Showing posts with label Weather. Show all posts
Showing posts with label Weather. Show all posts

Tuesday, September 28, 2021

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता


 
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांचे आवाहन

पालघर दि. २८  : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ)  निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत  कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने  जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांनी केले आहे.

याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे,  अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, व तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

तालुका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत. 

Dahanu 9607744258
Vikamgad 8806898565
Jawhar 8552918405
Mokshada 8446335908
Wada 02526271431
Talasari 02521220036
Vasai 02502322007
Palghar 02525254930

Monday, June 7, 2021

पालघर जिल्ह्यात 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा


मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणार्‍या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणार्‍या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, बहृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महापालिकांचे आयुक्त, कोकण विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधिक्षक, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

  • पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी!
    या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणार्‍या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

दरडग्रस्त भागातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे!
दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशा सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे.

  • अनपेक्षिरित्या घडणार्‍या गोष्टी गृहित धरुन तयारी करा!
    अतिवृष्टीच्या काळात काही नैसर्गिक गोष्टी घडणे अपेक्षित असते तर काही गोष्टी या अनपेक्षितपणे घडतात. आपण अपेक्षित गोष्टी गृहित धरून तयारी करतो परंतू ज्या अनपेक्षित गोष्टी घडू शकतात त्या गृहित धरून प्रशासनाने त्याचीही तयारी करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या काळात मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.
  • रुग्णसेवेत अडथळा नको!
    अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजनचा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
  • पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष नको!
    कोविड काळात कोविड आणि पावसाळी आजार एकत्र आले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते याकडे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले तसेच पावसाळी आजार उद्भवू शकणार्‍या परिस्थितीवर विशेषत: मलेरियावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
  • पाणी साचणारी ठिकाणे लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात!
    मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणार्‍या स्थळांचा शोध घ्यावा, पंपींग स्टेशन्स आणि झडपा यांची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी, यातील अडथळे दूर करावेत, लो लाईन एरियात विशेष काळजी घ्यावी, गरज पडल्यास या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात, धोकादायक इमारतींमधील नागरिकांना धोक्याची कल्पना देऊन संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरीत होण्यास सांगावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Monday, August 31, 2020

डहाणू व पालघर तालुक्याने 100% सरासरी ओलांडली आणि जिल्ह्यात 89.4% पाऊस!

पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 216 सेमी पाऊस पडला असून तो सरासरीच्या 89.4% इतका आहे. संपूर्ण पावसाळ्याचा जिल्ह्यात सरासरी 242 सेमी पाऊस पडतो. 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 196.5 सेमी सरासरी पाऊस पडतो. त्या तुलनेत 110% पाऊस पडला आहे. डहाणू व पालघर तालुक्याने मात्र एकूण पावसाळ्याची 100% सरासरी ओलांडली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (मागील 24 तासांत पाऊस)[आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस] सरासरी % :
 • वसई – (5.3 सेमी) [231.6 सेमी] 85.7%
 • वाडा – (4.7 सेमी) [203.7 सेमी] 78.1 %
 • डहाणू – (6.5 सेमी) [203.7 सेमी] 107.2%
 • पालघर – (7.7 सेमी) [249 सेमी] 102.4%
 • जव्हार – (5.1 सेमी) [205.4 सेमी] 75.8%
 • मोखाडा – (3.3 सेमी) [156.2 सेमी] 68.9%
 • तलासरी – (11.7 सेमी) [204.1 सेमी] 95.7%
 • विक्रमगड – (5.4 सेमी) [210.5 सेमी] 81.8%

Thursday, August 27, 2020

डहाणू तालुक्यात सरासरीच्या 97% पाऊस – मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 65% पाऊस

 दि. 26 ऑगस्ट: डहाणू तालुक्यात सरासरीच्या 96.9% इतका पाऊस पडला असून मोखाडा तालुक्यात मात्र सरासरीच्या अवघा 64.9% पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांची सरासरी पुढीलप्रमाणे: पालघर तालुका – 94.8%, तलासरी तालुका – 82.6%, वसई तालुका 79.9%, विक्रमगड तालुका 75%, वाडा तालुका 72.2, जव्हार तालुका 70.7%

Wednesday, August 5, 2020

5 व 6 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्हयात 5 व 6 ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यसह मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. ही शक्यता विचारात घेऊन पालघर जिल्हयातील नागरिकांनी ह्या कालावधीत अनावश्यक प्रवास करणे, नदी, नाला, ओढा, धबधबा व समुद्र किनारी जाणे टाळावे. तसेच मच्छिमारांनी या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये व जिल्हयातील नागरिकांनी मुसळधार पावसाची शक्यता विचारात घेता, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले 

