्वरूपात, सोमवार बाजार किंवा एसटी डेपो किंवा मध्यवर्ती अशा पारनाका मैदानावर स्थलांतरित केला पाहिजे. शक्य असल्यास 3/4 ठिकाणी विभागला पाहिजे, अशा लोकांच्या सूचना आहेत. डहाणू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी कार्यालयाच्या वेळा न पहाता, पहाटे फेरफटका मारुन परिस्थिती समजून घ्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे.

बियाणे व खते विक्रेत्यांनी दुकाने सुरु ठेवावीत!- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना


 कोरोना (कोव्हीड-१९) विषाणुचा संसर्ग व वाढत्या प्रादुर्भावा बाबत पालघर जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे आदेश निर्गमीत केले असल्यामुळे बियाणे व खते विक्रेत्यांची दुकाने बंद आहेत. परंतु खते व बियाणे जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ मध्ये समाविष्ट असल्याने व शेतकरी बांधवांना बियाणे खरेदी करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये, याकरिता विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरु ठेवावीत असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
राज्यात येत्या खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे इतर राज्यात निर्मिती होऊन प्रक्रिया व विक्रीसाठी महाराष्ट्र
राज्यात येत असते. राज्यातील सर्व बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगिक बियाणे पॅकिंग, हाताळणी, केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, राज्यांतर्गत व परराज्यातून बियाणाची वाहतूक आणि राज्यातील बियाणे विक्री केंद्र सरु ठेवणे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी किटकनाशकांची सुध्दा आवश्यकता असल्याने किटकनाशकांची आयात, परराज्यातून वाहतूक व राज्यांतर्गत विक्री सुरु ठेवणे आणि शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होणेबाबत आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य यांनी कळविले असून त्यानुसार पालघर जिल्ह्यातील सुरळीत पुरवठा होण्याचे दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी हे आवाहन केले आहे.

आमदार श्रीनिवास वणगांची जीभ घसरली, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल



सध्या मच्छीमारी साठी गेलेले शेकडो मच्छीमार गुजरात राज्यात अडकले असून, त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठीचे प्रशासनाचे प्रयत्न असफल ठरले आहेत. गुजरात राज्यातील वेरावळ येथे जमा झालेल्या मच्छिमारांना 15/20 बोटींतून आपापल्या घरी पाठविण्यात आले. मात्र महाराष्ट्रातील खलाश्यांना घेऊन येणाऱ्या बोटींना राज्याच्या हद्दीत प्रवेश करता आला नाही. त्यातील गुजरातच्या हद्दीतील खलाश्यांना तेथे उतरवण्यात आले. मात्र महारााष्ट्रातील रहिवाशांना गुजरात हद्दीत उतरण्यास मनाई करण्यात आली व महाराष्ट्रात देखील प्रवेश करु न देता, पुन्हा वेरावळ येथे रवानगी करण्यात आली. तेथे त्यांची खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याची तक्रार आहे. या प्रकारामुळे मच्छीमार बांधवांमध्ये अस्वस्थता आहे.

समुद्रातील बोटींवर फसलेले हे खलाशी विविध राजकीय नेत्यांकडे मोठ्या अपेक्षेने मोबाईलवरुन संपर्क साधून त्यांना घरी परतण्याची व्यवस्था करण्याचे साकडे घालत आहेत. नेते देखील आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत असले तरी यश आलेले नाही. आता 14 एप्रिल नंतर पुन्हा लॉक डाऊन वाढले तर काय असा प्रश्न अडकलेल्या लोकांना सतावत आहे. अशा चिंतेतून शिवसेना आमदार श्रीनिवास वणगा यांच्याशी एका खलाश्याचे बोलणे झाल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिप मध्ये आपल्याला जाब विचारला जात असल्याच्या भावनेने, वणगांचा संयम सुटल्याचे ऐकायला मिळते आहे. संभाषणात फोन करणारा आणि आमदार परस्परांना शिवीगाळ करताना दिसत आहे.

