Saturday, April 11, 2020

आज रोजी पालघर जिल्ह्यात 37 कोरोना पॉझिटीव्ह


पालघर जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 37 झाली आहे. मृतांचा आकडा 4 वर स्थीर ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. एकूण 49 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यातील 33 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह असून 16 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. पालघर तालुक्यातील 2 पॉझिटीव्ह, व वसई ग्रामीण क्षेत्रातील 3 पॉझिटीव्ह वगळता, उर्वरीत 32 कोरोना पॉझिटीव्ह हे वसई महानगर क्षेत्रातील आहेत.

228 तपासणी अहवाल निगेटिव्ह : एकूण 421 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, आज रोजी पर्यंत, 265 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 228 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 156 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

सध्या 49 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एमसीजीएम रेस्ट हाऊस (अंधेरी) – 1; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 9; जसलोक (मुंबई) – 5; एमजीआरएम (पवई) – 2; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 1 (रुग्ण बरा झाल्याने सुट्टी दिली); बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 13 (अहवाल प्राप्त नाही); डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 2 (अहवाल प्राप्त नाही); ग्रामीण रुग्णालय (पालघर) – 2 (अहवाल प्राप्त नाही);रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 3; सेव्हन हिल्स हॉस्पिटल 7; हॉरिझोन प्राईम हॉस्पिटल (ठाणे) – 4; शताब्दी हॉस्पिटल (कांदिवली) – 1:

  • 81 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 49 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 421 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 228 नमुने निगेटिव्ह.
  • 156 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 4 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन




मुंबई, दि. 11 : कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे. रेशनिंगसाठीच्या तक्रारीसाठी/रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन जनतेस करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय हेल्पलाईन ही सकाळी10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्याचा हेल्पलाईन क्रमांक : 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) आहे. अन्य हेल्पलाईन क्रमांक : 022- 23720582 / 23722970 / 23722483,ईमेल-helpline.mhpds@gov.in,ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठीmahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करा. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून  हा कक्ष सकाळी 8 ते रात्री 8वाजेपर्यंत सुरु राहील. त्याचा हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814,ईमेल-dycor.ho.mum@gov.in असा आहे.

सोशल डिस्टन्सींगची ऐसीतैसी: डहाणूरोड भाजी मार्केट


पहाटे 4 ते 6 दरम्यान येथे पाय ठेवायला जागा नसते.

डहाणू : हे आहे डहाणूरोड रेल्वे स्थानक परिसरातील सोशल डिस्टन्सींग! वेळ आहे सकाळी 8 वाजताची. पेट्रोल व डीझेल विक्री बंद केल्यानंतरच्या तिसऱ्या दिवसाचे चित्र. पहाटे 4 ते सकाळी 6 अधिक गंभीर चित्र असते. अनेक लोक वाहने घेऊन फिरताहेत. जे घाबरतात त्यांनी, सागर नाक्यावर वाहने थांबवून ठेवलेली. रस्त्यावर पोलिस नाहीत. या भागात प्रवेश करण्यासाठी असलेल्या 3 रस्त्यांवर पोलिसांनी दोऱ्या बांधून अडथळे केलेले आहेत. पण तेथे एकही पोलिस नाही. नगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत, पण त्यांना मर्यादा येताहेत. या भागात जो पर्यंत भाजीपाला घाऊक बाजार भरेल, तो पर्यंत सोशल डिस्टन्सींग शक्य नाहीच. या भागात संपूर्ण तालुक्यातून लहान भाजी विक्रेते व घरगुती वापरासाठी स्थानिक लोक भाजीपाला खरेदीसाठी येत असतात. हे असेच चालले, तर कोरोनाचा प्रतिबंध केवळ नशीबावर अवलंबून राहील, असे चित्र आहे. हा भाजीचा बाजार तात्पुरत्या स्वरूपात, सोमवार बाजार किंवा एसटी डेपो किंवा मध्यवर्ती अशा पारनाका मैदानावर स्थलांतरित केला पाहिजे. शक्य असल्यास 3/4 ठिकाणी विभागला पाहिजे, अशा लोकांच्या सूचना आहेत. डहाणू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी कार्यालयाच्या वेळा न पहाता, पहाटे फेरफटका मारुन परिस्थिती समजून घ्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे.

