Tuesday, June 9, 2020

समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांचा माहिती

समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी झाला. जन्म गुरुवारी म्हणजे बिस्युतवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव ‘बिरसाʼ ठेवण्यात आले. बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे बिरसांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिरसांची आत्या दासकीर हिच्या आयुभातु या गावी गेले. बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते.
बिरसांना शिक्षणाची आवड होती. पुढे बिरसांचे मोठे भाऊ कानु यांनी त्यांना जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये दाखल केले (१८८६). तत्पूर्वी शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी भाषणामध्ये मुंडा आदिवासींबद्दल ठग, चोर, बेइमान इत्यादी शब्दांचा वापर केला. तेव्हा बिरसा यांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे बिरसांना शाळेतून काढण्यात आले (१८९०).
पुढे त्यांनी शिक्षणासाठी अंगीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याग केला. उदरनिर्वाहासाठी ते बांदगाव येथे वास्तव्यास होते (१८९०–९४). त्यांचा विवाह हिरीबाई नामक मुलीशी झाला; परंतु अल्प काळातच तिचे निधन झाले. शिक्षण घेत असताना मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये, धर्मामध्ये परिवर्तन व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चांगली तत्त्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट (Birsaites) धर्माची स्थापना करून त्यांनी लोकसंघटन केले, तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली. त्यामुळे ते भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले.
१८५७ च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासींच्या शेतजमिनी हिरावून घेतल्या होत्या. त्या परत मिळविण्यासाठी मुंडांचे प्रमुख ज्यांना ‘सरदारʼ म्हटले जात, त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. तो ‘सरदारी लढाईʼ म्हणून प्रसिद्ध झाला. या आंदोलनात्मक लढाईचा बिरसांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता. त्यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळीला सुरुवात केली. त्यामुळे अनेक मुंडा आदिवासींनी बिरसांबरोबर सरदार आंदोलनात सहभाग घेतला. बिरसांनी चालविलेले व्यापक आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी दोन नियम-अटी लागू केले : (१) गावागावांत जेवढ्या आदिवासींच्या जमिनी आहेत, त्यांवर सरकारी वन-अधिकाऱ्यांचा अधिकार आहे. या नियमामुळे मुंडा लोकांचा जगण्याचा अधिकार हिरावला जाऊन समाजाचे नुकसान होणार होते. (२) इंग्रजांनी अनेक ठेकेदारांना दारूचे अड्डे चालविण्यासाठी परवाने दिले. अशिक्षित मुंडा आदिवासी नेहमी दारूच्या नशेत राहावा, त्यामुळे ते आंदोलनापासून अलिप्त राहतील, असा त्यांचा हेतू होता. बिरसांनी या नियमांना विरोध करत इंग्रजांविरुद्ध आवाज उठविला. आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
१८९४ मध्ये आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. इंग्रजांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. उलट, इंग्रजांनी आदिवासींकडून जमीन महसूल ठरावीक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली. त्यामुळे अनेक आदिवासींना आपल्या जमिनी सावकार व जमीनदार यांच्याकडे गहाण ठेवाव्या लागल्या. भरमसाठ व्याजदरांमुळे तारण जमिनी सोडवून घेणे आदिवासींना अशक्य बनले. जमीनमालकी असणारा आदिवासी भूमिहीन व वेठबिगार बनला. त्यामुळे बिरसांनी इंग्रजांविरुद्ध आदिवासी तरुण बांधवांचे संघटन केले. समाजबांधवांनी एकत्र येऊन धोकेबाज इंग्रजांना यमसदनी पाठवावे, त्यामुळे आपले राज्य येईल, असे बिरसा सांगत. त्यांच्या शब्दांमुळे अनेक मुंडांनी ठेकेदार व इंग्रजांच्या कामास जाणे बंद केले. इंग्रजांपेक्षा आपण बलाढ्य आहोत, असे सांगून ते समाजामध्ये नवचेतना निर्माण करीत. बिरसांनी स्वराज्याची घोषणा करून इंग्रज शासनापुढे सशक्त आव्हान निर्माण केले. त्यामुळे इंग्रज शासनाने बिरसांना बंदी करण्याचे ठरविले. ब्रिटिशांनी बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडले (२६ ऑगस्ट १८९५). बिरसांच्या अटकेमुळे पुन्हा आदिवासी समाजात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. अखेर ३० नोव्हेंबर १८९७ रोजी बिरसांची सुटका झाली.
कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. गावोगावी गुप्त बैठका घेऊन मुंडाराज्य स्थापन करण्याच्या शपथा घेण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे ५,००० आदिवासी सामील झाले. बिरसांनी कायद्याची लढाई सोडून २५ डिसेंबर १८९९ पासून इंग्रज अधिकारी, इंग्रजधार्जिणे ठेकेदार, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. सिंगभूम, चक्रधरपूर, रांची, खुंटी, कोरा, तामाड या प्रदेशांतील पोलीसचौक्या जाळण्यात आल्या.

उलगुलानचा बुलंद नारा देणारे धरणीचे आबा जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 120 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

*तुम्हारी जमीन धुल मिट्टी की तरह आंधी मे उड चुकी है, तुम्हारा आत्मविश्वास तुम्हारे आत्मसन्मान के साथ खो चुका है,अगर तुम उसे पुनर्रजागृत नही करते हो तो आनेवाले समय मे तमाम आदिवासीयोको अस्तित्व ही खत्म हो जायेगा..! इसलिए पढो बढो और लढो..! उलगुलानचा बुलंद नारा देणारे धरणीचे आबा जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 120 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!✍️*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
1.
2.

