Tuesday, June 9, 2020

डहाणू शहरात पुन्हा सर्व दुकाने उघडणार! सम आणि विषम तारखांच्या निर्णयातून माघार

 
डहाणू दि. 9: काल पासून डहाणू नगरपरिषद क्षेत्रात रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेला व दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखेला उघडी ठेवण्याचा सुरु केलेला फॉर्म्युला, आजपासून मागे घेण्यात आला आहे. हा फॉर्म्युला केवळ पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू असून डहाणू शहरासाठी या आधीच्या आदेशाप्रमाणे अनुज्ञेय असलेली दुकाने सुरु राहतील. काल नगरपालिका प्रशासनाची अन्वयार्थ लावण्यात चूक झाल्याने सम विषम फॉर्म्युलाची अंमलबजावणी सुरु झाली होती. ही चूक निदर्शनास आल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला.

डहाणू तालुक्यातील एका दिवसांत 15 कोरोना पॉझिटीव्ह


दि. 8 जून: डहाणू तालुक्यातील 15 जणांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे. त्यातील 2 जण हे कासा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत. 1 महिला कॉन्स्टेबलसह 2 कर्मचारी डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आहेत. हे दोन्ही कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह पोलीस सहकाऱ्यापासून संसर्गित झाले आहेत. 7 जण एकाच कोरोना पॉझिटीव्ह पोलीसाच्या कुटूंबातील आहेत. अन्य कोरोना पॉझिटीव्ह पोलीसाची 7 वर्षीय मुलगी व एका पॉझिटीव्ह पोलीसाचा भाऊ यांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. एक जण कोरोना संसर्गित रुग्णाच्या संपर्कात आलेला व 1 जण मुंबईतून प्रवास केलेला आहे.
आजच्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमुळे प्रतिबंधीत जाहीर होऊ शकणारी क्षेत्रे पुढीलप्रमाणे:- रामवाडी, सोनापूर (डहाणू), नरपड, मसोली, हळदपाडा, छत्री कंपाऊंड, मांगेलवाडी


पॉझिटीव्ह पोलीसांपासून 2 पोलीस व 9 कुटूंबीय सदस्य संसर्गित आणि तरीही होम कॉरंटाईनचा शिक्का असलेले पोलीस ड्यूटीवर! पोलीस आणि जनतेच्या जीवाशी खेळ!
एकीकडे डहाणू पोलीस स्टेशनच्या कोरोना पॉझिटीव्ह पोलीसांमुळे 7 वर्षीय मुलीसह 11 सहकारी व कुटूंबीयांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असताना डहाणू पोलीस त्यापासून धडा घेताना दिसत नाहीत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संसर्गात आल्याने होम क्वारन्टाईन केलेले उप विभागीय अधिकारी मंदार धर्माधिकारी वगळता पोलीस सर्वच होम क्वारन्टाईनचा शिक्का असलेले पोलीस ड्यूटीवर तैनात असलेले आढळले. आज (8 जून) सायंकाळी डहाणू पारनाका येथे भेट दिली असता तेथील तैनात पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर होम क्वारन्टाईनचा शिक्का आढळला. ह्याबाबत उप विभागीय अधिकारी धर्माधिकारी व पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांना अवगत केले असता त्यांनी त्वरित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास कळवित असल्याचे सांगितले. निवासी उप जिल्हाधिकारी किरण महाजन यांना कळविले असता त्यांनी याबाबत अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या निदर्शनास आणतो असे सांगितले. पोलीस, त्यांचे कुटूंबीय व जनतेच्या जीवाशी खेळण्याच्या ह्या प्रकाराकडे किती गांभीर्याने घेतले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Monday, June 8, 2020

जव्हारमध्ये तिसरा कोरोना पॉझिटीव्ह


 जव्हार तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या आता 3 झाली आहे. भांडूप (मुंबई) येथून 19 वर्षीय युवक जव्हारमधील नातेवाईकांकडे आला होता. रेड झोनमधून आल्याने इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन करुन त्याच्या घशाचे नमुने घेतले असता, तो पॉझिटीव्ह आढळून आला आहे.

त्या आधी जव्हारमधील सर्वात पहिला कोरोना रुग्ण एक 29 वर्षीय महिला (गोरवाडी) ठरली होती. ही महिला भिवंडी येथील माहेरी जाऊन आली होती. तीचा भाऊ मुंबईतील बेस्टच्या सेवेत चालक आहे. त्यानंतर ठाणे कारागृहातील अटकेतून पॅरोलवर सुटलेल्या व जव्हार तालुक्यात (ऐने) परतलेल्या 30 वर्षीय कैद्याचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह निघाला होता.