बियाणे व खते विक्रेत्यांनी दुकाने सुरु ठेवावीत!- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना


 कोरोना (कोव्हीड-१९) विषाणुचा संसर्ग व वाढत्या प्रादुर्भावा बाबत पालघर जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे आदेश निर्गमीत केले असल्यामुळे बियाणे व खते विक्रेत्यांची दुकाने बंद आहेत. परंतु खते व बियाणे जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ मध्ये समाविष्ट असल्याने व शेतकरी बांधवांना बियाणे खरेदी करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये, याकरिता विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरु ठेवावीत असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
राज्यात येत्या खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे इतर राज्यात निर्मिती होऊन प्रक्रिया व विक्रीसाठी महाराष्ट्र
राज्यात येत असते. राज्यातील सर्व बिज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगिक बियाणे पॅकिंग, हाताळणी, केंद्र, बीज परिक्षण प्रयोगशाळा, राज्यांतर्गत व परराज्यातून बियाणाची वाहतूक आणि राज्यातील बियाणे विक्री केंद्र सरु ठेवणे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी किटकनाशकांची सुध्दा आवश्यकता असल्याने किटकनाशकांची आयात, परराज्यातून वाहतूक व राज्यांतर्गत विक्री सुरु ठेवणे आणि शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होणेबाबत आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य यांनी कळविले असून त्यानुसार पालघर जिल्ह्यातील सुरळीत पुरवठा होण्याचे दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी हे आवाहन केले आहे.

आमदार श्रीनिवास वणगांची जीभ घसरली, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल



सध्या मच्छीमारी साठी गेलेले शेकडो मच्छीमार गुजरात राज्यात अडकले असून, त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठीचे प्रशासनाचे प्रयत्न असफल ठरले आहेत. गुजरात राज्यातील वेरावळ येथे जमा झालेल्या मच्छिमारांना 15/20 बोटींतून आपापल्या घरी पाठविण्यात आले. मात्र महाराष्ट्रातील खलाश्यांना घेऊन येणाऱ्या बोटींना राज्याच्या हद्दीत प्रवेश करता आला नाही. त्यातील गुजरातच्या हद्दीतील खलाश्यांना तेथे उतरवण्यात आले. मात्र महारााष्ट्रातील रहिवाशांना गुजरात हद्दीत उतरण्यास मनाई करण्यात आली व महाराष्ट्रात देखील प्रवेश करु न देता, पुन्हा वेरावळ येथे रवानगी करण्यात आली. तेथे त्यांची खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याची तक्रार आहे. या प्रकारामुळे मच्छीमार बांधवांमध्ये अस्वस्थता आहे.

समुद्रातील बोटींवर फसलेले हे खलाशी विविध राजकीय नेत्यांकडे मोठ्या अपेक्षेने मोबाईलवरुन संपर्क साधून त्यांना घरी परतण्याची व्यवस्था करण्याचे साकडे घालत आहेत. नेते देखील आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत असले तरी यश आलेले नाही. आता 14 एप्रिल नंतर पुन्हा लॉक डाऊन वाढले तर काय असा प्रश्न अडकलेल्या लोकांना सतावत आहे. अशा चिंतेतून शिवसेना आमदार श्रीनिवास वणगा यांच्याशी एका खलाश्याचे बोलणे झाल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिप मध्ये आपल्याला जाब विचारला जात असल्याच्या भावनेने, वणगांचा संयम सुटल्याचे ऐकायला मिळते आहे. संभाषणात फोन करणारा आणि आमदार परस्परांना शिवीगाळ करताना दिसत आहे.

काही विरोधक मला हेतूपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने फोन करतात व चिथावणी देतात. मी संयमाने वागतो. गुजरातमध्ये फसलेल्या लोकांना आपापल्या घरी परतता यावे यासाठी मी प्रयत्नशिल आहे. मी संबंधित व्यक्तीला समाजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मला धमकावण्याच्या सुरात वाद घातल्यामुळे मी जशास तसे उत्तर दिले आहे. गुजरात मध्ये फसलेल्या बांधवांविषयी मला पूर्णत: सहानुभूती असून, मी त्यांच्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. 
– श्रीनिवास वणगा (आमदार)