काही विरोधक मला हेतूपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने फोन करतात व चिथावणी देतात. मी संयमाने वागतो. गुजरातमध्ये फसलेल्या लोकांना आपापल्या घरी परतता यावे यासाठी मी प्रयत्नशिल आहे. मी संबंधित व्यक्तीला समाजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मला धमकावण्याच्या सुरात वाद घातल्यामुळे मी जशास तसे उत्तर दिले आहे. गुजरात मध्ये फसलेल्या बांधवांविषयी मला पूर्णत: सहानुभूती असून, मी त्यांच्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. 
– श्रीनिवास वणगा (आमदार)



वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे ; पालकमंत्री अस्लम शेख यांच्या निर्देशानुसार पालिकेची मार्गदर्शक तत्वे जारी




 मुंबई शहरातील खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीकर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना देण्याचे निर्देश पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते,त्यानुसार महापालिकेने खाजगी रुग्णालयासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांना आवश्यक पीपीई किटएन 95 मास्कग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीपरिचारिकाकक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शेख यांनी दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.

खासगी रुग्णालयासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत.

1) रुग्णालयात काम करणाऱ्या व प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णांना हाताळणाऱ्या सर्व अधिकारी,कर्मचारीकामगारांना पीपीई किट,एन 95 मास्कग्लोव्हज व इतर आवश्यक साधने उपलब्ध करुन द्यावीत.

2) रुग्णालयात काम करणारे अधिकारीकर्मचारीकामगार यांना पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घेण्यात यावी.

3) रुग्णालयात काम करणा-या अधिकारीकर्मचारीकामगार यांना त्यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करावे.

4) रुग्णालयांत काम करणाऱ्या अधिकारीकर्मचारीकामगार यांना कर्तव्यावर उपस्थित होण्याकर‍िता वाहतुकीची पुरेशी साधने उपलब्ध नसल्यास त्यांच्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करणे.

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या व रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी,परिचारिकाआरोग्य सेवक यांना संसर्ग होऊ नये व त्यांचे आरोग्य चांगले रहावेयासाठी वरील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे

Thursday, April 9, 2020

महाराष्ट्र – गुजरात सीमेवर खलाशांमध्ये पुन्हा तणाव



गुजरातच्या नारगोळ बंदरात उतरू न दिल्याने पालघर जिल्ह्यातील खलाशी संतप्त

गुजरातच्या वेरावळ भागत कार्यरत असणारे सुमारे दोन हजार खलाशी 4 एप्रिल रोजी आपल्या घरी परतण्यासाठी गुजरातमधील भागत आले होते. या प्रवाशांना प्रथम गुजरातमधील स्थानिकांनी उतरण्यास मज्जाव केला, नंतर 5 एप्रिल रोजी गुजरातमधील 1125 खलाशांना उतरवून घेतल्यानंतर महाराष्ट्रामधील खालाशाना उतरवण्यास गुजरात प्रशासकीय विभागाने नकार दिला. पुढे रात्रीच्या वेळी बंदरांमध्ये नांगरलेल्या बोटींचे दोर कापून तसेच गोळीबार करण्याची धमकावणी दिल्यानंतर पालघर जिल्ह्यातील 800 खलाशी असणाऱ्या बोटीला नाईलाजाने वेरावळ येथे परतावे लागले.

या खलाशांनी आपल्या नातेवाईकांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये वेरावळमध्ये आपली व्यवस्थित सोय होत नसल्याची तक्रार नोंदवली आहे. त्याचप्रमाणे नारगोळ बंदरापासून आपली गाव अवघे दोन-तीन किलोमीटरवर असताना आपल्याला तेथे उतरून न दिल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे गुजरात सरकारने राज्यातील खलाशांशी दुजाभवाने वागवले तसेच तलासरी व डहाणू तालुक्यातील आणि पालघर जिल्हा प्रशासनाने याबाबत आवश्यक पाठपुरावा केला नसल्याची खंत तलासरी तालुक्यातील मंडळी करीत आहेत. आगामी काळात गुजरातमधील नागरिकांना आपल्या भागातील बाजारपेठेमध्ये येण्यास मज्जाव करू अशा स्वरूपाचा इशारा वेरावळ येथे अडकून पडलेल्या खलाशांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील सीमा भागात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.