Thursday, August 27, 2020

डहाणू तालुक्यात सरासरीच्या 97% पाऊस – मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 65% पाऊस

 दि. 26 ऑगस्ट: डहाणू तालुक्यात सरासरीच्या 96.9% इतका पाऊस पडला असून मोखाडा तालुक्यात मात्र सरासरीच्या अवघा 64.9% पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांची सरासरी पुढीलप्रमाणे: पालघर तालुका – 94.8%, तलासरी तालुका – 82.6%, वसई तालुका 79.9%, विक्रमगड तालुका 75%, वाडा तालुका 72.2, जव्हार तालुका 70.7%

बोईसरमध्ये 200 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभे राहणार

जिल्हाधिकार्‍यांच्या संबंधितांना सुचना

पालघर, दि. 26 : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यांमधून बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक व्यवस्थापनाच्या मदतीने बोईसर व परिसरामध्ये 200 बेडचे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर निर्माण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधितांना केली आहे. त्याचबरोबर पालघरमधील कांबळगाव येथील कोव्हिड केअर सेंटरचे मजबुतीकरण करणे व टिमा रुग्णालयातील संपूर्ण 40 बेड आयसीयूत रुपांतरीत करण्यात यावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

विषयास अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी काल, 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

वर नमुद सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औद्योगिक व्यवस्थापनाने या सुविधा निर्माण करावयाच्या असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. त्याचबरोबर औद्योगिक व्यवस्थापनाकडे असणार्‍या अ‍ॅम्बुलन्स कोव्हिड रुग्णांच्या सेवेसाठी बोईसर येथे उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केल्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Sunday, August 23, 2020

डहाणू परिसरात दिवसभरात भूकंपाचे सहा सौम्य धक्के

परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज (रविवार)सकाळपासून भूकंपाचे सहा सौम्य धक्के बसल्याने पुन्हा येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आज सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी १.८ तीव्रतेचा, ११ वाजून ३९ मिनिटांनी ३.१ तीव्रतेचा, दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी  २.१ तीव्रतेचा, सायंकाळी ४ वाजून २२ मिनिटांनी १.८ तीव्रतेचा, सायंकाळी ५ वाजून ८  मिनिटांनी २.३ तर सायंकाळी ५ पाच वाजून २३ मिनिटांनी ३.२ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला.

या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते व केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमीटर होती. तीन पेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप व डहाणू तालुक्यात अनेक ठिकाणी कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत असून, गेले काही महिने त्याची तीव्रता वाढण्याचे प्रकार कमी झाले होते. या भूकंपामुळे नुकसान झाल्या बद्दलची माहिती अजूनही प्राप्त झाली नाही.


तलासरीमध्ये आदिवासी जमिनीवरिल अतिक्रमण हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील पाटीलपाडा येथे दशरथ देवजी भुरकुड व देवजी वनश्या भुरकुड यांची मालकी कब्ज्यातील वडलोपर्जित जमीन असून त्यामध्ये ते भातशेती व गवताचे उत्पन्न घेत आहेत.मात्र या जमिनीतील गट क्रमांक ४१/अ /१० व गट क्रमांक ४१/अ /११ या दोन्ही हिस्सातील अनुक्रमे २० गुंठे व १एकर जागेवर तलासरी मधील बिगर आदिवासी लोकांनी अतिक्रमण करत पक्के बांधकाम करत इमारत बांधली आहे . या अतिक्रमण बांधकामाबाबत जमीन मालक यांनी संबधित बांधकाम हटवण्याबाबत सांगितले असता या गोष्टीकडे त्यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा आरोप जमीन मालक भुरकुड यांनी केला आहे. सदर अतिक्रमण हटवाण्या बाबत भुरकुड यांनी पालघर जिल्हाधीकारी यांना १३/०७/२०२० रोजी तक्रार अर्ज करत आपल्याला न्याय मिळावा ही विनंती केली होती .त्या अर्जाची पालघर जिल्हाधिकारी यांनी दखल घेत तलासरी तहसीलदार यांना तलासरी मधील आदिवासी जमिनी वरील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे लेखी आदेश दिले आहेत .त्यामुळे आता तलासरी तहसीलदार या जमीनी वरील अतीक्रमण कधी पासून कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष आहे .

Thursday, August 20, 2020

तरूणांनो गावात राहूनच सुरू करा ‘हे’ तीन व्यवसाय आणि कमवा लाखो रूपये

गावातील तरुणांना शहरात जाऊन स्वत: चा काहीतरी छोटा- मोठा व्यवसाय करायचा असतो. कारण की शहरात व्यवसायाचे बरेच मार्ग आहेत. पण आता दिवसेंदिवस वेळ बदलली आहे. मित्रांनो कदाचित तुम्हाला माहिती नाही शहरांमध्ये जेवढे पर्याय व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. तसेच ग्रामीण भागातही एक किंवा दोन मार्ग अजून चांगले आहेत.  

प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय करण्याची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय सुरू करायचा समजत नाही. यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी व्यवसायाच्या काही नवीन कल्पना घेऊन आलोय. हे व्यवसाय सुरू करण्यासाठी ना तुम्हाला शहरात जाण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या ग्रामीण भागातच राहून हे व्यवसाय सुरू करा शकता.