Saturday, September 26, 2020

रस्ता रोको आंदोलन, कायद्यांची होळी - किसान सभा

महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांत ५० हजार शेतकऱ्यांतर्फे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ 

मुंबई : आज २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यांत ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलने वा उग्र निदर्शने करून भाजपच्या केंद्र सरकारच्या तिन्ही शेतकरीविरोधी कायद्यांची होळी केली. या आंदोलनात अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआय यांच्या नेतृत्वाखाली महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहा महिन्यांपूर्वी कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात झालेले हे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

पालघर, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी रस्ता रोकोचे जोरदार आंदोलन झाले व या चार जिल्ह्यांतील आंदोलकांचीच संख्या ३५ हजारांहून अधिक होती. पालघर जिल्ह्यात चारोटी, ता. डहाणू, आणि बोईसर फाटा, ता. पालघर या दोन्ही ठिकाणी मुंबई - बडोदा- जयपूर - दिल्लीचा राष्ट्रीय महामार्ग १० हजार शेतकऱ्यांनी रोखून धरला. इतर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी राज्य महामार्ग रोखून धरण्यात आले. 

त्याशिवाय अनेक जिल्ह्यांत प्रभावी कृती झाल्या. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे, विदर्भात बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा व नागपूर, मराठवाड्यात नांदेड, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद व उस्मानाबाद, आणि उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार या जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत शेतकऱ्यांची जोरदार आंदोलने झाली. मुंबईच्या काही भागांत सीटू आणि डीवायएफआय या संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांचे कार्यकर्तेही या निदर्शनांत सहभागी झाले, असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

या आंदोलनांचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, सीटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, कोषाध्यक्ष उमेश देशमुख आणि राज्य पदाधिकारी बारक्या मांगात, रतन बुधर, रडका कलांगडा, सुनील मालुसरे, सावळीराम पवार, उदय नारकर, शंकर सिडाम, उद्धव पौळ, सिद्धप्पा कलशेट्टी, माणिक अवघडे, यशवंत झाडे इत्यादींनी केले. 

Tuesday, September 15, 2020

डहाणू व तलासरी: आज स. 11.39 वाजता व काल दु. 4.16 वाजता भूकंपाचे धक्के

दि. 15.09.2020): डहाणू व तलासरी तालुक्याला आज सकाळी 11.39 वाजता 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. काल (सोमवारी) देखील दुपारी 4.16 वाजता 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला होता. 11 सप्टेंबर रोजी भूकंपाचे सलग 6 धक्के बसल्यानंतर 2 दिवस शांततेत गेले होते. 11 सप्टेंबरच्या धक्क्यांमध्ये 3.5 व 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांचा समावेश होता.

Wednesday, September 9, 2020

तलासरीत वीज पडून दोघांचा मृत्यू!

तलासरी, दि. 9 : पालघर जिल्ह्यातील डहाणू व वाडा तालुक्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज, बुधवारी संध्याकाळी तलासरी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी तलासरी तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु असतानाच कुर्झे धरण परिसरात 5 वाजेच्या सुमारास अचानक वीज कोसळली. यावेळी तेथे उपस्थित असणार्‍या सचिन कुवरा (वय 27) व अतुल बाबु गोवारी (वय 18, दोघे राहणार बेंडगाव, ता. डहाणू) यांचा मृत्यू झाल्याचे पालघर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 6 सप्टेंबर रोजी डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज कोसळून नितेश हाळ्या तुंबडा या 20 वर्षी तरुणाचा तर वाडा तालुक्यात शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Saturday, September 5, 2020

डहाणू परिसरात भूकंपाचे तीन मध्यम धक्के


डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात अनेक भूकंपाचा धक्का

डहाणू शहराच्या पूर्वेच्या भगत मध्यरात्रीच्या सुमरास भूकंपाचे दोन मध्यम झटके बसल्याने डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात अनेक भागाला कंप जाणवला.