3.
4.
5.
6.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर हालचाली करूनये प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय नियम पाळण्याबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

पालघर दि 8 : पालघर जिल्ह्यामध्ये मागील दोन आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड -19 विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले असून या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिबंधत क्षेत्र आणि इतर विषयावर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सुर्यवंशी, आदी उपस्थित होते. 
प्रतिबंधित क्षेत्राबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्राबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार असून, जिल्हा आरोग्य अधिकारी हे या क्षेत्रामध्ये Active Surveillance करण्यासाठी शिक्षक, स्वयंसेवक यांची मदत घेण्यात येणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभाग NCC, NSS ची मदत घेणार असून अत्यावश्यक सेवा विषयक इतर कोणतीही हालचाली या क्षेत्रात होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर हालचाली न करणेबाबत (No Movement) नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
कोरोना विषाणूचा संपर्क झालेल्या रुग्णांना जर इतर जोखमीचे आजार (Co Morbidity) अशा रुग्णांना DCHC मध्ये दाखल करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ शिंदे यांनी संबंधितांना दिल्या.
Mission Begin Again अंतर्गत ग्रामीण भागातील बहुतेक उद्योग , आस्थापना सुरु झाल्या आहेत या सर्व ठिकाणी मास्कचा वापर, हॅण्ड वॉश स्टेशन, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आणि आरोग्य सेतूचा अँपचा वापर करणे बंधनकारक आहे. याबाबत सर्वस्तरावर मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले. 
पालघर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच आश्रमशाळा सुरु करणे याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी मुख्यालयात उपस्थित असलेल्या शिक्षकांचा आढावा घ्यावा, विद्यार्थ्यांना  पाठ्यपुस्तकांचे वाटप वेळेत करावे. टप्पानिहाय शाळा सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे . विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे . सर्व शाळांचे व आवारांचे निर्जंतुकीकरण करणेबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. शाळा सुरु झाल्यांनतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरिता Thermal Scanner उपलब्ध करुन घेणे, Hand Wash Station तयार करणेबाबत इत्यादी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळा सुरु झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर, मास्क वापर करण्याविषयी शाळाना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

वेबिनार कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी संवाद साधणार जिल्हाधिकारी डॉ . कैलास शिंदे

पालघर दि 8 : पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-19 विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेबिनार कार्यक्रमाच्या माध्यमातून दिनांक 10 जून 2020 व दिनांक 11 जून 2020 रोजी सकाळी 11 ते 1 वाजता एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी संवाद साधणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या असून त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील पिक कर्जवाटप, पिक विमा, मनरेगा, कोरोना प्रादुर्भाव व्यवस्थापन, अन्नधान्य वाटप व शैक्षणिक वर्षाकरीता शाळा सुरु करणेबाबत योजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला निर्देश देण्याकरिता आरोग्य अधिकारी, बालविकास अधिकारी, ग्रामपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहायक, बँकेचे अधिकारी, विकास सेवा संस्थेचे सचिव/चेअरमन, तलाठी, मुख्याधापक, पोलिस पाटील, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, जल सुरक्षक, वनरक्षक, प्रत्येक ग्रामपंचायत मधील पाच शेतकरी गटातील गट प्रमुख यांचेशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
वरील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचारी हे वेबिनार कार्यक्रमाच्या दिवशी विहीत वेळेत गावपातळीवर उपस्थित राहावे या वेळी उपस्थितांनी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर (Social Distancing) याचा वापर करणे बंधनकारक राहील. या व्यतिरीक्त स्थानिक लोकप्रतिनीधी व इतर नागरीक सदर कार्यक्रमा मध्ये सहभाग घेवू इच्छित असल्यास त्यांनी सामाजिक अंतर पाळून कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत चिकू पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

पालघर दि 8 : पालघर जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना चिकू हि योजना पिकांसाठी राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
सन 2016 च्या खरीप हंगामापासून चिकू या फळपिकासाठी हवामानावर आधारीत फळ पिकविमा राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. फळपिकांना प्रतिकुल हवामान घटकांपासून विमा संरक्षण देणे आवश्यक असल्याने सन 2020 मध्ये मृगबहाराकरीता फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन चिकू पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असेहि आवाहन जिल्हा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
कमी/जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य मिळणार, फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थीतीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात मदत मिळते. चिकू फळपिक समाविष्ट हवामान धोके व पिक संरक्षण कालावधीत जादा आर्द्रता 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत असते, शेतकऱ्याने भरावयाच्या फळपिक विमा हप्ता दर खालील प्रमाणे आहे विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम . यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रुपये 3000/- विमा हप्ता भरावा लागेल. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 30 जून 2020 आहे. पालघर, वसई, डहाणू , तलासरी, विक्रमगड, वाडा हे तालुके योजनेत समाविष्ट आहेत.
चिकू पिकासाठी हवामान धोके प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर) दि. 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग 5 दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहील्यास व प्रति दिन 20 मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग 4 दिवस झाल्यास रु. 27000/- देय राहिल. तसेच या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग 10 दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन 20 मि . मि . किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग 8 दिवस झाल्यास रु . 60000/- देय राहिल. असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
सदर चिकू फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव पत्रक भरुन रोख विमा हप्त्यासह आपले खाते असणाऱ्या बँक शाखेत मुदतीत जमा करावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा, तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा . असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.