Tuesday, June 2, 2020

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महावितरण सज्ज ; 3 व 4 जून रोजी वीज पुरवठा खंडीत होणे शक्य! - अधीक्षक अभियंता किरण नागावकर


दि. 2 जून: निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे खांब व तारा यांना हानी पोहोचून 3 व 4 जून रोजी पालघर जिल्ह्यातील वीजपुरवठा दीर्घ कालावधीसाठी खंडीत होऊ शकतो. वीजपुरवठा पूर्वरत करण्यास अधिक वेळ जाऊ शकतो. असे असले तरी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची टीम हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असून लोकांनी पॅनिक होऊन दुरध्वनीद्वारे वारंवार विचारणा करुन मनोबल खच्ची करु नये व सहकार्य द्यावे असे आवाहन महावितरणच्या अधिक्षक अभियंता किरण नागावकर यांनी केले आहे. रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था करुन ठेवावी अशी सूचनादेखील नागावकर यांनी केली आहे.

महावितरणची आखणी:
हवेचा वेग बघून, अति उच्च दाब वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडीत होईल. आणि विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास खालील प्रमाणे प्राधान्य देण्यात येईल.

  1. अती-उच्च दाब वाहिन्या सर्व प्रथम चालू केल्या जातील.
  2. त्यानंतर उपकेंद्रे चालू केली जातील.
  3. त्यानंतर टप्प्या टप्प्या ने उच्च दाब वाहिन्या (11 kV ) सुरू होतील. साहजिकच या वाहिन्या सर्व शहरातून फिरलेल्या असल्यामुळे, त्या दुरुस्ती करून, झाडे काढून, संरक्षित करून चालू केल्या जातील.
  4. उच्च दाब वाहिन्या सुरू करताना सर्व प्रथम प्राधान्य पाणीपुरवठा योजना /दवाखाने असणाऱ्या वाहिन्यांना देण्यात येईल.
  5. त्यानंतर लघुदाब वाहिन्या टप्प्या टप्प्या ने सुरू करण्यात येतील.
    विद्युत पुरवठा वाहिन्यांना झालेल्या नुकसानावर अवलंबून असेल. वरील सर्वं कामे एकत्रितपणे सर्व भागात करण्यात येतील. त्यामुळे काही भागात लवकर, तर काही ठिकाणी उशिराने वीज पुरवठा सुरळीत होईल.

निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज

दि. 2 जून: निसर्ग चक्रीवादळाचा धोका ज्या गावांना होण्याची शक्यता आहे अश्या गावातील लोकांसाठी निवारा छावण्यांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियंत्रण कशाची स्थापना करण्यात आली आहे. NDRF च्या टिम जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या असुन, निसर्ग चक्रीवादळाशी सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दिनांक 01 ते 04 जुन 2020 या कालावधीत पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे.सदर कालावधीत वाऱ्याचा वेग खुप जास्त असुन मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

दिनांक 03 जुन 2020 रोजी आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.


आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ उंचीवरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.

घराच्या अवतीभवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे.

सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे ठेवावे. आपला जिव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.


मदत आवश्यक असल्यास नागरिकांनी पुढे नमुद केलेल्या नियंत्रण कक्षाच्या नंबरवर संपर्क साधावा.
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, पालघर – 02525297474,
वसई विरार महानगरपालिका – 02502529885,
पालघर तहसिल नियंत्रण कक्ष – 02525254930,
डहाणू तहसिल नियंत्रण कक्ष-02528-221182,
तलासरी तहसिल नियंत्रण कक्ष – 02521220018 / 9637692102/ 9637692127,
वसई तहसिल नियंत्रण कक्ष – 02502322007,
मोखाडा तहसिल नियंत्रण कक्ष – 2520222426 /7769901260,
विक्रमगड तहसिल नियंत्रण कक्ष – 02520240925,
जव्हार तहसिल नियंत्रण कक्ष – 02520222426 / 77769901260,
वाडा तहसिल नियंत्रण कक्ष – 02526271431
नागरिकांच्या मदतीसाठी NDRF च्या टिम जिल्ह्यामध्ये नियुक्तकरण्यात आल्या असुन, नागरिकांनी त्यांच्या सुचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य करावे.