Thursday, June 11, 2020
बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी!
पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे.

पुणे : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नोकरीकरीता बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून जिल्ह्यात सुमारे अडीच हजाराहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे जिल्ह्यातून इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत जिल्ह्यातील विविध उद्योजकांकडे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, पेंटर, शीटमेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, कारपेंटर, ग्राइंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रोग्रॅमर, बीडीई, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनिअर, अकाउंटंट, टीग वेल्डर या पदांसाठी आवश्यक पात्रताधारक तसेच, इयत्ता सातवी ते नववी, दहावी, बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी एकूण अडीच हजार पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध करुन दिली आहेत.
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगइन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदासाठी आपला पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने नोंदवावेत. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी.
उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक आणि वेळ एसएमएस अलर्टद्वारे कळविण्यात येईल. ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. इच्छुक युवक युवतींनी 22 जूनपर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
Wednesday, June 10, 2020
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी 31 जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्या मिळणार लाभ पीक विमा 2020
पीक विमा योजनेत कोणत्या कारणांसाठी नुकसानभरपाई मिळते?
पीक विमा योजनेतंर्गत गारपीट, जमिन धसने,पाणी साचणे, ढगफुटी व नैसर्गिक आगीमुळे होणाऱ्या शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिले जाते. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यावर केन्द्र सरकाराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी फेब्रुवारी2016 मध्ये अत्यंत महत्वकांक्षी 'पंतप्रधान पीक विमा योजना ' सुरू केली.
पीक विमा योजनेमध्ये(PMFBY) कशी नुकसानभरपाई मिळते?
पेरणीच्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीएमएफबीवायचा अर्ज भरावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल, तरच विमा रकमेचा लाभ मिळतो. पेरणीपासून तर काढणी दरम्यान उभ्या पिकांचे जर नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भावमुळे नुकसान झाले असेल
तर या विम्याचा लाभ मिळतो. तसेच उभ्या पिकाचे जर स्थानिक आपत्ती,गारपीट,दरड कोसळणे, ढग फुटी, वीज पडल्यामुळे नुकसान झाले तर याचा लाभ मिळतो, तसेच पीक काढल्यानंतर पुढील 14 दिवसापर्यंत शेतात सुकवण्यास ठेवलेल्या पिकांवर जर अवेळी मौसमी चक्रीवादळ, गारा व वादळाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई दिली जाते. तसेच प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकांची पेरणी झाली नसेल तर देखील या विम्यापासून लाभ मिळतो.
किती प्रिमीयम भरावा लागतो?
खरीप पिकांसाठी प्रत्येकी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी प्रत्येकी 1.5% प्रिमियम भरावा लागतो. पीएमएफबीवाय योजनेचा व्यावसायिक आणि बागाईत पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना 5% प्रीमियम भरावा लागतो.
लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागतात?
शेतकऱ्यांना एक फोटो, ओळखपत्र, निवासाचा पत्ता म्हणून पुरावा, 7/12 उतारा, शेतातील पुरावा द्यावा लागतो. दाव्यासाठी शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर किंवा विमा कंपनी व कृषी विभागाच्या संपर्क साधू शकतात. यात 72 तासाचा कालावधी निश्चित केला आहे. नुकसान झाल्यास शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.