Friday, April 30, 2021

करोना रुग्णांवर तात्पुरता उपचार करणार्‍या खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकार्‍यांच्या विविध सुचना!


पालघर, दि. 30 : सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना करोना चाचणीबाबत मार्गदर्शन न करता त्यांच्यावर तात्पुरते उपचार करुन वेळ मारुन नेणार्‍या खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकार्‍यांनी विविध सुचना करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या करोना रुग्णांचा चाचणी न करता मृत्यू झाला आहे. अशा रुग्णांनी ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते, त्याचा शोध घेऊन संबंधित रुग्णालयावर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांसाठी जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही खाजगी रुग्णालये कोव्हीड-19 ची लक्षणे असलेल्या रुग्णांची आवश्यक तपासणी न करता उपचार करत आहेत. या तात्पुरत्या उपचारामुळे रुग्णाला 2-4 दिवस बरे वाटते, मात्र त्यानंतर त्याच्या शरीरातली ऑक्सिजन पातळी कमी होते व त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा अनेक रुग्णांचा आताच्या कालावधीत मृत्यू झालेला आहे. त्यामुळे याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सदर खाजगी रुग्णालये जबाबदार असल्याचे निदर्शनास येते.

त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे असलेला रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी आल्यास त्याला नजीकच्या आरोग्य केंद्रामधून रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यास सूचित करावे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगून या चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्याला घरातील इतर व्यक्तींपासून दूर राहण्याबाबत स्पष्टपणे कल्पना द्यावी, जेणेकरुन कुटूंबातील इतर व्यक्तींना संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर तसे न केल्यास भविष्यात होणार्‍या गंभीर परिणामांची संबंधितांना जाणीव करुन द्यावी.

रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला नजीकच्या कोव्हीड काळजी केंद्रा (कोव्हिड केअर सेंटर) मध्ये दाखल होण्याबाबत सूचित करावे. तेथे राहणे, भोजन व औषधोपचार सुविधा मोफत करण्यात आली आहे. लक्षणे नसलेले रुग्ण होम क्वारंटाईन असल्यास त्यांना दोन वेळा ऑक्सिजन तपासणी करण्याचे मार्गदर्शन करावे. यासाठी गावातील आशा स्वयंसेविकांकडे पल्स ऑक्सिमिटर देण्यात आले आहेत. तसेच 6 मिनिट वॉक टेस्ट करावी व त्यानंतरही ऑक्सिजन पातळी खाली गेल्यास त्वरीत रुग्णालयात दाखल होण्याच्या सुचना द्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.

लक्षणे असलेल्या व्यक्तींनी पहिल्याच दिवशी चाचणी केल्यास व उपचार सुरु केल्यास पुढे त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची गरजही कमी होते. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर चाचणी करण्याचा सल्ला देण्याचे पत्रकात म्हटले आहे.

Tuesday, April 20, 2021

21 एप्रिल पासून नवी नियमावली

दिनांक 21 एप्रिल 2021: कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे निर्बंध आज रात्री 8 वाजल्यापासून लागू करण्यात येणार आहेत. वेळेच्या निर्बंधांसह सुरु राहू शकणाऱ्या दुकानांची यादी पुढीलप्रमाणे असेल.

१) किराणा दुकाने- सकाळी 7.00 ते 11.00
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
३) भाजीपाला विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
४) फळे विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
५) अंडी,मटण, चिकन, मासे विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7.00 ते 11.00
७) पशूखाद्य विक्री- सकाळी 7.00 ते 11.00
८) बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने – सकाळी 7.00 ते 11.00
९) पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने – सकाळी 7.00 ते 11.00
१०) येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने –
सकाळी 7.00 ते 11.00
मात्र या सर्व दुकानांतून सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वा.पर्यंत कोविड नियमांचे पालन करून घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील.



या बाबींचे जनतेने पालन करावे.

* हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.

* धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.

* आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.

* भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.

* दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.

* टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.

* चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.

* दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.

* सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.

* कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.

* शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.

* स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.

* विवाह समारंभास बंदी राहील.

* चहाची टपरी,दुकाने पूर्णतः बंद राहतील.

* अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.

* सिनेमाहॉल,नाट्य गृह ,सभागृह,संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.

* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.

*सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.

* सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.

* व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.

* बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.


Friday, April 16, 2021

डहाणू: सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची धडक कारवाई


डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कोव्हीड प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग असलेल्या शासनाच्या ” ब्रेक द चेन ” आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई आरंभली आहे. काल आशिमा यांनी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक किराणा मालाचे दुकान व लग्नसमारंभात धाड टाकून कारवाई केली.


15 एप्रिल रोजी, सायंकाळी साडे आठच्या दरम्यान धुंदलवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील राजेश गणपत बसरा यांचे दुकान सायंकाळी आठ वाजतानंतर चालू होते व सामानाची विक्री देखील करण्यात येत होती. ही बाब आशिमा यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दुकानमालक बसरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन संबंधीत दुकान सील केले आहे.

अन्य घटनेमध्ये 15 एप्रिल रोजी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान बहारे – बामणवाडी (तालुका डहाणू) येथे रहात्या घरी, देवराम महादेव दांडेकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा व हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर ठिकाणी आशिमा मित्तल यांनी भेट दिली असता, अंदाजे 400 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. दांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दांडेकर हे उधवा आश्रम शाळेमध्ये शिक्षक आहेत. अशा जबाबदार पेशातील व्यक्तीने बेजबाबदारपणे वर्तन केल्यामुळे आशिमा यांनी गुरुजींची शाळा घेऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले. दांडेकर गुरुजींवर विभागीय कारवाई देखील होण्याची शक्यता आहे

Tuesday, April 13, 2021

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
दि. १३ एप्रिल २०२१


*दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज

*कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी

*कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

*एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार

*कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा

 कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे  ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

 राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.   

राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

*सर्व दुर्बल घटकांना दिलासा*

आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.

*एक महिना मोफत अन्नधान्य*

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य  देण्यात येईल.

*शिवभोजन थाळी मोफत*

राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

*निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य*

या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल. .

*बांधकाम कामगारांना अनुदान*

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

*फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य*

राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.

*आदिवासी कुटुंबांना सहाय्य*

आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

*कोविडवरील सुविधा उभारणी*

याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

 याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.🔴

अखेर दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली; मे-जुनमध्ये होणार परीक्षा


 राज्यातील करोना संसर्गाची स्थिती पाहता दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर व्हिडीओद्वारे ही माहिती दिली आहे. आता बारावीची परीक्षा मे अखेरीस तर दहावीची परीक्षा जुनमध्ये घेण्याचे नियोजित आहे.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील. त्याअनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.