Tuesday, June 9, 2020

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत चिकू पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

पालघर दि 8 : पालघर जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना चिकू हि योजना पिकांसाठी राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
सन 2016 च्या खरीप हंगामापासून चिकू या फळपिकासाठी हवामानावर आधारीत फळ पिकविमा राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. फळपिकांना प्रतिकुल हवामान घटकांपासून विमा संरक्षण देणे आवश्यक असल्याने सन 2020 मध्ये मृगबहाराकरीता फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. तरी सदर योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन चिकू पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असेहि आवाहन जिल्हा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
कमी/जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य मिळणार, फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थीतीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात मदत मिळते. चिकू फळपिक समाविष्ट हवामान धोके व पिक संरक्षण कालावधीत जादा आर्द्रता 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत असते, शेतकऱ्याने भरावयाच्या फळपिक विमा हप्ता दर खालील प्रमाणे आहे विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम . यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रुपये 3000/- विमा हप्ता भरावा लागेल. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 30 जून 2020 आहे. पालघर, वसई, डहाणू , तलासरी, विक्रमगड, वाडा हे तालुके योजनेत समाविष्ट आहेत.
चिकू पिकासाठी हवामान धोके प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टर) दि. 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग 5 दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहील्यास व प्रति दिन 20 मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग 4 दिवस झाल्यास रु. 27000/- देय राहिल. तसेच या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग 10 दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन 20 मि . मि . किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग 8 दिवस झाल्यास रु . 60000/- देय राहिल. असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
सदर चिकू फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव पत्रक भरुन रोख विमा हप्त्यासह आपले खाते असणाऱ्या बँक शाखेत मुदतीत जमा करावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा, तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा . असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

Tuesday, June 2, 2020

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महावितरण सज्ज ; 3 व 4 जून रोजी वीज पुरवठा खंडीत होणे शक्य! - अधीक्षक अभियंता किरण नागावकर


दि. 2 जून: निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे खांब व तारा यांना हानी पोहोचून 3 व 4 जून रोजी पालघर जिल्ह्यातील वीजपुरवठा दीर्घ कालावधीसाठी खंडीत होऊ शकतो. वीजपुरवठा पूर्वरत करण्यास अधिक वेळ जाऊ शकतो. असे असले तरी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची टीम हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असून लोकांनी पॅनिक होऊन दुरध्वनीद्वारे वारंवार विचारणा करुन मनोबल खच्ची करु नये व सहकार्य द्यावे असे आवाहन महावितरणच्या अधिक्षक अभियंता किरण नागावकर यांनी केले आहे. रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था करुन ठेवावी अशी सूचनादेखील नागावकर यांनी केली आहे.

महावितरणची आखणी:
हवेचा वेग बघून, अति उच्च दाब वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडीत होईल. आणि विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास खालील प्रमाणे प्राधान्य देण्यात येईल.

  1. अती-उच्च दाब वाहिन्या सर्व प्रथम चालू केल्या जातील.
  2. त्यानंतर उपकेंद्रे चालू केली जातील.
  3. त्यानंतर टप्प्या टप्प्या ने उच्च दाब वाहिन्या (11 kV ) सुरू होतील. साहजिकच या वाहिन्या सर्व शहरातून फिरलेल्या असल्यामुळे, त्या दुरुस्ती करून, झाडे काढून, संरक्षित करून चालू केल्या जातील.
  4. उच्च दाब वाहिन्या सुरू करताना सर्व प्रथम प्राधान्य पाणीपुरवठा योजना /दवाखाने असणाऱ्या वाहिन्यांना देण्यात येईल.
  5. त्यानंतर लघुदाब वाहिन्या टप्प्या टप्प्या ने सुरू करण्यात येतील.
    विद्युत पुरवठा वाहिन्यांना झालेल्या नुकसानावर अवलंबून असेल. वरील सर्वं कामे एकत्रितपणे सर्व भागात करण्यात येतील. त्यामुळे काही भागात लवकर, तर काही ठिकाणी उशिराने वीज पुरवठा सुरळीत होईल.

निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज

दि. 2 जून: निसर्ग चक्रीवादळाचा धोका ज्या गावांना होण्याची शक्यता आहे अश्या गावातील लोकांसाठी निवारा छावण्यांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियंत्रण कशाची स्थापना करण्यात आली आहे. NDRF च्या टिम जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या असुन, निसर्ग चक्रीवादळाशी सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दिनांक 01 ते 04 जुन 2020 या कालावधीत पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे.सदर कालावधीत वाऱ्याचा वेग खुप जास्त असुन मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

दिनांक 03 जुन 2020 रोजी आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.


आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ उंचीवरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.

घराच्या अवतीभवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे.

सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे ठेवावे. आपला जिव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.


मदत आवश्यक असल्यास नागरिकांनी पुढे नमुद केलेल्या नियंत्रण कक्षाच्या नंबरवर संपर्क साधावा.
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, पालघर – 02525297474,
वसई विरार महानगरपालिका – 02502529885,
पालघर तहसिल नियंत्रण कक्ष – 02525254930,
डहाणू तहसिल नियंत्रण कक्ष-02528-221182,
तलासरी तहसिल नियंत्रण कक्ष – 02521220018 / 9637692102/ 9637692127,
वसई तहसिल नियंत्रण कक्ष – 02502322007,
मोखाडा तहसिल नियंत्रण कक्ष – 2520222426 /7769901260,
विक्रमगड तहसिल नियंत्रण कक्ष – 02520240925,
जव्हार तहसिल नियंत्रण कक्ष – 02520222426 / 77769901260,
वाडा तहसिल नियंत्रण कक्ष – 02526271431
नागरिकांच्या मदतीसाठी NDRF च्या टिम जिल्ह्यामध्ये नियुक्तकरण्यात आल्या असुन, नागरिकांनी त्यांच्या सुचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य करावे.

पालघर जिल्ह्यातील 22 गावांना धोक्याचा इशारा

दि. 3: पालघर जिल्ह्यातील 22 गावांना संभाव्य चक्रीवादळापासून हानी पोहोचू शकते असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. धोक्याचा इशारा देण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे आहेत. डहाणू :डहाणू, नरपड, आंबेवाडी, चिखले ; तलासरी : झाई ; पालघर : सातपाटी, जलसार, मुरबे, उच्छेळी, दांडी ; वसई : चांदिप, पाचूबंदर, सायवन, कामण, ससूनवघर, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोळी, भईगाव बुद्रूक.

पालघर जिल्ह्यात चक्रीवादळाच्या शक्यतेने 3 जून रोजी कारखाने / दुकाने बंद

 पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर 3 जून रोजी चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील वसई, पालघर व डहाणू तालुक्यातील सर्व उद्योग, खाजगी कार्यालये, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. ह्या 1 दिवसांच्या शट डाऊनमध्ये कुठलेही सांडपाणी अथवा वायू उत्सर्जन करु नये असे आदेशात नमूद करण्यासाठी आले आहे. अत्यावश्यक सेवा व दुकाने मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत.

निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज


एनडीआरएफ तुकड्याही तैनात

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत व्हिसीद्वारे बैठक

मुंबई, दि १ : निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Maha Info Corona Website

आज गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील  झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध  

मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोविडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.   

 एनडीआरएफएसडीआरएफ तैनात  

या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत या व्हीसीसाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर तसेच इतर सचिव उपस्थित होते. 

Thursday, May 28, 2020

पिकांचे नुकसान करणाऱ्या टोळधाडी पासून शेतकरी बांधवानी सावध राहावे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

पालघर दि. 28 : गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेश राज्यात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या कीडीचे थवे ताशी 12 ते 16 किमी इतक्या वेगाने उडतात. ही टोळधाड दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका निर्माण होऊ शकतो. ही कीड तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदिंचा फडशा पाडत असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वरील राज्यांच्या सिमेलगत पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणु व जव्हार तालुक्यांना टोळधाडीच्या प्रादुर्भावाबाबत शेतकरी बांधवानी सावध राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
या किडीपासून नुकसान टाळण्याच्या दृष्टीने प्रादुर्भावापुर्वीच खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषि विद्यापीठाकडून तांत्रिक माहिती प्राप्त झालेली आहे. सदर माहिती अन्वये नियंत्रणाबाबत कार्यवाही व्हावी व शेतकऱ्यांमध्ये टोळधाड नियंत्रणाबाबत जनजागृती व्हावी व कीडीपासून होणारे आर्थिक नुकसान टाळावे म्हणून शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून किडीने आपल्या शेतात प्रवेश करु नये याकरीता वाळवंटी टोळ सर्वेक्षण संस्था यांनी वेगवेगळया उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले. 
शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना- 
• शेतकऱ्यांचे गट बनवून रात्री शेतात देखरेख व पाहाणी करावी. संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीत हे किटक लाखोंच्या संख्यने विश्रांतीसाठी शेतात उतरू शकतात. 
• शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदणे, तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करावा. 
 • संध्याकाळी/ रात्रीच्या वेळी झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते. 
• प्रतिबाधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारीत किटकनाशक आझाडिरेक्टीन 1500 पिपिएम 30 मि.ली. किंवा 5 ऽ निंबोळी अर्काची प्रती 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
• आमिषाचा वापर 20 किलो गहू किंवा भाताच्या तूसामध्ये फिप्रोनिल 5 एससी, 3 मि.ली. मिसळावे व त्याचे ढिग शेतात ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व सदर आमिषामूळे हि किड मरण पावते. 
• टोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस 20 ईसी 24 मि.ली किंवा क्लोरपायरीफॉस 50 ईसी 10 मि.ली किंवा डेल्टा मिथ्रिन 2.8 ईसी 10 मि.ली किंवा फिप्रोनील 5 एससी 2.5 मि.ली किंवा ल्यांब्डा सायहेलोथ्रिल 5 ईसी 10 मि.ली किंवा मॅल्याथिऑन 50 ईसी 37 मि.ली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
• फवारणी शक्यतोवर रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. अशावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपावर जमा झालेले असतात. त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळणे शक्य होते. असेही जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले.
टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास संबंधित कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी तसेच कृषि विदयापीठ/कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा.असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकरी,काशिनाथ तरकसे, यांनी आवाहन केले आहे.

