किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) धारक शेतकऱ्यांसाठी ३१ ऑगस्ट तारीख फार महत्त्वाची असणार आहे. कारण या तारखेपर्यंत केसीसी धारकांना कृषी कर्ज परत करावे लागणार आहे. जर वेळेत कर्जाची परतफेड केली नाही तर शेतकऱ्यांना ४ टक्क्यांऐवजी ७ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना या कर्जावर ३१ ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. ही मुदत पाळली नाही तर अतिरिक्त ३ टक्के व्याज द्यावे लागेल.

केंद्र सरकार केसीसी धारकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देत असते. याशिवाय या कार्डच्या माध्यमातून शेतकरी शेतीसाठी लागणारे साहित्य, खते, अवजारांची खरेदी करत असतो. याशिवाय सरकारने आता १० टक्के रक्कम घरगुती खर्चासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. केसीसी धारकांना ३१ मार्चपर्यंत कर्ज परत करावे लागते. त्यानंतर शेतकरी पुढच्या वर्षासाठी पुन्हा पैसे घेऊ शकतो.

काही शेतकरी चालू असलेले कर्ज वेळेवर परत करुन व्याजदरात सवलत मिळवत असतात आणि नंतर पुन्हा नवीन वर्षासाठी नव्याने कर्ज काढत असतात. यंदा लॉकडाऊनमुळे केंद्र सरकारने पैसे परत करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने परत मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज घेण्यासाठी काही अटी आहेत. कर्जासाठी अर्ज करताना आपल्याला कार्डची क्रेडिट हिस्ट्री दाखवावी लागेल. म्हणजे आपल्याकडे कोणते कर्ज थकीत नाहीत ना याची शाश्वती यातून बँक कर्मचारी करत असतात. आपला खात्यावरील व्यवहार चांगला राहिला तर आपल्याला नवीन कर्ज मिळणे सोपे जाते.

ऑनलाईन अर्ज
शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. https://pmkisan.gov.in/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक होमपेज दिसेल. त्यावर केसीसी डाऊनलोड असा एक पर्याय दिसेल. तो निवडा. त्यानंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल. या लिंक व्यतिरिक्त https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf. या संकेतस्थळावरूनही अर्ज मिळवता येतो.