Wednesday, May 6, 2020

यंदा पावसाळ्यातील २० दिवस महत्त्वाचे!


करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा मग्न असतानाच आता महिन्याभरावर पाऊस येऊन ठेपला आहे.


करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा मग्न असतानाच आता महिन्याभरावर पाऊस येऊन ठेपला आहे. पाऊस लहरी असला तरी काही ठोकताळ्यांच्या आधारे पावसापासून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून सावध राहता येते. समुद्राच्या उधाण भरतीच्या दिवशी अतिवृष्टी झाल्यास तर मुंबई परिसरात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी येत्या पावसाळ्यातील समुद्राच्या उधाण भरतीचे दिवस, वेळा आणि त्यादिवशीच्या भरतीच्या पाण्याची उंची जाहीर केली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच सर्वसामान्यांनाही त्याचा उपयोग होतो. यंदा जून आणि जुलै महिन्यात प्रत्येक आठ तर ऑगस्ट महिन्यात चार असे पावसाळ्यात एकूण २० दिवस समुद्राला उधाण भरती असून यादिवशी भरतीच्या पाण्याची उंची ४.५ मीटरपेक्षा अधिक असणार आहे.

दिवस वेळ पाण्याची उंची

१) गुरुवार ४ जून सकाळी १०-५७ पाण्याची उंची ४.५६ मीटर

२) शुक्रवार ५ जून सकाळी ११-४५ पाण्याची उंची ४.७५ मीटर

३) शनिवार ६ जून दुपारी १२-३३ पाण्याची उंची ४.८२ मीटर

४) रविवार ७ जून दुपारी १-१९ पाण्याची उंची ४.७८ मीटर

५) सोमवार ८ जून दुपारी २-०४ पाण्याची उंची ४.६७ मीटर

६) मंगळवार ९ जून दुपारी २-४८ पाण्याची उंची ४.५० मीटर

७) मंगळवार २३ जून दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.५२ मीटर


८) बुधवार २४ जून दुपारी २-२५ पाण्याची उंची ४.५१ मीटर

९) शनिवार ४ जुलै सकाळी ११-३८ पाण्याची उंची ४.५७ मीटर

१०) रविवार ५ जुलै दुपारी १२-२३ पाण्याची उंची ४.६३ मीटर

११) सोमवार ६ जुलै दुपारी १-०६ पाण्याची उंची ४.६२ मीटर

१२) मंगळवार ७ जुलै दुपारी १-४६ पाण्याची उंची ४.५४ मीटर

१३) मंगळवार २१ जुलै दुपारी १२-४३ पाण्याची उंची ४.५४ मीटर

१४) बुधवार २२ जुलै दुपारी १-२२ पाण्याची उंची ४.६३ मीटर

१५) गुरुवार २३ जुलै दुपारी २-०३ पाण्याची उंची ४.६६ मीटर

१६) शुक्रवार २४ जुलै दुपारी २-४५ पाण्याची उंची ४.६१ मीटर
१७) बुधवार १९ ऑगस्ट दुपारी १२-१७ पाण्याची उंची ४.६१ मीटर

१८) गुरुवार २० ऑगस्ट दुपारी १२-५५ पाण्याची उंची ४.७३ मीटर

१९) शुक्रवार २१ ऑगस्ट दुपारी १-३३ पाण्याची उंची ४.७५ मीटर

२०) शनिवार २२ ऑगस्ट दुपारी २-१४ पाण्याची उंची ४.६७ मीटर